प्रसिद्ध शायर राहत इंदौरींना कोरोनाची लागण | पुढारी

प्रसिद्ध शायर राहत इंदौरींना कोरोनाची लागण

इंदोर (मध्य प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांसह अनेक कलाकार सापडले आहेत. दरम्यान, शायर राहत इंदौरी यांना देखील करोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी ही माहिती स्वतःहून ट्विट करत दिली आहे.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

कोविडची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी अरविंदो रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील. असे इंदौर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

७० वर्षीय राहत इंदौरी एक प्रसिद्ध कवी तसेच एक उत्तम गीत लेखक आहे. त्यांनी बॉलिवूडसाठी अनेक प्रसिद्ध गाणीही लिहिली आहेत. यासोबतच  सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड मत मांडणारे वक्ते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. 

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या अगोदर धावून आले होते. त्यांनी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास स्वतःच घर देखील वापरण्यास देण्याची तयारी ट्विट करत दर्शवली होती.

Back to top button