मालदीवचा माज | पुढारी

मालदीवचा माज

मालदीव प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान 26 बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत मालदीव हा आशियातील सर्वात छोटा देश. माले ही मालदीवची राजधानी आणि त्या देशातील सर्वात मोठे शहर. लोकसंख्या चार लाख आणि क्षेत्रफळ 298 किलोमीटर. थोडक्यात, या देशाची भारताशी तुलनाच होऊ शकत नाही! भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, तर मालदीवला ब्रिटिश साम्राज्यापासून 1965 साली स्वातंत्र्य मिळाले.

70 टक्के अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून. मात्र एखाद्या काडी पैलवानाने अकारण तगड्या मल्लाची खोडी काढावी, त्याप्रमाणे मालदीव बेछूट वागत आहे. तेथे 2008 मध्ये मोहम्मद नशीद राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. पण चार वर्षांत त्यांच्या विरोधात बंडखोरी झाली आणि त्यांना पदावरून बाजूला व्हावे लागले. अडीच वर्षांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष नशीद यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. नशीद हे कट्टरवादी इस्लामिक विचारसरणीचे विरोधक मानले जातात. 2008 साली मालदीवमध्ये दीर्घकाळ राष्ट्राध्यक्ष पदावर राहिलेल्या मौमून अब्दुल गयूम यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून या देशाच्या राजकारणात असलेले अस्थैर्य कायम आहे. मालदीवचे पित्त खवळण्यामागील तकलादू कारण लक्षात घेतले तर या देशाच्या राजकारण्यांच्या कृतीची कीव करावी अशी परिस्थिती! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार जानेवारीला लक्षद्वीप बेटाजवळ अरबी समुद्रात सैर केल्याची आणि किनार्‍यावर फेरफटका मारत असल्याची काही छायाचित्रे आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स समाज माध्यमांवर व्हायरल झाली.

देशविदेशांतील पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट द्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. परंतु मरियम शिऊना, माल्शा शरीफ आणि महजूम माजिद या मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी मोदी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मोदींनी समाजमाध्यमांवरील संदेशात मालदीवचे नावही घेतले नसताना, त्यांनी लक्षद्वीपची मालदीवशी तुलना केली आणि तशी तुलनाच होऊ शकत नाही, अशी भूमिका या मंत्र्यांनी घेतली. गलिच्छ स्वरूपात मोदी यांच्यावर हल्लाही चढवला. त्या देशातील निर्बुद्ध अशा ट्रोलर्सनी या पुढची पायरी गाठली. परराष्ट्र संबंधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल तसा धिंगाणा घालता येत नाही. एकमेकांच्या देशांबद्दल व देशाच्या नेत्यांबद्दल टीका-टिप्पणी करताना मर्यादा बाळगावी लागते. भाषेत संयम व सभ्यता असावी लागते. या मंत्र्यांनी ही लक्ष्मणरेषा ओलांडल्यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे साहजिक होते. देशातील नागरिकांनी ती तिखट शब्दांत दिलीही. भारताशी पंगा घेणे भारी पडेल, हे उशिरा का होईना, लक्षात आले. भारताच्या पंतप्रधानांवर मनमानी टीका करणार्‍या तीन मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली. पुढे एवढे रामायण घडल्यानंतर मुईझ्झू लगेच चीनच्या भेटीसाठी रवानाही झाले.

निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार मोहम्मद मुईझ्झू यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारताने मालदीवमध्ये पाठवलेले लष्करी जवान परत बोलवून घ्यावेत, अशी विनंती मोदी सरकारला केली आहे. भारताबरोबरच्या हायड्रोग्राफिक सर्वेक्षण कराराचे नूतनीकरण करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. एवढेच नव्हे, तर भारताला वाकुल्या दाखवत, आम्ही चीनशी अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणार, असेही वेळोवेळी सूचित केले आहे. मुईझ्झू सत्तेवर येऊन सव्वा वर्षही झालेले नाही. त्यांचा पक्ष म्हणजे प्रोग्रेसिव्ह अलायन्स. या पक्षाचे प्रमुख अब्दुल्ला यामीन यांना लाचखोरीबद्दल शिक्षा झाल्यामुळे त्यांचे पट्टशिष्य मुईझ्झू यांना राष्ट्राध्यक्षपद लाभले. यामीन यांच्याप्रमाणेच मुईझ्झू हे भारतविरोधी आहेत. परंतु या प्रकारच्या भारतविरोधी कारवाया केल्यास त्याचा फटका मालदीवलाच बसू शकतो. भारतातून दरवर्षी लाखो पर्यटक मालदीवला जातात आणि त्यामध्ये अनेक सेलिब्रिटीसुद्धा असतात. मालदीवमधील 11 टक्के पर्यटक भारतीय असतात. मालदीवच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचा वाटा 25 टक्के आहे.

उद्या भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली, तर त्या देशाचे होणारे नुकसान प्रचंड असेल. यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोली हे भारताचे समर्थक होते. भारताशी संबंध वृद्धिंगत करण्याचे त्यांचे धोरण होते. वास्तविक मालदीवचे भारताशी खूप पूर्वीपासून सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. हिंदी महासागरातील मालदीवचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे असून, तेथे चीन आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. आखाती देशांमधून होणारी तेलाची वाहतूकदेखील मालदीवमार्गेच होत असल्याने चीनसाठी हा देश खूप महत्त्वाचा आहे. 2013 ते 2018 पर्यंत प्रोग्रेसिव्ह पार्टीचे अब्दुल्ला यामीन हे राष्ट्राध्यक्षपदी होते, तेव्हा त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी अनेक देशांनी वारेमाप कर्जे घेऊन स्वतःच्या अर्थव्यवस्था धोक्यात आणल्या आहेत. मालदीवने चीनकडून एक अब्ज डॉलरचे कर्ज घेतले असून, चीनने तेथील पायाभूत प्रकल्पांत मोठी गुंतवणूक केली आहे.

आठ वर्षांपूर्वी मालदीवने त्यांचे एक बेट चीनला पन्नास वर्षांसाठी केवळ 40 लाख डॉलर्स इतक्या भाड्याने दिले. भारताने गेल्या काही वर्षांत दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची कर्जे आणि अर्थसहाय्य मालदीवला दिले आहे. तरीदेखील मालदीव भारताकडे संशयाने पाहात आहे, हे संतापजनक आहे. खरे तर, चीनशी दोस्ती करताना मालदीवला भारताशी दुश्मनी करण्याचे काहीएक कारण नाही. परंतु भारताशी शत्रुत्व हाच मालदीवच्या चिनी मैत्रीचा आधार असला, तर काय बोलणार? या देशातील निर्बुद्ध राजकारण्यांनी भारतविरोधी पाऊल उचलताना स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे. ही चूक देशाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. त्याची चुणूक भारतातील पर्यटकांनी तीव्र प्रतिक्रिया देत दाखवली आहे. हा अंतिम पर्याय नसला आणि हा छोटा शेजारी भारताला हवाच असला तरी मालदीवला लवकरात लवकर शहाणपण येवो, ही अपेक्षा!

Back to top button