आली ती घटिका! | पुढारी

आली ती घटिका!

हा हा म्हणता दिवस जात राहिले, प्रचाराच्या तोफा धडाडत राहिल्या आणि पहिल्या टप्प्यातील मतदान पारसुद्धा पडले. आता दुसरा, तिसरा ते सातवा टप्पा संपेपर्यंत मतदान होत राहील. त्यानंतर उत्सुकता असेल ती 2 जून रोजी लागणार्‍या निकालाची. घरोघरी जाऊन प्रचार करणे प्रचंड उन्हाळ्यात जवळपास अशक्य असते. पूर्वी कोपर्‍याकोपर्‍यावर छोट्या-मोठ्या सभा घ्यायचे, तेही आजकाल बंद पडले आहे. जो काय प्रचार करायचा, तो थेट सोशल मीडियावरून केला जात आहे.

त्यात राज्यापुरते बोलायचे तर महायुतीला आणि देशात बोलायचे तर एनडीएला एक ब—ँड अ‍ॅम्बेसिडर सापडलेला आहे. त्याचा प्रचार झंजावत आणि इतर कोणाच्या प्रचाराशी त्याची तुलना संभवत नाही. त्यामुळे जो काय प्रचार होईल तो टीव्ही चॅनलवरून, विविध सोशल मीडियावरून, त्याचबरोबर प्रत्येक पक्षाचे आयटी सेल असतात, त्यांच्यामार्फत खर्‍या-खोट्या बातम्या पसरवून केला जात असतो. खर्‍या-खोट्या म्हणजे खर्‍या बातम्या आपल्या पक्षाबद्दलच्या आणि खोट्या बातम्या विरोधी पक्षाबद्दल पसरविल्या जातात.

बदनामी, अपप्रचार, सवंग बोलणे, बोलताना घसरणे हे सर्व प्रकार या निवडणुकांमध्ये सुरू आहेत. या सर्वांशिवाय या निवडणुकांमध्ये रंगत आणली आहे ती राजकारणाचा खेळखंडोबा करणार्‍या बंडोबांनी. काही बंडखोर तर इतके भाग्यवान आहेत की, त्यांना चक्क दिल्लीवरून किंवा मुंबईवरून स्पेशल विमान घेण्यासाठी आले होते. माढा मतदारसंघातील एका बंडखोराला खास विमानाने सागर बंगल्यावर बोलावले होते. केवढा तो मान? म्हणजे एखाद्या गृहस्थाला थंड करण्यासाठी समुद्रकिनारी बोलावून, त्याला समजावून सांगून किंवा बोचकारून पण शांत करणे भाग आहे. सदरील बंडखोर विमानाने मुंबई येथे पोहोचले खरे, त्याला समजावण्यात पण आले आणि त्यानंतर ते आपल्या गावी पोहोचले आणि दुसर्‍या दिवशी थेट विरोधी पक्षाच्या तंबूत दाखल झाले.

संबंधित बातम्या

याचा अर्थ मानसन्मान कितीही केला तरी बंड करणारा जर बंड करणारच असेल तर आमचे म्हणणे असे की, स्पेशल विमान वगैरे इतका लाखो रुपये खर्च कशाला करायचा? त्यापेक्षा त्याच्यशी फोनवर बोलून एक घाव दोन तुकडे करून घेतलेले बरे राहणार नाही का? परंतु तसे होत नाही. इंजिनचे सर्वेसर्वा नवनिर्माणकर्ते हे पण दिल्लीला स्पेशल विमानाने जाऊन आले. किती खर्च आला असेल? कोणी केला असेल? देव जाणे. आम्हास असे वाटते की, ज्या गोष्टी फोनवरून बोलून करता आल्या असत्या, त्याच्यासाठी इतका प्रचंड खर्च का केला जातो, हे त्यांनाच माहीत. सध्या राज्याच्या अवकाशात विमाने आणि हेलिकॉप्टर सातत्याने घिरट्या घालत आहेत.

राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना अजिबात वेळ नसतो, त्यामुळे ते विमानाने विमानतळापर्यंत आणि तिथून पुढे हेलिकॉप्टरने जात असतात; कारण एका दिवसामध्ये राज्याच्या या भागातून त्या भागात आणि या टोकाकडून त्या टोकाकडे जाताना विमान हेच सर्वात उत्तम वाहन ठरते. तुम्हा-आम्हासारख्या सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडलेला असतो की, या सभांना जमणारी लाखो लोकांची गर्दी ही खरंच त्या नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी आलेली असते काय? एवढ्या उन्हात स्वतःचा जीव धोक्यात घालून, उष्माघाताची पर्वा न करता, गर्दीची पर्वा न करता, किती वेळ लागेल याची चिंता न करता प्रचंड संख्येने सभास्थळाकडे गर्दी करतात.

Back to top button