‘स्कॅम’नंतर हंसल मेहता यांचा ‘स्कूप’ | पुढारी

‘स्कॅम’नंतर हंसल मेहता यांचा ‘स्कूप’

पुढारी ऑनलाईन

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांच्या नव्या सीरिजसाठी नेटफ्लिकसोबत टायअप केले आहे. या सीरिजचे नाव आहे ‘स्कूप’. (स्कूप हा शब्द पत्रकारितेत नवी माहिती, फक्‍त एकाच रिपोर्टरकडे असलेली बातमी, एक्स्लुझिव्ह बातमी अशा अर्थाने वापरला जातो.) जिग्‍ना व्होरा यांच्या ‘बिहाईंड द बार्स इन भायकुळा ः माय डेज इन प्रिझन’ या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. पुस्तकातील नावे काल्पनिक असली तरी हे पुस्तक आत्मचरित्रपर आहे. जागृती पाठक या क्राईम रिपोर्टिंग करणार्‍या पत्रकाराचा प्रवास यातून उलगडणार आहे. सहकारी पत्रकाराच्या खुनाच्या गुन्ह्यात तिला अटक केली जाते. या सीरिजमध्ये अभिनेत्री करिष्मा तन्‍ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

जिग्‍ना व्होरा या पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ ‘जेडे’ यांच्या सहकारी होत्या. जेडे हे मुंबईतील क्राईम रिपोर्टर होते. 2011 मध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे मुंबईतील एकेकाळचा डॉन छोटा राजन याचा हात असल्याचे मानले जाते. दरम्यान, हंसल मेहतांना या सीरिजमध्ये ‘थप्पड’ चित्रपटाच्या सहलेखिका मृण्मयी लागू-वायकूळ यांचीही साथ लाभणार आहे. नुकतेच या सीरिजच्या चित्रीकरणास सुरवात झाली आहे.

Back to top button