नव्या जगाचा कुबेर | पुढारी

नव्या जगाचा कुबेर

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

अनेक लोकसमुदायांच्या समर्पणातून अमेरिकन अस्मिता विकसित झाली आहे. जगप्रसिद्ध अब्जाधीश आणि टेस्लाकार अ‍ॅलन मस्क हे त्याचे एक जिवंत उदाहरण आहे. 21 व्या शतकातील ज्ञानयुगात ज्ञानाचे व्यवस्थापन करून यशोशिखर गाठणारा हा अद्भुत उद्योजक आधुनिक कुबेरच म्हणावयास हवा. तसेच त्यांना भांडवलशाहीचा संस्थापक अ‍ॅडम स्मिथ आणि साम्यवादाचा संस्थापक कार्ल मार्क्स यांना मागे टाकणारे नवे दार्शनिक म्हणावे लागेल.

लक्ष्मी कोणाला, कधी आणि कशी प्रसन्न होईल, हे सांगता येत नाही. आजच्या काळात लक्ष्मी स्थूल व सूक्ष्म या दोन्ही स्वरूपात अस्तित्वात असते. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी अर्थशास्त्राचे वर्णन ‘लक्ष्मी विज्ञान’ असे केले होते. त्यांनी अ‍ॅडम स्मिथ यांनी लिहिलेल्या ‘राष्ट्राच्या संपत्तीची कारणमीमांसा’ या अर्थशास्त्रातील इंग्रजी ग्रंथाचे पहिल्यांदा मराठी भाषांतर केले व त्यास ‘लक्ष्मी-विज्ञान’ असे समर्पक नाव दिले होते. प्राचीन भारतामध्ये कौटिल्य ऊर्फ आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्रावरील जगातील पहिला ग्रंथ मौर्य काळात लिहिला. ते तक्षशीला विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या करताना ‘अर्थ मुलौ धनकाम:’ म्हणजे अर्थ हे सर्व कामांचे मूळ होय, आधार होय, अशी व्याख्या केली होती.

जगप्रसिद्ध अब्जाधीश म्हणून आधुनिक युगात नावारूपाला आलेले अ‍ॅलन रीव्हू मस्क यांच्या श्रीमंतीचे वर्णन उपरोक्त परिप्रेक्ष्यातून करणे सयुक्तिक ठरेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संचालक बिल गेट्स यांच्या मते, नव्या जगामध्ये धनसत्ता आणि बलसत्तेपेक्षा ज्ञानसत्ता ही श्रेष्ठ आहे. याची प्रचिती, मस्क यांच्या कामगिरीवरून येते. जगातील एक श्रेष्ठ व्यापारी गुंतवणूकदार म्हणून त्यांची थोरवी नि:संधिग्धपणे मान्य केली जात आहे. याबाबतीत ते एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व आहेत. मस्क यांचे भाग्य उजळले ते पदार्थ विज्ञान आणि अर्थशास्त्रामुळे. ते ‘स्पेस एक्स’ या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) आहेत. त्यांना गुंतवणूक क्षेत्रातील अद्भुत देवदूत मानले जाते. नव्या जगाचा वेध असलेल्या माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रात ते एक प्रमुख स्थापत्यकार आहेत. टेस्ला इन्कोचे माजी अध्यक्ष असणारे मस्क ‘टेक्स कॉक’चे मालक आहेत. तसेच ‘सिटीओ बोरीस’ या कंपनीचे संस्थापक आणि ‘एआय नुरल निक आणि ओपन एआय’सह अनेक संस्थांचे संस्थापक आहेत. त्यांनी लोककल्याणासाठी मस्क फाऊंडेशन या प्रतिष्ठानचीही स्थापना केली आहे.

ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार डिसेंबर 2023 अखेर 254 अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती धारण करणारे मस्क हे जगातील सर्वात धनाढ्य कुबेर बनले आहेत. अमेरिकेतील नामांकित फोर्ब्स मासिकानुसार 254 अब्ज डॉलर्सची संपत्ती संपादन करून ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’ या कंपन्यांतील सक्रिय भागीदारीमुळे ते जगातील सर्वात श्रीमंत बनले आहेत.

2015 मध्ये त्यांनी जगातील ‘ओपन एआय’ या नामांकित कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन कंपनीची सहस्थापना केली. तो एक नव्या जगातला नवा चमत्कार होता. पुढील वर्षी मस्क यांनी न्यूरॉलिक म्हणजे मेंदू संगणक इंटरफेस प्रणाली विकसित करणारी न्यूरो टेक्नॉलॉजी कंपनी आणि बोरिंग कंपनी-बोगदा बांधकाम कंपनीची स्थापना केली. मानवी मेंदूचा व संगणकाचा संबंध जोडून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा विस्तार केला. 2022 मध्ये त्यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ‘ट्विटर’ कंपनी विकत घेतली. या कंपनीचे नव्याने तयार केलेल्या एक्स कॉर्पोरेशनमध्ये विलीनीकरण केले. पुढच्या वर्षी या सेवांचे नाव ‘एक्स’ असे दिले. मार्च 2023मध्ये त्यांनी ‘एक्स एआय’ या कंपनीची स्थापना केली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नवे धाडसी पाऊल टाकले. जगात कोणत्याही क्षेत्रात धाडसी पाऊल कसे टाकावे आणि एक पाऊल पुढे टाकण्यासाठी एक पाऊल मागे कसे घ्यावे, याचा निर्णय जो घेतो तो खरा नेता असतो, असे लेनीन म्हणत असे. त्याची प्रचिती मस्क यांच्या चरित्रातून येते.

Back to top button