तडका : जड झाले ओझे | पुढारी

तडका : जड झाले ओझे

आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या डोक्यावरही काही कमी ओझे नसते. बँकांच्या कर्जाचे ओझे असते, कुणाकुणाला बहीण-भावांच्या शिक्षणाचे आणि त्यांच्या लग्नाचे ओझे असते. आपल्या स्वतःच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे ओझे म्हणता येणार नाही; परंतु एक प्रकारचे वजनच डोक्यावर असते. ओझे हलके होत गेले तर बरे वाटते; पण ते जड होत गेले तर पावले वाटचाल करायला नकार देतात किंवा त्यांची गती कमी होते. त्यामुळे ‘जड झाले ओझे’ असे म्हणावे लागते. राजकारणाचा विचार केला तर 80 ते 82 वर्षे वयाचे झालेले वयोवृद्ध राजकीय नेते निवृत्त व्हायला तयार नसतात आणि मग ते ओझे म्हणून त्या पक्षाच्या डोक्यावर बसलेले असतात. पक्ष सत्ताधारी असेल तर राज्यामध्ये ओझे झालेले असे नेते इतर कुठल्या राज्यामध्ये राज्यपालपदी बसवले जातात आणि पक्षाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

तसे पाहायला गेले तर जिद्द हा मराठी माणसाचा एक फार मोठा गुण किंवा दुर्गुण आहे, असे म्हणता येईल. उदाहरण घ्यायचे तर, अमरावती मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीला पराभूत झालेले एक नेते आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ते एका अपक्ष महिला उमेदवाराकडून पराभूत झाले. तेव्हापासून स्वतःच्या वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची एकच जिद्द आहे आणि ती म्हणजे एक ना एक दिवस त्या महिलेला पराभूत करून त्या मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून यायचे. अशा हट्टी किंवा जिद्दी नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या मुलाबाळांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला हे कळत असते की, यांनी आता शांत बसले पाहिजे; पण ते शांत बसायला तयार नसतात. निवडणूक मीच लढवणार आणि झालेल्या पराभवाचा वचपा काढणार, हे एकच त्यांचे उद्दिष्ट असते. वयाच्या या वळणावर ही निवडणूक ते जिंकण्याची शक्यता नाही, हे त्यांच्या पक्षाच्या लक्षात येते; पण हे गृहस्थ समजून घ्यायला तयार नसतात. अशा लोकांचे वर्णन त्यांच्याच पक्षातील लोक ‘जड झाले ओझे’ असे करत असतात.

अशाच प्रकारची ओझी राजकीय लोकांच्या घरात असतात आणि ती म्हणजे त्यांची मुलेबाळे. वडील आमदार, खासदार किंवा मंत्री असतील तर त्यांची मुले शिक्षणामध्ये विशेष रस न घेता वयाच्या 18 व्या वर्षापासूनच तरुण नेतृत्व म्हणून पक्षामध्ये कार्य करायला सुरुवात करतात. ज्याला पुढे राजकारण करायचे आहे, त्यांनी शिक्षण घ्यायचेच कशाला, असा त्यांचा प्रामाणिक विचार असतो. अर्थात, याला काही अपवाद आहेत. सर्वसाधारण राजकीय राजपुत्रांना शिक्षण घेण्याची फारशी गरज वाटत नाही. शिक्षण घेण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मतदारसंघामध्ये मित्रमंडळाच्या माध्यमातून, सामाजिक कार्य करून आपल्या वडिलांचे भावी वारसदार म्हणून ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर फारसा प्रश्न येत नाही; परंतु दोन-तीन मुले आणि चार-पाच पुतणे असतील तर हे सगळे त्या राजकीय नेत्यावर ओझे झालेले असतात. ‘पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ असे हे राजकीय नेते म्हणत असतील. सध्याच्या राजकारणाच्या धामधुमीत कोण कोणावर ओझे झाले आहे, हे समजण्याचा मार्ग नाही. आपण म्हणजे जनता, सगळ्याच राजकीय पक्षांमधील सगळ्याच नेत्यांचे ओझे डोक्यावर घेऊन वावरत असतो.

–  कलंदर

Back to top button