रियासह ६ जणांचा जामीन अर्ज फेटाळला  | पुढारी

रियासह ६ जणांचा जामीन अर्ज फेटाळला 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोवीक, सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, घर मदतनीस दीपेश सावंत यांच्यासह ड्रग्ज डिलर अब्दुल बशीत आणि झैद विलात्रा यांचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे रियाला आणखी काही काळ भायखळा कारागृहातच काढावी लागणार आहे. 

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्ज अँगल समोर आला, त्यावेळेस ‘एनसीबी’ने तपास आपल्या हाती घेत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान रियाला अटक करण्यात आली. तिच्यावर ड्रग्ज घेणे, सुशांतला ड्रग्ज देणे आणि ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. रियासह शोवीक, सॅम्युअल, दीपेश आणि सहा ड्रग्ज डिलर्सना अटक केली आहे. रियासह अन्य आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. रियाच्या जामिनाची याचिका याआधीच ‘एनसीबी’ न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे रियासह अन्य आरोपींनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर जामिनावरील सुनावणी एक दिवस पुढे ढकलली. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता यावर सुनावणी झाली.

आपल्याला झालेली अटक आणि न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे रिया चिंतेत होती. अडीच वाजेपर्यंत रिया जागीच होती, तिला झोप येत नव्हती. रिया खूप अस्वस्थ वाटत होती. दहा बाय पंधराच्या बॅरेकमध्ये रियाला ठेवण्यात आले आहे. रियाला रात्री आठच्या सुमारास जेवण देण्यात आले. तेवढ्याच बॅरेकमध्ये रिया रात्री अकरा वाजेपर्यंत फिरत होती. 

शेवटी थकून रिया रात्री खाली जमिनीवर बसली आणि एकटक खाली जमिनीकडेच पाहत होती. रियाच्या चेहर्‍यावर चिंता आणि तणाव स्पष्ट दिसत होता. रात्री बाराच्या सुमारास रियाने अंथरूण अंथरले. जेलमध्ये रियाला एक उशी, एक चादर आणि एक चटई आणि साहित्य ठेवण्यासाठी एक पिशवी देण्यात आली आहे. रियाने अंथरूण तर अंथरले तरी तिच्या डोळ्यातून झोप गायब होती.

Back to top button