Bhandara-Gondia Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया मतदारसंघावर २५ वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा

File Photo
File Photo

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे. विद्यमान खासदारांचा पराभव झाल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे २५ वर्षानंतर काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा एकदा काबीज केला आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी ६७.०४ टक्के मतदान झाले होते. महायुतीचे सुनील मेंढे, महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे, बसपाचे संजय कुंभलकर, वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट यांच्यासह एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून पलाडी येथील स्ट्राँगरुमजवळील भव्य सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच सुनील मेंढे आणि डॉ. प्रशांत पडोळे यांच्यामध्येच अटीतटीची लढत दिसून आली. पहिल्या काही तासांमध्ये भाजपचे सुनील मेंढे हे अवघ्या काही मतांनी पुढे होते. त्यानंतर काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांनी आघाडी घेतली. आघाडी, पिछाडीचा हा खेळ बराच वेळपर्यंत सुरू होता. नंतरच्या टप्प्यात मात्र काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम होती. मतमोजणीअंती काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांचा विजय निश्चित झाला.

पलाडी येथील मतमोजणी परिसरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जसजशी त्यांच्या उमेदवारांना आघाडी मिळत होती तसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांचा विजय निश्चित असल्याचे दिसताच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. तब्बल २५ वर्षानंतर या मतदारसंघावर काँग्रेसने झेंडा फडकवल्याने काँग्रेसमध्ये नव्याने उभारी मिळाली आहे.

बंडखोर नरमले

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक बंडखोरांमुळेही चांगलीच चर्चेत होती. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर वाटेल तसे आरोप करुन अपक्ष निवडणूक लढविली. सोबतच आपण या निवडणुकीत विजयी होऊ, असा दावा केला होता. परंतु, निकालाअंती त्यांचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच आता त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यही धोक्यात आले आहे. त्यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघातही मतदारांनी त्यांना नाकारल्याचे त्यांना मिळालेल्या मतांमधून दिसून येते.

सेवक वाघाये यांच्यासोबत भाजपमध्येही बंडखोरी झाली. भाजपचे जिल्हा महामंत्री, माजी नगरसेवक संजय कुंभलकर यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारीही मिळविली. सुरुवातीला आपणच या निवडणुकीत विजयी होण्याचा त्यांचा दावा होता. परंतु, त्यांचा हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. बंडखोरी केल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संजय कुंभलकर यांना बसपाने उमेदवारी दिल्याने बसपातील निष्ठावंत कमालीचे नाराज झाले होते. प्रचारातही संजय कुंभलकर यांनी निष्ठावांनांना डावलले होते. त्यामुळे त्यांच्यातील नाराजीत भरच पडत गेली. परिणामी, बसपाचे कॅडर मतेही कुंभलकर यांना मिळू शकली नाही. ही कॅडर मते काँग्रेसच्या बाजूने वळली. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या मतांमध्ये वाढ झाली.

सभांचा परिणाम

भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांनी सुनील मेंढे यांच्या नावाची शिफारस भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानुसार मेंढे यांना उमेदवारीही मिळाली. त्यानंतर मेंढे यांना निवडून आणण्यासाठी प्रफुल पटेल यांनी संपूर्ण मतदारसंघात सभा घेतल्या. एवढेच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांनी मतदारसंघ गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत देश विकासाच्या वाटेवर आहे, हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मतदारांवर त्यांचा फारसा परिणाम पडला नाही.

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेचा केली होती. त्यांनी सुरुवातीपासूनच मतदारसंघात तळ ठोकलेला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या साकोली येथे झालेल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. इंडिया आघाडीची सरकार सत्तेत आल्यास तरूण, शेतकरी, मजूर, महिला यांच्यासाठी विविध योजनांचा जाहिरनामा राहुल गांधी यांनी मतदारांना पटवून दिला. याशिवाय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही मतदारसंघात सभा घेतल्या. अखेरीच मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला पसंती दिली. नाना पटोलेंसाठी हा मोठा विजय असून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा धक्का मानला जात आहे.

बसप, वंचितचा प्रभाव नाही

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी ५० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. बसपाच्या विजया नंदूरकर यांनी ५२ हजारांच्या वर मते घेतली होती, तर वंचितचे के. एन. नान्हे यांनी ४५ हजारांच्यावर मते घेतली होती. मात्र या निवडणुकीत या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना मागील निवडणुकीचा टप्पा गाठता आला नाही. वंचितचे उमेदवार संजय केवट यांच्यासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली होती. परंतु, त्यांच्या सभेचा फारसा परिणाम दिसून आला नाही. या दोन्ही पक्षांची कॅडर मते महत्वाची असतात. परंतु, या निवडणुकीत दोन्ही पक्षांची कॅडर मते काँग्रेसने आपल्याकडे वळविण्यात यश आले आहे.

आघाडी, पिछाडीचा खेळ

भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट होण्याचे संकेत सुरुवातीपासूनच होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला भाजपचे सुनील मेंढे यांनी आघाडी मिळविली होती. त्यानंतर काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे आघाडीवर होते. फेरीनिहाय मतांची मोजणी होत असताना कधी सुनील मेंढे तर कधी डॉ. पडोळे आघाडी घेत होते. हा आघाडी, पिछाडीचा खेळ बराच वेळ सुरू होता. यात मात्र उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या छातीची धडधड वाढली होती.

नाना पटोलेंचा वरचष्मा कायम

महाविकास आघाडीच्या जागावाटपात भंडारा-गोंदिया मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच निवडणूक लढणार, हे जवळजवळ स्पष्ट होते. परंतु, ऐनवेळी त्यांनी नकार देत डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला काँग्रेसने डमी उमेदवार दिल्याचा आरोप होत होता. विरोधकांनीही डमी उमेदवाराचा मुद्दा सतत चर्चेत आणला. भाजप पुन्हा या जागेवर निवडून येणार, असे बोलले जात होते. परंतु, नाना पटोले यांचा वरचष्मा, त्यांची राजकीय खेळी व आजपर्यंतचा अनुभव यामुळे काँग्रेसने या मतदारसंघात पुन्हा नव्याने एंन्ट्री केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने कमबॅक केल्याने प्रफुल पटेल यांची डोकेदुखी वाढणार आहे. आतापर्यंत प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा जम बसविला होता. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेसचे मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news