‘रात्रीस खेळ चाले २’चा निरोप; अण्णांची शेवंता झाली भावूक…  | पुढारी

'रात्रीस खेळ चाले २'चा निरोप; अण्णांची शेवंता झाली भावूक... 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘रात्रीस खेळ चाले’ या झी मराठीवरील मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे यातील शेवंता हे पात्र अधिक गाजलं. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेचं दुसरं पर्व आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेतील ‘शेवंता’नं केवळ अण्णा नाईक यांच्याच नव्हे, तर प्रेक्षकांच्याही काळजाचा ठाव घेतला होता. यानिमित्ताने या मालिकेमध्ये ‘शेवंता’ म्हणजेच ‘सौ. कुमूदिनी पाटणकर’ साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकर भावूक झाल्या आहेत. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्याचं म्हटलंय. 

अपूर्वा नेमळेकर फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात…

नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या..

ह्या मालिकेचा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठीचे मना पासून आभार मानते.. त्याचबरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याबद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्तीला आली हे समजायला कठीण तर जात आहेच पण त्याचबरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे.

पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्हीवर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्याबरोबर सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्या बरोबरच इतर सगळ्यांचा ह्या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता.

हा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो.. कुठलंही काम जेव्हा शेवटच्या टप्प्यात येत तेव्हा आपल्याला त्याबद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज तसेच काही वाटत आहे..

शेवंतांचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते, पण ही भूमिका रंगवताना त्यामध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढतच गेले, आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्याबद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच येईन ह्या बद्दल मी आशावादी आहे! आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा, ही विनंती.

एक कलाकार म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन, बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती. माझा पॅकअप झाल्यानंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटो आणि आज मस्तिष्कावर पडलेले ही पुष्प पाकळी यांने माझे मन गहिवरून गेले…  

 

Back to top button