‘घुसखोर’ प्रवाशांचे आव्हान | पुढारी

‘घुसखोर’ प्रवाशांचे आव्हान

प्रतीक्षा पाटील, समाजशास्त्र अभ्यासक

आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी, रेल्वेस्थानकांवर, बसस्थानकांवर, सरकारी कार्यालयांत, बिल भरणा केंद्राच्या रांगेत काही प्राथमिक संकेतांचे पालन न करणार्‍यांची संख्या मोठी आहे. उदाहरणार्थ, रांगेमध्ये न थांबता थेट पुढे जाणे, धूम्रपान करणे, थुंकणे यांसारखी कृत्ये सर्रास पाहायला मिळतात. सार्वजनिक बस सेवेमध्ये राखीव ठेवलेल्या जागांवर स्पष्ट शब्दांत लिहिलेले असूनही अशा जागी काही प्रवासी बिनदिक्कतपणाने जाऊन बसतात.

काही वेळा बसमध्येच नव्हे, तर रेल्वे प्रवासादरम्यान महिलांसाठी राखीव-आरक्षित असलेले आणि डब्याबाहेर स्पष्ट शब्दांत लिहिलेले- चिन्हांकित केलेले असूनही त्या डब्यांमधून पुरुष प्रवासी कसलाही विचार न करता चढतात. अशा डब्यांमधून प्रवास करताना त्यांना कोणी अडवणार नाही, असे मानता येत नाही. तरीही या डब्यांमध्ये घुसून प्रवास करण्याचे धाडस दाखवले जाते. वास्तविक हा गुन्हा आहे. माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये गेल्या पाच वर्षांत महिलांच्या डब्यांमध्ये शिरून प्रवास करताना तीन लाखांहून अधिक पुरुषांना अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. असे सर्वाधिक लोक पश्चिम रेल्वेत पकडले गेले आहेत. काही प्रकरणांमध्ये असे गृहीत धरले जाऊ शकते की, कमी शिकलेले लोक महिलांसाठीचे राखीव डबे ओळखू न शकल्यामुळे, चुकून त्यात चढले असावेत आणि त्यांना याची जाणीव झाल्यावर त्यांनी खाली उतरले नाहीत, कारण रेल्वे पुढे जात होती; पण एका वर्षात सरासरी साठ हजार लोकांबाबत असे घडले असावे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे.

नियमित रेल्वे प्रवास करणार्‍यांचा अनुभव असे सांगतो की, रेल्वेला ‘आपली खासगी मालमत्ता’ मानून दबंगशाही करणार्‍यांची कमी नाही. यामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एका शहरातून दुसर्‍या शहरात जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. संपूर्ण रेल्वे ही खुली जागा आहे आणि त्यातील कोणताही भाग ताब्यात घेणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, अशा आविर्भावात काही प्रवासी वर्तणूक करत असतात. तिकीट काढून प्रवास करणार्‍या प्रवाशांना अनेकदा अशा लोकांच्या  मनःस्तापाचा सामना करावा लागतो. यातील काही जणी महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये प्रवास करू नका, असा सल्ला देण्याचे सौजन्य दाखवतातही; पण त्यांना याबदल्यात कटू अनुभव येतात. असे अनुभव पाहिल्यानंतर कुणीही अशा नियमतोड बहाद्दरांना सांगण्याचे धाडस करत नाही. निमूटपणाने त्यांचा हा कायदेभंग प्रवासी महिला सहन करतात. अशा लोकांवर रेल्वे राखीव दल कठोर कारवाई करते, हे चांगले आहे; परंतु अशा प्रकारांमुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेबाबतचा विश्वास डळमळीत होतो. वरकरणी छोटीशी वाटणारी ही समस्या असली तरी अशा प्रकारांमुळे महिलांसाठी राखीव डबे ठेवण्यामागच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

रेल्वे प्रवाशांबरोबरच सार्वजनिक परिवहन सेवेमध्ये दिव्यांगांसाठी ठेवलेल्या राखीव जागांवरही अनेक प्रवासी अडेलतटट्टूपणाने बसलेले दिसतात. गर्भवती महिलांनाही अनेकदा असा अनुभव येतो. विशेषतः महानगरांमध्ये ही स्थिी हमखास दिसते. गावाखेड्यांमधील बस-एसटी प्रवासात हे चित्र दिसत नाही. ग्रामीण भागातील पुरुष-महिलाच नव्हे, तर अनेकदा शारीरिकद़ृष्ट्या सक्षम असणारे वृद्धही गर्भवती महिलांना, दिव्यांगांना आपले आसन देण्याची तयारी दर्शवतात. शहर-महानगरांमध्ये याबाबतची संवेदनशीलता बोथट झाल्याचे दिसते. हे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारून अशा अडेलतट्टू वागणार्‍या प्रवाशांवर कारवाई करण्याची गरज आहे. शहर असो अथवा ग्रामीण भाग, ही समस्या सार्वत्रिक आहे. वृद्ध, गर्भवती आजारी यासारख्या प्रवाशांबाबत सहानुभूती बाळगून प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे.

Back to top button