तडका : बाय बाय मालदीव… | पुढारी

तडका : बाय बाय मालदीव...

मालदीवला जवळचा शेजारी म्हणून भारताने सातत्याने मदत केली होती. पायाभूत सुविधा निर्माण करण्यापासून ते पिण्याचे पाणी कमी पडल्यानंतर तेही पुरवण्यापर्यंत भारताने या देशाला मोठ्या भावासारखी मदत केली. दक्षिण आशियात एक मित्र असावा आणि त्याच्याशी संबंध चांगले असावेत हा आपल्या देशाचा प्रयत्न होता. एवढेच नव्हे तर शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी भारताने लष्करही मालदीवच्या दिमतीला तयार ठेवलेले होते. अशा या मालदीव देशाला 2022 या वर्षी एक नवीन सत्ताधारी भेटला, जो भारतविरोधी होता. चीनच्या कच्छपी लागलेल्या देशांचे जे होते, ते मालदीवचे होण्यास सुरुवात झाली. नवीन निवडून आलेला सत्ताधारी चीनधार्जिणा होता. सत्तेच्या सिंहासनावर बसताच या उर्मट गृहस्थाने भारताचे महत्त्व कमी करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराला तत्काळ मालदीवमधून निघून जाण्यास सांगण्यात आले. इथपर्यंत सगळे ठीक होते.

नुकत्याच झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा संदर्भ देत नव्या मंत्रिमंडळातील काही बेताल मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह असे शेरे मारले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्याचवेळी आपल्याच देशाचा भाग असणार्‍या लक्षद्वीप या नितांतसुंदर निसर्गरम्य समुद्रकिनार्‍यास पंतप्रधानांनी भेट दिली. लक्षद्वीपला भेट द्या, असे त्यांनी सोशल मीडियावर आवाहन केले. पंतप्रधानांच्या या भेटीवर मालदीवमधील बिनडोक मंत्र्यांनी शिवराळ भाषेत टीका केली.

पंतप्रधान कोणीही असो, तो आपल्या विचाराचा असो की नसो, पण तो देशाचा पंतप्रधान असतो आणि देशाच्या पंतप्रधानाचा आपणच मदत केलेल्या छोट्याशा देशाने धार्मिक कारणावरून केलेला अपमान देशवासीयांना दुखावून गेला. मालदीवमध्ये येणार्‍या पर्यटकांपैकी भारतीय लोकांची संख्या जवळपास 80 टक्के होती. ‘बायकॉट मालदीव’ म्हणजे मालदीवला जाणेच नको, ही भावना जेमतेम 12 तासांमध्ये देशभर पोहोचली. कधी नव्हे ते फिल्मी सितारे यांनीही तत्काळ मालदीवचा निषेध केला. अवघ्या काही तासांत आठ हजारपेक्षा जास्त लोकांनी मालदीवमधील हॉटेल बुकिंग रद्द केले. 25 हजार पेक्षा जास्त विमान तिकिटे रद्द केली आणि यापुढे मालदीवला जायचे नाही, असे कोणीही न सांगता भारतीय जनतेने ठरवले.

पर्यटनावर होणारा परिणाम लक्षात येताच मालदीवच्या सरकारने पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टिप्पणी केलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारतीय जनसामान्यांचा हा बुलंद आवाज मालदीवची अर्थव्यवस्था खिळखिळी करून गेला. बेटांवरील हॉटेल्स रिकामे पडण्यास सुरुवात झाली. आपली मदत करणार्‍या आपल्याच एका मित्राच्या पाठीत आपण खंजीर खुपसतोय आणि तेही अत्यंत बलाढ्य अशा मित्राच्या, हे मालदीव हा देश विसरला. धार्मिक आंधळेपणाची पट्टी डोळ्यावर चढविल्यानंतर भविष्य धूसर होते आणि रस्त्यावर यावे लागते हे मालदीवमुळे सर्व जगाला दिसून आले. आणखी पाच वर्षांनंतर कोणे एकेकाळी मालदीव नावाचा देश आपल्या निसर्गसुंदर समुद्रकिनार्‍यांमुळे पर्यटकांनी भरलेला होता, असे म्हणावे लागणार आहे.

Back to top button