तडका : विलक्षण इलेक्शन | पुढारी

तडका : विलक्षण इलेक्शन

सध्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे देशभर सर्वत्र प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. आधीच्या खासदाराने काही काम केले आहे का, असे तुम्ही कोणत्याही मतदारसंघात जाऊन विचारा. उत्तर ठरलेले आहे. गेल्या पाच वर्षांत खासदारांनी काहीही केलेले नाही. मग समजा, तुम्ही विचारले की, नेमके कोणते काम केलेले नाही? तर सर्वसामान्य माणसे याचे उत्तर गावातील रस्ते केले नाहीत, गटारी केलेल्या नाहीत, रस्त्यावरचे दिवे बंद असतात अशा स्थानिक समस्या सांगतील. लोकशाही कितीही परिपक्व झाली तरी सर्वसामान्य मतदार बरेचदा त्या पातळीला पोहोचलेला नसतो. तो आपल्या स्थानिक समस्या खासदाराने सोडवायची अपेक्षा करत असतो.

प्रत्येक इलेक्शन वेगळी असते. तसे पहिले तर आपण सर्वसामान्य लोक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुका यांना सामोरे जात असतो. या प्रत्येक निवडणुकीचा उद्देश वेगळा असतो. तुमच्या वसाहतीमधील गटारे साफ करण्याची जबाबदारी ही नगरपालिका पातळीवरील नगरसेवकांची असते. तिथे खासदार फार काही करू शकतील अशी शक्यता नसते. इथे आधी हे लक्षात घेतले पाहिजे की खासदारकीची निवडणूक ही देशाचे म्हणजे केंद्रातील सरकार निवडण्यासाठी होणारी निवडणूक आहे. देशापुढील प्रश्न कोण सोडवू शकतो, हे पाहूनच आपण मतदान केले पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची असते. आपण मतदान करणारा पक्ष किंवा नेता ही जबाबदारी पार पाडतो की नाही, हे आधी पाहिले पाहिजे. विद्यमान सरकारने गेल्या पाच वर्षांत देशांच्या सीमा अबाधित ठेवल्या आहेत की नाहीत, हे तपासले पाहिजे.

दुसरे असते परराष्ट्र व्यवहार. ज्या पक्षाला आपण मतदान करतोय किंवा ज्या राजकीय नेत्याकडे पाहून आपण मतदान करतोय, तो देशाची पत जगामध्ये वाढवू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे असते. परराष्ट्र व्यवहार धोरणामध्ये सतत पडती बाजू न घेता खंबीर निर्णय घेऊन आपल्या विरोधी कारवाया करणार्‍या शत्रूंना आटोक्यात ठेवण्यात ज्याला यश आले आहे, तो पक्ष पुढेही हीच कामगिरी चालू ठेवेल, हा विश्वास ठेवला पाहिजे.

संबंधित बातम्या

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दळणवळण व पायाभूत सुविधा. राज्यमार्गांचे, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे त्याचबरोबर रेल्वेचे जाळे काश्मीर ते कन्याकुमारी ज्या पक्षाने किंवा नेत्याने विणले आहे, साहजिकच त्याला प्राधान्य मिळणार आहे. देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत रेल्वेने जाणे शक्य झाले आहे. रेल्वे सुविधा सातत्याने सुधारित होत आहेत. त्यामधील भ्रष्टाचार कमी होत आहे. रेल्वेमार्गाने किंवा हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गाने देशातील एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे निश्चितच सुखावह झाले आहे, यात शंका नाही. ही सर्व कामे करण्यासाठी आपण खासदार निवडत असतो हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे.

Back to top button