पक्ष्यांचे जीवनमान बदलतेय! | पुढारी

पक्ष्यांचे जीवनमान बदलतेय!

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये जंगलांत आगी लागण्याच्या 342 घटना देशभरात घडल्या. याचा फटका पक्ष्यांना बसला आहे. याचे कारण मार्च ते जून हा काळ पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. गेल्या काही वर्षांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे जीवनमान बदलत आहे. खासकरून उत्तरेकडील थंड देशातून उष्णकटिबंधीय प्रदेशात येणार्‍या प्रवासी पक्ष्यांना तापमानवाढीची झळ बसली आहे. याचे कारण प्रवासी पक्ष्यांचे आणि त्यांच्या अन्नस्रोतांतील वेळेचे संतुलन बिघडले आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या विस्कळीत झाली आहे.

जगातील सर्व जीवांचा विकास आणि जीवनचक्र एकमेकांच्या संरक्षणावर आधारित आहे. क्रौंंच पक्ष्याच्या जोडीतील एकास बाण मारल्यानंतर दुसर्‍याने पारध्याला दिलेला अभिशापही ‘जिओ और जीने दो’ ही भारतीय संस्कृती अधोरेखित करणारा आहे. यामुळे आद्यकवी वाल्मीकी यांना अतिव दु:ख झाले. पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक दिनचर्येमुळे मानवाच्या नीरस जीवनात प्रसन्नता आणि प्रफुल्लता लाभते. निसर्ग सहअस्तित्वाचा धडा नेहमी शिकवत असतो. कृषिप्रधान भारताच्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यात पक्ष्यांची भूमिका मोलाची ठरली आहे. भारतातील जलवायू आणि भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्यामुळेच भारताला पक्ष्यांचा स्वर्ग मानले गेले आहे. मोर, तीतर, बटेर, कावळा, शिकरा, ससाणा, चिमणी आणि गिधाडासारखे पक्षी शेतकर्‍यांसाठी वरदान आहेत. दुसरीकडे देशात सातासमुद्रापलीकडून येणार्‍या परदेशी पाहुण्या पक्ष्यांनीही एक परंपरा पाळलेली दिसते; पण सध्या याबाबत चिंताजनक स्थिती दिसून येत आहे.

भारतीय वन सर्वेक्षण विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, देशात एकाच आठवड्यात जंगलात वणवा पेटण्याच्या 342 घटना घडल्या असून, यातील 209 घटना एकट्या उत्तराखंडच्या आहेत. शुष्क जमीन आणि सामान्यपेक्षा अधिक तापमान असते तेव्हा निष्पर्ण जंगलात अशा आगी धुमसत राहतात. दुसरीकडे मार्च ते जूनपर्यंतचा काळ हा पक्ष्यांच्या उच्च प्रजननचा काळ असतो. अशाच वेळी जंगलात आग लागत असेल तर साहजिकच पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर आणि प्रक्रियेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. जंगलांतील आगीमुळे वनसंपदा नष्ट होतेच, तसेच अनेक लहान-मोठ्या जीवांनाही त्याचा फटका बसतो. अशा परिस्थितीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणामाचे आकलन करणे कठीण जाते. गेल्या काही वर्षांत दिवसेंदिवस उष्ण होणार्‍या पृथ्वीवरील पक्ष्यांचे जीवन संकटात सापडत आहे.

प्रामुख्याने भक्ष्य, आहार आणि आश्रयाच्या शोधात थंड वातावरणाच्या उत्तर अक्षांशापासून उष्णकटिबंधीय म्हणजेच उष्ण भागात स्थलांतरित होणार्‍या पक्ष्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. निसर्गाचे संतुलन आणि जीवनचक्रात स्थलांतरित पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची असते. जीवनाची आशा घेऊन येणार्‍या पक्ष्यांच्या मागील अनेक पिढ्या दरवर्षी स्थलांतर करीत आहेत. आर्क्टिक क्षेत्र आणि उत्तर ध—ुवावर जेव्हा तापमान शून्याच्या खाली 40 अंशांपर्यंत उतरण्यास प्रारंभ होतो, तेव्हा तेथील पक्षी भारताकडे स्थलांतर करतात. हे पक्षी रस्ता कसा शोधतात, हजारो किलोमीटर प्रवासाचा हा रस्ता त्यांच्या लक्षात कसा राहतो, ज्या ठिकाणी त्यांचे आजोबा-पणजोबा आले, त्याच नेमक्या ठिकाणी तेही कसे येतात, या प्रश्नांची उकल अजून विज्ञानालाही झालेली नाही.

एका पिढीतून दुसर्‍या पिढीत गुणसूत्रे, जनुके स्थानांतरित होत असताना वर्षभर आहार मिळावा यासाठी पक्ष्यांच्या प्रजाती खडतर प्रवास करत असतात. अर्थात, पक्ष्यांचे स्थलांतर इतक्यात थांबणार नाही; पण एका अहवालानुसार, प्रजनन काळात काही पक्षी स्वत:ची जागा सोडत नसल्याचे दिसून आले आहे. दिल्लीच्या ओखला पक्षी अभयारण्यात फेरफटका मारल्यास आर्क्टिक क्षेत्रातून येणार्‍या अनेक पक्ष्यांची यंदा गैरहजेरी जाणवेल. अलीकडील काळात तर किटकांवरही वातावरण बदल आणि मानवी चुकांचा परिणाम जाणवत आहे. किटकनाशकांचा बेसुमार वापर केल्याने आणि प्रकाशाच्या प्रदूषणामुळे किटकांची संख्या रोडावत चालली आहे. साहजिकच स्थलांतरित पक्षी अणि त्यांचा आहाराचा स्रोत यात ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पक्ष्यांची संख्या कमी होऊ शकते किंवा अचानक वाढू शकते.

याचा परिणाम म्हणजे अनेक प्रकारचा आहार करणार्‍या आणि सर्वच ऋतूंत अनुकूल राहणार्‍या प्रजातींची संख्या वाढत असून दुसरीकडे विशिष्ट वातावरणात राहणार्‍या पक्ष्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत आहे. एका आकडेवारीनुसार, भारतीय उपखंडात हिवाळ्यात 600 पेक्षा अधिक स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास होतो; मात्र अलीकडील काळात यापैकी 240 प्रजातींची संख्या घटलेली दिसते. अर्थात, परदेशी पाहुणे पट्टकदंब हंसाच्या (बार हेडेड) बाबतीत स्थिती समाधानकारक आहे. भारताचे वातावरण हे परदेशी पाहुण्यांना विविध प्रकारची स्थिती उपलब्ध करून देते; मात्र या अधिवासावर विकास योजनांचा हातोडा बसत आहे. अशावेळी कोकिळा किंवा पट्टकदंब हंस पक्ष्यांप्रमाणे अन्य प्रजातीही नव्या वातावरणाशी अनुरूप ठरतात की की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एका अहवालानुसार, मोकळ्या वातावरणाची स्थिती, नद्या आणि किनार्‍यावर राहणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या कमी झाली आहे; मात्र जसजसा प्रवासाचा पॅटर्न बदलत आहे, ते पाहता लोकसंख्या अंदाजाच्या मॉडेलचा विस्तार करावा लागेल. 2024 मधील उन्हाळा हा जगासाठी धोकादायक काळ मानावा लागेल. हिंद महासागरातही आता अनेक काळ उष्ण लाटा दिसत आहेत. पूर्व आणि भारतीय उपखंडात एप्रिलमध्ये सामान्यापेक्षा वाढलेले तापमान हे हवामान बदलाचे गांभीर्य सांगणारे आहे; परंतु केवळ अस्तित्वापोटीच हवामान बदलावर चर्चा करायला हवी का? नाही. अस्तित्वासाठी संघर्ष करणार्‍या सर्व जीवजंतूंशी आपण जोडलो गेलेलो आहोत. अशावेळी स्वत:इतकेच त्यांच्याप्रतिही तेवढेच संवेदनशील राहावे लागेल.

Back to top button