सोन्याचे अर्थकारण चमकणार | पुढारी

सोन्याचे अर्थकारण चमकणार

अभिजित कुलकर्णी, अर्थघडामोडींचे अभ्यासक

राजकीय संकट, अन्य कारणांमुळे नागरिकांचा गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांवरचा विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केल्यास पैसे सुरक्षित राहतील, ही प्राचीन लोकभावना पुन्हा घट्ट होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत झाल्याने 2024 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वाढू शकते.

भारतात सोने हे नेहमीच सुरक्षित आणि फायद्याची गुंतवणूक राहिलेली आहे. संकटाच्या काळात त्याच्या मागणीत आणखीच वाढ होते. कारण सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित असण्याबरोबरच चांगला परतावा देणारीही आहे. महागाई दर नियंत्रित ठेवण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून 2024 मध्ये व्याजदरात कपात करण्याची आशा, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट या कारणांमुळे सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. साधारणपणे जगभरातील सर्व देशाच्या केंद्रीय बँका फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पावलावर पाऊल टाकतात. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल, तेव्हा दुसर्‍या देशांतील केंद्रीय बँकाही व्याजदरात कपात करतील. त्यामुळे कर्ज आणि ठेवीवरच्या व्याजदरात कपात होईल. ठेवीवरच्या व्याजदरात कपात होईल, तेव्हा चांगल्या परताव्यासाठी नागरिक सोन्याकडे वळतील. आज सोन्याच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. 2023 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणार्‍यांना 16.4 टक्के दराने परतावा मिळाला आणि तो बँक किंवा अन्य सुरक्षित गुंतवणुकीच्या तुलनेत खूपच चांगला आहे.

गेल्या दहा वर्षांत सोन्याने 105 टक्के परतावा दिला तर जागतिक बाजारात सोन्याची किंमत ही 63 टक्क्यांनी वाढली. जून 2008 मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही 11,901 रुपये होती, तर जून 2014 मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत 25,924 रुपये होती. त्याचवेळी जून 2017 मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत 29,499 रुपये होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्यात अभूतपूर्व वाढ झाली आणि ही किमत 56,499 वर पोहोचली. ऑक्टोबर 2023 मध्ये ही किंमत 63,332 वर पोहोचली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔन्स 2050 डॉलर होता. सोन्यात गुंतवणूक करणार्‍या लोकांत वाढ होत असून, ती 2024 च्या अखेरपर्यंत दहा ग्रॅम सोन्याची किंमत 70 हजार रुपये होण्याची शक्यता आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔन्स 2400 डॉलर होईल. सोन्याच्या किमतीत गेल्या पाच दशकांतील चढउतार पाहता अशा प्रकारची स्थिती आगामी पाच-सहा वर्षांतही राहू शकते. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमती आणखी उच्चांकी पातळीवर राहू शकतात, असे अंदाज बांधले जात आहे.

‘बोफा’ नावाच्या जागतिक संशोधन संस्थेनुसार जगभरातील केंद्रीय बँकांनी 2022 आणि 2023 मध्ये बर्‍याच प्रमाणात सोने खरेदी केले. 2022 मध्ये प्रथमच केंद्रीय बँकांनी एक हजार टनपेक्षा अधिक सोने खरेदी केले. 2023 मध्येही केंद्रीय बँकांनी एक हजार टनपेक्षा अधिक सोने खरेदी केले असून, ते 2021 च्या तुलनेत अडीचपट अधिक आणि 2020 पेक्षा चारपट अधिक आहे. सध्याच्या काळात जगभरातील सर्व केंद्रीय बँकांच्या राखीव कोट्यात वीस टक्के भागिदारी सोन्याची आहे. सप्टेंबर 2023 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने नऊ टन सोन्याची खरेदी केली, तर पीपल्स बँक ऑफ चायनाने डिसेंबर 2023 मध्ये 23 टन सोने खरेदी केले. ऐतिहासिक आकड्यांच्या विश्लेषणाच्या आधारावर 2024 मध्ये जगभरातील सर्व केंद्रीय बँका आपल्या ठेवीची व्याप्ती वाढविण्यासाठी सोन्याची खरेदी करू शकतात. कोरोना काळ, जागतिक अनिश्चितता आणि जागतिक अर्थव्यवस्थेत राहणारी संवेदनशीलता पाहता अमेरिकेसह अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती ही संथ राहिली आहे. त्याचवेळी हमास आणि इस्रायल संघर्ष, यामुळे मध्य पूर्व भागात तणावाचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी नागरिक सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

अर्थात, भारत यास अपवाद आहे. कारण या ठिकाणी मंदीतही आणि अर्थव्यवस्था ही चांगली राहत असतानाही सोन्यात गुंतवणुकीचा ट्रेंड राहतो. कारण भारतात प्राचीन काळापासून सोन्यात गुंतवणूक करण्याची परंपरा राहिली आहे. भारतात डिसेंबरपासून लग्नांचा हंगाम सुरू झाला आहे आणि सोन्यांच्या किमतीत वाढ झालेली असतानाही नागरिक आपल्या आर्थिक स्थितीनुसार कमी-जास्त प्रमाणात सोन्याची खरेदी करत असतात आणि करत आहेत. यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात सोने हे नेहमीच ‘सोने’ राहिले आहे. कारण भारतातील महिला सोन्याबाबतीत खूपच उत्साही असतात आणि हा अनुभव अनेक काळापासूनचा आहे. प्राचीन काळात तर महिलांसमवेत पुरुषही सोन्याचे दागिने घालत असत.

भारतात सोन्याची मागणी ही स्थानिक पातळीवर पूर्ण करता येत नसल्याने दुसर्‍या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे भारताने देशांतर्गत सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी 2022 मध्ये सर्वाधिक सोने चीनमधून आयात केले, तर 2021मध्ये स्वीत्झर्लंडकडून. अर्थात जागतिक अनिश्चिततेमुळे भारतात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सोन्याच्या आयातीत 24.15 टक्के घट झाली आणि ही घट 35 अब्ज डॉलरवर आली. मात्र, ही तात्पुरती स्थिती आहे. यात बदल झाल्यानंतर भारत पुन्हा सोन्याची आयात करू शकतो. सध्या महागाई अधिक असल्याने आणि शेअर बाजार वगळता बँकिंग आणि अन्य आर्थिक क्षेत्रात ठेवीवरील व्याजदर कमी राहत असल्याने तसेच भू-राजनैतिक संकटासह अन्य कारणांमुळे नागरिकांचा दुसर्‍या गुंतवणुकीवर विश्वास राहिलेला नाही. अशावेळी सोन्यात गुंतवणूक करून पैसे सुरक्षित ठेवू शकतो आणि चांगला परतावा मिळू शकतो, असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.

Back to top button