तडका : फक्त बोलू नका… | पुढारी

तडका : फक्त बोलू नका...

हे बघा राऊत दादा, आम्ही तुम्हाला तिळगूळ द्यायचं ठरवलं आहे. थोड्याच वेळात दोन्ही उपमुख्यमंत्री येतील. हे काय आलेच. या देवाभाऊ या, दादा या, राऊत साहेबांना तिळगूळ द्या!

तुमच्याकडून तिळगूळ घ्यायला मला काय वेड लागलं आहे का? आधीच सकाळी टीव्हीवर ओरडून ओरडून माझा घसा बसायची वेळ आली आहे. त्यात पुन्हा काल झालेली महापत्रकार परिषद. अहो, पुतीन आणि बायडेन पण सगळी कामे सोडून टीव्हीसमोर बसले होते.
अहो राऊतदादा, ते राजकारण ठेवा बाजूला. हा घ्या आमचे तिळगूळ. गोड गोड बोला. नाही गोड बोलता आले, तर कमीत कमी बोलू तरी नका. महाराष्ट्रात राजकारण बिघडून गेले आहे तुमच्यामुळे.

सगळा दोष माझ्यावर टाकायला फार हुशार आहात. घड्याळवाला पक्ष फोडलात, आमचा धनुष्यबाण पळवला, पक्ष पळवला, आमदार पळवले, खासदार पळवले. कसले राजकारण करताय तुम्ही? आणि पुन्हा माझ्यासमोर तिळगूळ घेऊन आला आहात. तुम्हाला काही वाटते की नाही?

संबंधित बातम्या

दादा, तुम्ही तरी समजावून सांगा राऊत दादांना!

अहो राऊतसाहेब, मागच्या वर्षी आपण दोघांनी तिळगूळ दिला की नाही एकमेकांना? मग, यावर्षीच तिळगूळ का नाही म्हणताय? अहो, लाडूचा एखादा घास घ्यायचा आणि गपकन खाऊन टाकायचा. आहे काय अन् नाही काय?

हे बघा दादा, तुम्ही मोठ्या-मोठ्यांना झास्यात आणू शकता; पण मला नाही. हा मावळा आहे. कधी गनिमीकाव्याने, कधी शब्दमाराने, जसे जमेल तसे तुम्हाला जेरीस आणले की नाही एवढे सांगा. आधी आपला पराभव मान्य करा. रणांगणामध्ये पांढरे निशाण फडकवू द्या. तुम्ही शरण आला आहात, असे समजले तरच मी आणि आमचे साहेब दोघे तिळगूळ घ्यायला तयार होऊ. नाही तर कधीच घेणार नाही, कदापिही नाही. यावर्षी तर आमच्या साहेबांनी युवराज आणि राजमाता यांचाही तिळगूळ घेतलेला नाही. यावर्षी तिळगूळ नाही म्हणजे नाही. गोड बोलणे नाही म्हणजे नाही.

अहो, असा काय आक्रस्ताळेपणा करताय? ते राजकारण, टीव्ही, मीडिया बाजूला ठेवा. व्यक्तिगत तुमचे आमचे संबंध होतेच ना? आता मी तुमच्या शिवसेनेत होतो. हा जसा आहे तसाच होतो. तेच पांढरे कपडे, तीच काळीशार दाढी, माझ्यात काहीच फरक पडला नाही. तेव्हा आपण दररोज एकमेकांना तिळगूळ देत होतो. आता तुम्ही म्हणजे दुर्मीळ झाला आहात. तुम्हाला पाहायचे म्हणजे सकाळी नऊ वाजता टीव्ही लावावा लागतो, तेव्हा कुठे तुमचे दर्शन होते. देवाभाऊ, मी तुमच्याकडून तिळगूळ घेतला हे मोठ्या साहेबांना कळाले, तर मला घरी बसावे लागेल. मी तुमच्याकडून तिळगूळ घेतल्याबरोबर काही क्षणात संजय राऊत युतीमध्ये सामील, अशी बातमी येईल आणि तसे मी कधीच होऊ देणार नाही. चला, येतो!

-कलंदर

Back to top button