नौदल तैनातीची अपरिहार्यता | पुढारी

नौदल तैनातीची अपरिहार्यता

- सत्यजित दुर्वेकर

भारतीय नौदलाने हिंदी महासागरात 35 युद्धनौका आणि 11 पाणबुड्या तैनात केल्या आहेत. याशिवाय पाच विमानेही गस्त घालत आहेत. नौदलाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी तैनाती आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाल समुद्रात येमेनच्या हुती बंडखोरांच्या आणि समुद्री चाच्यांच्या वाढत्या कारवायांमुळे भारताच्या पश्चिमेला पसरलेल्या विशाल सागरी क्षेत्रात व्यापारी जहाजांच्या वाहतुकीतील अडचणी वाढल्या आहेत.

चीनही हिंद महासागरात आपली उपस्थिती वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. ही आव्हाने पाहता भारताने मोठ्या प्रमाणात युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 10 युद्धनौका उत्तर अरबी समुद्र, लाल समुद्र, एडनचे आखात आणि सोमालियाच्या पूर्व किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. समुद्री चाच्यांचा सामना करण्यासाठी तसेच क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा बळी ठरलेल्या व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी ही जहाजे तैनात करण्यात आली आहेत. उर्वरित युद्धनौका बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण हिंदी महासागरात सक्रिय आहेत. सध्या भारताची पूर्व आणि पश्चिम दोन्ही नौदले पूर्णपणे तैनात आणि सक्रिय आहेत. अरबी समुद्रात नौदलाच्या कारवाईला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांनी म्हटले आहे की, या सागरी क्षेत्रात व्यावसायिक जहाजांची हालचाल सुरक्षित आणि सुरळीत होत नाही तोपर्यंत ही तैनाती कायम राहील. लाल समुद्रातील संकटामुळे व्यापारी जहाजांचा शिपिंग खर्च आणि विमा खर्च लक्षणीय वाढला आहे. अशा स्थितीत आपल्या नौदलाचा उपक्रम जागतिक अर्थव्यवस्थेला आधार देणारा ठरत आहे.

समुद्री चाच्यांची दहशत संपवण्यासाठी भारताने 2022 मध्ये नवीन कायदा केला होता. अलीकडेच एका मोठ्या ऑपरेशननंतर नौदलाने अपहरण केलेल्या जहाजाची सुटका करून 40 सोमालियन समुद्री चाच्यांना पकडले आहे. त्यांच्यावर नव्या कायद्यानुसार मुंबईत कारवाई होणार आहे. भू-राजकीय संकटे आणि चाचेगिरी तसेच चिनी नौदलाच्या वाढत्या कारवायांमुळे हिंदी महासागरातील सुरक्षा आणि स्थैर्याबाबत चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी चीन हे आमचे प्रमुख संरक्षण आव्हान असल्याचे अधोरेखित केले होते. पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटांनी घेरला असला, तरी त्याची लष्करी क्षमता कमी झालेली नाही, असेही ते म्हणाले होते. सध्या हिंद महासागरात चीनची 13 जहाजे गस्त घालत आहेत. यापैकी सहा लष्करी जहाजे आहेत आणि एक उपग्रह ट्रॅकिंग जहाज आहे. चिनी पाणबुड्यांव्यतिरिक्त किमान सहा ते आठ नौदलाची जहाजे या भागात नेहमी फिरत असतात. अशा स्थितीत भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात करणे हे एक आवश्यक पाऊल आहे. जागतिक सागरी व्यापाराच्या नकाशावर अरबी समुद्राचे स्थान कळीचे आहे. बहुतांश व्यापारी जहाजे अरबी समुद्र, तांबडा समुद्र आणि एडनचे आखात या मार्गाने प्रवास करतात.

एडनच्या आखातात सोमाली चाच्यांकडून लूटमार, जहाजांचे अपहरण आणि सुटकेच्या बदल्यात खंडणी हे सत्र सुरू असते. इस्रायल-हमास संघर्ष सुरू झाल्यानंतर या कारवाया प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे चाचेगिरीचा कडवा प्रतिकार क्रमप्राप्त ठरला होता. इस्रायल आणि हमास युद्ध सुरू असताना हुती बंडखोरांकडून सातत्याने जहाजांवर हल्ले होत आहेत. अमेरिकन लष्कराने ठोस कारवाई करूनही त्यांचे हल्ले काही थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी हुती बंडखोरांनी आणि सोमालियन चाच्यांनी एका जहाजाचे अपहरण केले होते. सलग 40 तास मोहीम राबवून भारतीय नौदलाने त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. दुसरीकडे आपला दबदबा निर्माण करण्यासाठी चीननेही आक्रमक भूमिका घेतली आहे. याचा सर्वाधिक धोका भारताला असल्याने समुद्रात आपले लष्करी बळ वाढवण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत.

Back to top button