वणवा पेटला | पुढारी

वणवा पेटला

महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यभरात आतापर्यंत उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण धुळ्यामध्ये आढळले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट रविवारी पुन्हा परतली. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, जळगाव, हिंगोली कुठेही जा, पारा 35 ते 40 अंशांच्याही वर गेल्यामुळे काहिली वाढली आहे. अगदी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणांचे रूपांतरही उष्ण हवेच्या ठिकाणांमध्ये झाले. गारवा अनुभवण्यासाठी लोक माथेरानला जातात; परंतु तेही तापले आहे. खेड्यापाड्यांतील नद्या, नाले, ओहोळ कोरडेठाक पडले. धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असून, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

अमरावती विभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे आणि तेथील टँकरग्रस्त गावांची संख्या दुप्पट झाली आहे. ‘ऊन जरा जास्त आहे, दरवर्षी वाटतं… भरउन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं…’ असे कवी सौमित्र यांनी म्हटले आहे, तर ‘असा मत्त पाऊस यावा मृगाचा, उरीचे उन्हाळेच जावे लया, अशी वीज हाडातून कोसळावी, झळांतून जन्मास यावे पुन्हा’ अशी मृगातील पावसाची प्रार्थना आज प्रत्येकजण करत असेल. सुदैवाने आता पॅसिफिक महासागरातील हवामानाची ‘एल निनो’ स्थिती आता संपली असल्याचे ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने जाहीर केले आहे. पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा महासागर आहे. त्यामुळे तेथील वारे आणि प्रवाहांचा सर्वत्र परिणाम दिसून येतो. ‘एल निनो’च्या काळात जगभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.

या काळात गरम पाणी पॅसिफिक महासागरात दूरवर पसरते आणि समुद्राच्या पृष्ठभागावर बराच काळ राहते. त्यामुळे पाण्यालगतची हवा तापते व वातावरणात आणखी उष्णता सोडली जाते. मानवनिर्मित हवामान बदलांमुळे अगोदरच जागतिक तापमानात वाढ झाली आहे, त्यातच ‘एल निनो’च्या प्रभावामुळे हे आतापर्यंतचे सर्वात उष्णतादायी वर्ष ठरले आहे. हा सर्व ताप सुरू असतानाच, उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात आगीचा भडका उडाला आहे. रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी भडकलेल्या आगीचे लोट नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे उत्तराखंडमधील काही जंगलांत तीसपेक्षा जास्त वणवे पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. नैनितालजवळील जंगलात भडकलेली आग हे अधिक गंभीर संकट आहे; कारण तेथून जवळच लष्कराची छावणी आहे. उत्तराखंडात अलीकडील काही वर्षांत अतिवृष्टीचे संकट सातत्याने कोसळत आहे. तेथील वृक्ष एकापाठोपाठ एक आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.

साधारण पाच वर्षांपूर्वी जगातील सर्वात मोठ्या अशा अ‍ॅमेझॉन खोर्‍यातील जंगलात महाप्रचंड वणवा लागून, त्यात अपरिमित हानी झाली होती. त्या वर्षी ब्राझीलमध्ये 9500 पेक्षा जास्त वणवे पेटले आणि त्यातील सर्वाधिक घटना अ‍ॅमेझॉनमधील होत्या. पृथ्वीवरील 20 टक्के ऑक्सिजन अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून तयार होतो. तेथे आजवर ज्या आगी लागल्या, त्या उन्हाळ्यातच. त्यामुळे तयार झालेल्या काळ्या धुराचे लोट अनेक शहरांमध्ये पसरले. ब्राझीलपासून 3200 किलोमीटर लांब असलेल्या साओ पॉलो या शहरात या धुराच्या लोटांमुळे सूर्यही झाकोळला गेल्याने, शहरात दिवसा रात्रीसारखा गडद अंधार पसरला होता. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अ‍ॅमेझॉनमध्ये उन्हाळा असतो. शेती करण्यासाठी लोक जंगलतोड करतात आणि यामुळेच अ‍ॅमेझॉनमध्ये आगी लागल्या. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ कमी करण्यासाठी अ‍ॅमेझॉनचा सर्वाधिक उपयोग होतो. त्यामुळे ब्राझील सरकारकडून या जंगलाची अधिक काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा आहे.

हवामान बदलाच्या संकटाचा फटका जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतात उत्तराखंडासारख्या राज्यांनाही बसत आहेच; परंतु आता उत्तराखंडमध्ये वणव्यांच्या मागे मानवनिर्मित कारणे आहेत, असे वन खात्यानेच जाहीर केले आहे. 21 एप्रिलपासून तेथील जंगलातील झाडे खाक होण्याच्या घटनांची संख्या 202 इतकी आहे. ओडिशातही अशा 201 घटना घडल्या. वणव्यांमुळे सात लाखांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र बाधित झाले. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, मणिपूर येथेही अशाच प्रकारे वनसंपत्तीचा नाश झाला. ‘फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील दहा टक्के वनक्षेत्र आगीच्या धोक्याच्या छायेखाली आहे. उत्तराखंडमधील उन्हाळ्यातल्या आगी या मुख्यतः सिगारेट ओढणे, विजेच्या ठिणग्या उडणे, जाणूनबुजून आगी लावणे यामुळे घडल्याच्या नोंदी आहेत. त्याचबरोबर वीज कोसळणे, तापमानाचा पारा कमालीचा वाढणे आणि हवेतील कोरडेपणा यामुळेही जंगले पेटत आहेत.

मार्च ते मे हा काळ अग्निकाळच म्हणायला पाहिजे! कारण हिवाळा संपल्यावर बायोमासची उपलब्धता वाढलेली असते. मान्सूनपूर्व पाऊस पडला नाही, तर झाडे शुष्क पडतात आणि अशावेळी वणवा पेटू शकतो. यावेळी नैनितालमधील आग अल्मोडा, टिहरी गढवाल, बागेश्वर, चंपावत आणि पिठोरगड या शेजारच्या जिल्ह्यांत पसरून हजारो झाडे नष्ट झाली. मुळातच आपल्याकडे पर्यावरणाबद्दलची जाणीव जागृती व संवेदना नाही. वाढत्या नागरीकरणाचे आक्रमण मोठे आहे. रस्ते, गृहनिर्माण वसाहतींसाठी, नैसर्गिक क्षेत्र, वने, टेकड्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि झाडे छाटली जातात. पश्चिम घाट खाणकामाने पोखरला जातो आहे. झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाईल, असे आश्वासन देऊनही ते पाळले जात नाही. बेकायदा जंगलतोडीचे प्रमाण मोठे आहे. पर्यावरणाच्या असमतोलाची अशी असंख्य कारणे आहेत. निसर्ग वाचला तर आणि तरच माणूस वाचेल, हे कटू सत्य कळायला आता आणखी वेळ दवडता यायचा नाही!

Back to top button