अमेरिकेतही क्रिकेटचा जलवा | पुढारी

अमेरिकेतही क्रिकेटचा जलवा

तसे पाहायला गेले तर अमेरिकेचे बरेच चांगले चालले आहे, असे म्हणावे लागेल. अमेरिका जगातील प्रथम क्रमांकाची महासत्ता आहे व जगभरातील नागरिकांचा अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याकडे ओढा आहे. भारतातूनही मोठ्या संख्येने लोक दरवर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात व तिकडेच स्थायिक होतात.

थोडेसे खोलात जाऊन बघितले तर अमेरिकेच्या क्रिकेट टीममध्ये जास्तीत जास्त संख्येने तिथे स्थायिक झालेले भारतीय खेळाडूच आहेत, असे लक्षात येईल. देश-विदेशांतील लोक अमेरिकेत जातात व तिथे स्थायिक होतात. भारतातील एच-1बी व्हिसा असणारे लोक अमेरिकेच्या टीममध्ये आहेत, हे स्पष्टपणे दिसून आले आहे. सर्व खेळांत जगभरात आघाडीवर असणारे देश जसे की, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, चीन या देशांना स्वतःच्या क्रिकेट टीम तयार करणे अजिबात अवघड नव्हते; परंतु त्या त्यांनी घडविल्या नाहीत, हे प्रखर वास्तव आहे. सुरुवातीला पाच दिवसांचे कसोटी सामने असायचे. त्यात एक दिवस सुट्टीचा धरून एकूण सहा दिवस आपल्या देशातील नागरिक त्या सामन्याच्या नादात असायचे.

भारतात सर्वाधिक लाड कोणाचे होत असतील तर ते चित्रपट अभिनेते-अभिनेत्री व क्रिकेट खेळाडू यांचे. थोडासा लोकप्रिय झाला की, क्रिकेट खेळाडू लगेच जाहिरातींत पाहायला मिळतो. उत्पादनाचा खप वाढवा म्हणून लोकप्रिय क्रिकेट खेळाडूला जाहिरातदारांनी वापरणे सहज समजू शकते. हाच क्रिकेट खेळाडू पुढे पाच ते सात वर्षांत निवृत्तीच्या उंबरठ्यावर आला की, क्रिकेट समालोचक होतो किंवा थेट खासदारकीला उभा राहून खासदारही होतो. गौतम गंभीर, कीर्ती आझाद यासारखे खेळाडू निवडणूक लढवून, तर सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू राज्यसभेत खासदार झालेले आपण पाहिले आहेत.

उद्या क्रिकेट अमेरिकेत लोकप्रिय झाले, तर तेथील खेळाडूही जाहिरातींमध्ये येतील आणि राजकारणामध्ये जाण्याच्या प्रयत्न करतील. शिवाय काही उद्योग न करता तासन् तास जर अमेरिकन जनता टीव्हीपुढे क्रिकेटचे सामने पाहत बसेल. ज्यांना काहीच काम नाही असे असंख्य नागरिक ज्या देशांमध्ये आहेत, त्या देशांतील लोकच देहभान हरपून क्रिकेट सामने पाहत असतात. जेमतेम 70 मिनिटे चालणारा हॉकीचा खेळ राष्ट्रीय खेळ असूनही भारतात तेवढा लोकप्रिय नाही, याचे कारण रिकामटेकड्या प्रेक्षकांना दिवस अन् दिवस मनोरंजन पाहिजे असते, ते फक्त क्रिकेट देऊ शकते. हो की नाही? जगभरातील जनतेचा फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलमध्ये सव्वाशे कोटी जनतेमधून निवडलेली देशाची टीम जागतिक चषकासाठी पात्रता फेरीतसुद्धा प्रवेश करू शकत नाही, हे समजून घ्यावे लागेल.

भारतीय उपखंडात क्रिकेट हा खेळ इंग्रजांनी आणला व आशियाई खंडातील क्रिकेटपटूंनी इंग्लंडच्या संघालाही मागे टाकले, यातच धन्यता मानतो. चीन, जपान, जर्मनी आदी देश क्रिकेट का खेळत नाहीत, याचा कधीही विचार केला जात नाही. उद्या चालून या देशांत क्रिकेट लोकप्रिय झाले तर तेथील नागरिक क्रिकेट पाहण्यात व्यस्त होतील, हे नक्की!

Back to top button