निर्बंध ठेवा; पण लॉकडाऊन नको! | पुढारी

निर्बंध ठेवा; पण लॉकडाऊन नको!

डॉ. योगेश प्र. जाधव, समूह संपादक

ओमायक्रॉन हा कोरोनाचाच नवा अवतार अमेरिका, युरोपमध्ये धुमाकूळ घालतो आहे. तिथूनच तो भारतातही दाखल झाला. संसर्गाचा वेग अफाट असल्याने बघता बघता महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर लॉकडाऊनचे सावट निर्माण झाले. कोरोनाची ही तिसरी लाट आधी मुंबईत आणि मग पुणे, ठाणे या शहरांमध्ये धडकली. उर्वरित महाराष्ट्र अद्याप या लाटेच्या तडाख्यापासून दूर आहे. मुंबईत दर 24 तासाला कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण दुप्पट होत आहेत. आता ही लाट रोखायची कशी? यावर लॉकडाऊन हे उत्तर नव्हे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आता सांगितले की, तूर्तास लॉकडाऊन नाही. तूर्तास नाही, याचा अर्थ पुढे हा लॉकडाऊन होेणारच नाही, असेही नाही. परिस्थिती उद्भवलीच, तर लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागेल, असाही टोपेंच्या बोलण्याचा अर्थ निघतो.

कोरोनाचा तिसरा उद्रेक सुरू झाल्यापासून सरकारमधील अनेक मंत्री कडक निर्बंधांची भाषा तसेही करत आहेत. सर्वात कडक निर्बंध म्हणजे लॉकडाऊन. निर्बंधांचेच दुसरे नाव लॉकडाऊनदेखील असू शकते. त्यामुळे कडक निर्बंधांची म्हणजेच लॉकडाऊनची भाषा वापरून लोकांना धमकावणे सरकारने आता थांबवावे. त्यापेक्षा लॉकडाऊनसारखे निर्बंध न लावता तिसरी लाट कशी रोखता येईल, यावर तातडीने काही निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रसंगी त्यासाठी जनतेला शिस्त लावणारे काही नियम लागू करावे लागतील. हे नियम लागू करताना ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण,’ असा दुटप्पीपणा सरकारलाही पत्करून चालणार नाही.

गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठा सुरू झाल्या. नाही म्हटले तरी अर्थचक्र गती घेऊ लागले. माणसे वगळून ही गती मिळत नाही. बाजारात माणसे दिसतात, ग्राहक दिसतात म्हणून बाजारपेठेत लक्ष्मीचा संचार होतो. बाजारातून माणूसच गायब झाला, तर लक्ष्मी गेली कुठे? या प्रश्नाने अर्थव्यवस्थेचाही प्राण कंठाशी येतो. याचा अनुभव मागच्या लॉकडाऊनमध्ये आपण घेतला. आता बाजारात प्रचंड गर्दी दिसते आणि ती डोळ्यांत खुपते, असे कसे चालेल? या गर्दीमुळेच कोरोना वाढतो, असे सरसकट समीकरण लावायचे झाले, तर आपले मंत्री-संत्री कुठे कुठे गर्दी करून आले याचेही उत्तर सरकारला द्यावे लागेल.

मंत्रालयाच्या पायरीवर पहारा देणार्‍या पोलिसांपासून लिपिकांपर्यंत ओमायक्रॉन पोहोचला. बघता बघता उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील 11 मंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग झालाच! याला कुठली गर्दी जबाबदार आहे? कोरोना पद, प्रतिष्ठा पाहत नाही. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत भेद करत नाही. तुमच्या तोंडावर मास्क आहे की नाही, तुम्ही अंतर राखता की नाही, सतत हात धुता की नाही, इतकेच तो पाहतो. कोरोनाची ही त्रिसूत्री गुंडाळून ठेवणारे आता तिसर्‍या लाटेखाली येऊ लागले आहेत. त्यात बाजारात बेशिस्त गर्दी करणारा सामान्य माणूस जसा सापडला, तसे महाराष्ट्रावर राज्य करणारे मंत्रीही सापडले. हे सारे स्पष्ट असताना सरसकट निर्बंधांची आणि लॉकडाऊनची भाषा कशासाठी? कोरोना रोखण्याचे मूलभूत नियम अत्यंत कठोरपणे अंमलात आणण्यासाठी घरादाराला आणि बाजाराला कुलूपच ठोकले पाहिजे, असे नाही. हे नियम पाळण्याची सुरुवात सरकारला स्वत:पासून करावी लागेल.

लॉकडाऊनच्या तडाख्यातून सावरू पाहणार्‍या बाजारपेठेलाही, खासकरून बेशिस्त ग्राहकांच्या बाबतीत कठोर व्हावे लागेल; अन्यथा व्यवहार करणे कठीण होऊन बसेल, असे कडक निर्बंध येतील. मग त्याला लॉकडाऊन म्हणा, नाही तर निर्बंध म्हणा. हे संकट टाळायचे असेल, तर लॉकडाऊन नको, नियम कडक करा, अशी भूमिका बाजारपेठेलाही घ्यावी लागेल आणि सरकारलाही डोके शांत ठेवून निर्णय करावे लागतील. ऊठसूट लॉकडाऊनच्या धमक्या दिल्याने कोरोनातून सुटका होणार नाही. आजारापेक्षा औषध भयंकर, असा प्रकार आता पुन्हा नको!

महाराष्ट्राच्याच काय, देशाच्या आणि देशोदेशीच्या सरकारांनाही कोरोनाचा पूर्वानुभव नव्हता. हे ‘जैविक युद्ध’ लढताना सारीच सरकारे गडबडली, हडबडली आणि लॉकडाऊनची कुर्‍हाड आपल्याच पायावर मारून घेतली. लॉकडाऊनमुळे संसर्ग घटला किंवा कुठली लाट रोखली गेली, याचा पुरावा नाही. कोरोना गेला नाहीच, उलट तो मुक्काम ठोकून अवतार बदलत राहिला. त्याला घालवण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मात्र अर्थव्यवस्था ढासळली. अब्जावधी रुपयांचे उत्पन्न-उत्पादन बुडाले. मंदीच्या तडाख्यात हजारो कारखाने-प्रकल्प बंद पडले. व्यापार देशोधडीला लागला. कोट्यवधी कामगार-कर्मचारी-अधिकार्‍यांच्या नोकर्‍या गेल्या. हातावर पोट असणारे कोरोनात जगले; पण उपासमारीने मेले. वास्तविक, लॉकडाऊनने कोरोनाची साखळी तुटण्याच्या क्षमतेला मर्यादा असतात.

कोरोनाची लाट तिच्या वेळेला आणि तिच्या गतीने येते, वाढते आणि कमी होते, असा अनुभव आहे. देशात 2020 ची पहिली लाट मार्चमध्ये आली. 25 मार्चला देशव्यापी कडकडीत लॉकडाऊन पुकारण्यात आला. मे महिन्यानंतर निर्बंध हळूहळू उठवण्यात आले. या लॉकडाऊननंतरच्या सप्टेंबरमध्ये आलेल्या पहिल्या लाटेने शिखर गाठले. निर्बंध नसतानाही ती लाट मात्र उतरणीला लागली. दुसरी लाट 2021 च्या फेब्रुवारीमध्ये सुरू झाली आणि ती मे महिन्यात उतरली. त्यानंतर आता सात महिन्यांनी म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस तिसर्‍या लाटेला सुरुवात झाली. पहिल्या दोन लाटांच्या वेळची स्थिती आणि या तिसर्‍या लाटेची परिस्थिती, यात फरक आहे. तो जाणून घ्या.

पहिल्या दोन लाटांमध्ये आपल्याला लसीकरणाचे कवच नव्हते. केवळ आपल्या राज्याचेच उदाहरण घेतले, तर राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांपैकी सुमारे साठ टक्के जणांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. 87.5 टक्के नागरिकांना किमान पहिला डोस मिळाला आहे. लक्षणे जाणवून किंवा लक्षणे न जाणवताही कोरोना झालेल्यांचे प्रमाण 80 टक्क्यांच्या आसपास झाले असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. म्हणजेच सामूहिक रोगप्रतिकारकशक्तीही आलेली आहे. थोडक्यात, तिसर्‍या लाटेशी लढण्यासाठी आपला समाजही तुलनेने प्रतिकारकशक्तीसंपन्न झाला आहे. त्यामुळे सरसकट लॉकडाऊन न करता केवळ कोरोनाचा उद्रेक होईल त्या त्या ठिकाणांपुरतेच कडक निर्बंध लावल्यास सर्वच अर्थव्यवस्था ठप्प होण्याचा धोका टळेल; पण हे लक्षात कोण घेणार? बाजारपेठेत नियमभंग करून पार्क केलेल्या गाड्यांची चाके कुलूपबंद करणारे वाहतूक पोलिस फिरत असतात. त्यांच्यासोबत एक ना अनेक जॅमर लटकत असतात. सतत निर्बंधांची भाषा करणारे मंत्रीही जणू रोज कुलूप-किल्ली घेऊनच फिरत असावेत. सतत त्यांच्या तोंडी लॉकडाऊनची भाषा आहे. मागच्या दोन लाटा आल्या आणि गेल्या. लॉकडाऊनने खूप काही शिकवले. बाजार बंद करून, लोकांना घरात डांबून कोरोना परत जाणार नसतो, हे निर्विवाद सत्य आहे. नाईट कर्फ्यूने कोरोना कमी झाल्याचा पुरावा नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ सौम्या स्वामिनाथन यांचे मत याला पूरक म्हणावे लागेल.

बाजारात माणसे दिसू द्या. दुकाने, हॉटेल्स उघडी ठेवा. उशिरापर्यंत सुरू ठेवा. लोकांना चित्रपट पाहू द्या. रंगमंदिरांमध्ये नाटके होऊ द्या. सगळीकडे माणसे दिसली पाहिजेत. गर्दीचेही एक अर्थशास्त्र असते. अर्थव्यवस्थेला तेच तोलून धरते. मात्र, माणसांचा हा वावर, बाजारपेठेतील ही गर्दी बेशिस्त असता कामा नये. या माणसांना शिस्त लावण्यासाठी जे काही नियम असतील ते नियम कडक करा. हे नियम सरकारनेही पाळावेत आणि बाजारपेठेनेही. यातच आपल्या सार्‍यांचे भले आहे. नवे वर्ष तिसर्‍या लाटेत उजाडले. कुठेही जल्लोष नव्हता. गर्दी नव्हती. सुनेसुने वाटले. असे सुन्न करणारे दिवस आता नकोत. त्यासाठी नववर्षाचे गिफ्ट आपणच आपल्याला द्यावे लागेल. निर्बंध पाळू, नियम पाळू; मात्र लॉकडाऊन कदापि नाही. हा निर्धारच या नववर्षाचे खरे गिफ्ट ठरेल.

Back to top button