आंध्रातील कौटुंबिक संघर्ष   | पुढारी

आंध्रातील कौटुंबिक संघर्ष  

- के. श्रीनिवासन, राजकीय अभ्यासक

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी राजकीय संघर्षाची धार तीव— करण्यासाठी काँग्रेसने मोठी राजकीय रणनीती आखली आहे. गेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या राज्यात पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती आणि या कारणांमुळे पक्षाने जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस. शर्मिला यांना पक्षात सामील करून राज्यात पक्षाला संजीवनी देण्यासाठी मोठी येाजना आखली आहे.

एकेकाळी शर्मिलाने राज्यात भावाचा राजकीय दबदबा वाढविण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. परंतु आता भावंडांचे राजकीय मार्ग वेगळे झाले आहेत.आगामी काळात काँग्रेसकडून शर्मिलाच्या माध्यमातून भावाविरुद्ध म्हणजेच जगनमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध आंध— प्रदेशात मोठी आघाडी उघडण्याची तयारी केली जात आहे. आंध— प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांना काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या काळात काँग्रेसची राज्यातील स्थिती बळकट होती आणि कालांतराने पक्षाची स्थिती ढासळत गेली. आंध— प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. मात्र 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही. मागच्या विधानसभेला तर काँग्रेसला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता आणि पक्ष शून्यावर येऊन पोचला. दुसरीकडे आंध— प्रदेशात वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी स्वत:ला राजकीयदृष्ट्या बळकट केले. अशावेळी जगनमोहन रेड्डी यांना घेरण्यासाठी काँग्रेसने शर्मिला यांना पक्षात घेऊन मोठी राजकीय चाल खेळली आहे. राज्यात पक्षाला संजीवनी देण्यासाठी चमत्काराची गरज आहे अणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनुसार शर्मिला या करिष्मा घडवण्यात सक्षम राहू शकतात.

कर्नाटक आणि तेलंगणात सत्ता काबीज केल्यानंतर आता दक्षिण भारतात काँग्रेसची राजकीय महत्त्वाकांक्षा आणखी मजबूत झाली आहे. तेलंगणातील विजयानंतर काँग्रेसला आंध— प्रदेशातही मोठी संधी वाटत आहे. शर्मिला यांना तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पक्षात घेण्याच्या हालचाली होत्या. मात्र त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी काही प्रमाणात विरोध केल्याचे बोलले जात होते. मात्र सर्वांशी चर्चा झाल्यानंतर शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तत्पूर्वी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या शर्मिला यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यामुळे त्या काँग्रेस पक्षात सामील होतील आणि आपला पक्षही काँग्रेसमध्ये विलीन करतील, असे वाटू लागले आणि तसेच घडले.

काँग्रेसमधील तज्ज्ञांच्या मते, काँग्रेसने आगामी काळ पाहता शर्मिला यांना पक्षात सामील करून घेतले आहे. एवढेच नाही तर शर्मिला यांना कर्नाटकातून राज्यसभेच्या सदस्या म्हणून घेण्याची शक्यता आहे. एकूणच शर्मिला यांना आंध—ातील मोठी जबाबदारी सोपवत काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाईल.

शर्मिला यांना काँग्रेसमध्ये घेत पक्षाने मोठी रणनीती आखली आहे. शर्मिला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी शर्मिला यांनी तेलंगणातील विजयाबद्दल पक्षाने दिलेल्या योगदानाबाबत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, माझे वडील वायएसआर रेड्डी यांनी राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत असे स्वप्न पाहिले होते. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणतीही कसर ठेवणार नाही. काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे सांगत हा पक्ष देशातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करतो, असेही नमूद केले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, शर्मिला यांना काँग्रेस पक्षात सामील करून पक्षाने मोठी राजकीय खेळी केली आहे. आता आंध— प्रदेशच्या राजकीय संघर्षात बहीण आणि भावाचा रंजक संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

Back to top button