नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीत प्रवेश, खरं काय? शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंसोबतचा फोटो व्हायरल | पुढारी

नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीत प्रवेश, खरं काय? शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंसोबतचा फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाइन डेस्क – एक फोटो व्हायरल झाला आणि नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या फोटोत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांच्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे नेते श्रीराम शेटे देखील आहेत. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे महाविकास आघाडीसोबत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांनी महायुती सोडून महाविकास आघाडीत प्रवेश केल्याची अफवा पसरली मात्र, या फोटोमागील सत्य वेगळं आहे.

त्याचे झाले असे की, दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथे आज (दि. 10) येथील मारुती मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी हे सगळे नेते एकत्र आले होते. अक्षय तृतीया निमित्त तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे व अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ हेही सोबत असल्याने नरहरी झिरवाळांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याची चर्चा झाली. मात्र, तसे काही नसून ते केवळ भूमीपूजनापूर्ते एकत्र आले होते अशी माहिती मिळाली आहे.

दिंडोरीत महायुतीच्या भारती पवार व महाविकास आघाडीचे भास्कर भगरे या दोघांचाही प्रचार जोरात सुरु आहे. सध्याचे राजकारण पाहाता कोण कधी कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही,  त्यामुळे हा फोटो व्हायरल झाल्याबरोबर नरहरी झिरवाळ यांच्या महाविकास आघाडीत प्रवेश या चर्चेला एकच उधाण आलं.

हेही वाचा –

Back to top button