तडका : महिलाराजची सर्वत्र चलती | पुढारी

तडका : महिलाराजची सर्वत्र चलती

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन हाये. जिकडं पाहताल तिकडं महिला हाईत. पोलिस ठाणं, बसस्थानक, तहसील, निबंधक कार्यालये, मेट्रो… सगळीकडं महिलाराज हाय. आमच्या गावच्या सरपंचापासून ते आमच्या जिल्ह्याच्या कलेक्टरपर्यंत सगळीकडं महिलाच हाईत. आता तर मिलिटरी, नौदल, हवाईदलातही महिला हाईत. देशाच्या पंतप्रधानपदावर महिला होऊन गेल्या हाईत. गडी माणसांच्या नुस्तं खांद्याला खांदा लावून नाही, तर त्यांना मागं टाकून लेडिजबाया पुढं गेल्या हाईत. अवकाशात पण महिला गेल्या हाईत आन जात हाईत. महिला दिनाच्या सर्वांना आभाळभर शुभेच्छा.

खरं सांगायचं तर येगळा म्हंजे शेपरेट असा महिला दिन साजरा करायची गरजच काय, असा आपला पॉईंट आहे. सालाचे 365 दिवस आपण एका महिलेच्या कंट्रोलमध्ये असतो का न्हाई? राजे हो, हे बघा, उगं नाही म्हनून मुंडकं हलवू नका. देश घ्या, राज्य घ्या, जिल्हा घ्या, गाव घ्या, का मग आपलं घर घ्या… समदीकडं महिलांचाच कंट्रोल हाय. आपल्या देशाच्या राष्ट्रपती पण एक महिलाच हाईत म्हनल्यावर बाकी बोलायची गरजच नाही. देशातली टॉपची पोस्ट, पद म्हंजे राष्ट्रपती. त्याच्यावर द्रौपदीताई मुर्मू इराजमान हायेत. सेना, नौदल आन हवाई दल असे तिन्ही सेनादलांचे प्रमुख ताईला कडक सॅल्यूट मारतात; कारन का, तर त्यांचा कंट्रोल राष्ट्रपतींकडे राहतो. आता सांगा, येगळा महिला दिन साजरा करायची काही गरज हाये का?

आता आपल्या घरात बघा, म्हंजे आमचं म्हननं का बाबा, आपापल्या घरात बघा. आईच्यान शपथ घिऊन सांगा की, बाबा आपल्या घरावर कंट्रोल कुनाचा हाये? बायकूच्या म्होरं भले भले नांगी टाकतेत, तिथं तुमची-आमची काय कथा! घरच्या मॅडम जरा का सरकल्या, तर मग लपायलाबी जागा दिसत नाही ना राजे हो. बायकू रागात हाय हे गडी मानसाला कसं कळतं? सोपं हाय ना भाऊ. पईला रट्टा बसतो लेकराच्या पाठीव. जसा का पाठीत रट्टा बसला की, ते भोकाड पसरत रडायला लागतंय. लेकरू रडून थोडं थकलं की, तोपतर माय पुन्ना गरम होती आन दुसरा रट्टा त्याच्या पाठीव मारती. लेकरू मोठ्या आवाजात पिपानी वाजवायला लागतंय. तवा आपन वळखितो की, बाबा पाठ लेकराची हाय; पन रट्टा आपल्यालाच बसल्याला हाये. लेकराचं पाठाड का शेकलं, याचा ईचार केला तर तुमच्या ध्यानात यील की, आपल्या संस्कृतीत नवर्‍याची पाठ बायकूनं शेकायची पद्धत नाही. माय जर लेकराला बडवाय लागली तर हाय का कुणा गडी मानसाची टाप तिला थांबवायची! मग सांगा कंट्रोल कुनाचा हाय? महिलेचाच ना? तर मग कशाला साजरा करायचा येगळा महिला दिन?
येवढंच कशाला, साधी रोजच्या देवपूजेतली गोष्ट घ्या. मत्त्वाच्या देवता कोनत्या हाईत? एक म्हणजे लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे सरस्वती. या दोन देवतांची भक्ती, आराधना केल्याशिवाय काईच होऊ शकत नाही. लक्ष्मी प्रसन्न असणं मस्ट हाय आजच्या काळात. डोस्कं नीट चालन्यासाठी सरस्वती पायजे. या दोन देवता कोन हाईत? महिलाच हाईत ना? मग येगळा महिला दिन साजरा करायचाच कशाला म्हंतो मी. सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लवून कर्तृत्व गाजवताना दिसत आहेत. सगळीकडे महिलांचा बोलबाला आहे. अशा या नारीशक्तीला महिला दिनानिमित्त वंदन!

Back to top button