नवे सूर अन् नवे तराणे | पुढारी

नवे सूर अन् नवे तराणे

वर्ष नव, हर्ष नव,
जीवन उत्कर्ष नव,
नव उमंग, नव तरंग,
जीवन का, नव प्रसंग

हरिवंशराय बच्चन यांची ही प्रसिद्ध कविता. नवीन वर्ष हे नवोन्मेषाचे आणि उल्हासाचे जाईल, याची खात्रीच आपण बाळगू या. विकास आणि वारसा यांची शक्ती देशाला पुढे नेऊ शकते. तो विश्वास वर्ष सरताना जागवला गेला. येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील नवीन राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा विशेष दिवस ‘दिवाळी’सारखा साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी घरोघरी दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशातली सर्व मंदिरे व तीर्थक्षेत्रे स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले असून, त्यास नक्कीच प्रतिसाद द्यायला हवा. त्याचे कारण आपल्याकडील काही अपवाद सोडता मंदिरे, प्रार्थना स्थळांचा परिसर गलिच्छ असतो. त्यामुळे त्या शहराची आणि देशाची मान खाली जात असते. हे स्थानिक मंदिर प्रशासनाने आणि सामान्यजनांनीही लक्षात घेतले पाहिजे.

वर्षाची सुरुवातच एक्स-रे पोलरीमीटर उपग्रहाच्या (एक्स्पोसॅट) प्रक्षेपणाने झाली. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या खगोलीय निर्मितीमागील गूढ उकलण्याचा प्रयास केला जाणार आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) सी 58 आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्स्पोसॅट’सह, दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. अवकाश-आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्रोतांकडून क्ष-किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिलाच समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे. आजवर अनेक दशके ‘इस्रो’ने नेहमीच भारताची मान उंचावेल, अशी कामगिरी करून दाखवली आहे.

नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ठाण्यामधील घोडबंदर परिसरातील कासारवडवली भागात खाडीकिनारी रेव्ह पार्टी झाल्याचे उघडकीस आले. अशा अनेक रेव्ह पार्ट्या आणि ड्रग्जसेवनाचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात तरुण मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या आहारी जात असून, ‘उडता महाराष्ट्र’ होऊ नये, म्हणून केवळ पोलिसांनीच नव्हे, तर पालकांनी आणि समाजानेही खबरदारी घेतली पाहिजे. पूर्वी केवळ श्रीमंतांच्या मुलांमध्येच याचे आकर्षण होते. आता ते मध्यमवर्गापर्यंत पसरू लागत असल्यास, ती गंभीर गोष्टच मानायला हवी. 2024 मध्ये विशेषतः देशातील युवा वर्गाने समाजमाध्यमांचा अतिवापर टाळला पाहिजे. कारण त्यामुळे अस्सल जगापासून माणूस तुटतो आणि एका आभासी जगातच वावरू लागल्यामुळे, मानसिक प्रश्न निर्माण होतात.

देश प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करत असताना, दुसरीकडे पाकपुरस्कृत दहशतवाद पुन्हा पुन्हा डोके वर काढतो आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच फुटीरतावादी दिवंगत नेता सय्यद अली शहा गिलानी याने स्थापन केलेल्या तेहरिक-ए-हुर्रियत या पाकिस्तानवादी संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली. गिलानीने हयातभर पाकिस्तानच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात फुत्कार सोडले. जम्मू-काश्मीरमध्ये भारतविरोधी भावना पसराव्यात, म्हणून ही संघटना नाना उपद्व्याप करते आणि दहशतवादी कारवायांनाही खतपाणी घालते. हुर्रियत नाही, तर ज्या संघटना देशद्रोहात सहभागी आहेत, त्यांच्या मुसक्याच आवळल्या पाहिजेत.

2024 हे वर्ष जगभरच निवडणुकांचे वर्ष असेल. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून तैवान, बांगलादेश, पाकिस्तान अशा एकूण 40 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. भारतात एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुका होतील आणि महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरात विधानसभा निवडणुका असतील. याखेरीज, महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

निवडणुका असल्या, की अनेकदा लोकानुनयी निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. तो मोह केंद्र व राज्य सरकारांनी टाळला पाहिजे. भारताच्या वेगाने वाढणार्‍या कर्जाविषयी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पूर्वइशारा दिला आहे. 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाच्या शेवटी भारत सरकारच्या डोईवरील कर्ज सुमारे 155 लाख कोटी रुपये, म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत 58 टक्के इतके होते. शिवाय बिहार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळ, गोवा, पश्चिम बंगाल अशा एकूण 12 राज्यांची वित्तीय प्रकृती अत्यंत दुबळी असल्याचेही नाणेनिधीने म्हटले आहे. महाराष्ट्रातही कमालीच्या चुरशीची राजकीय स्पर्धा असल्यामुळे सत्ताधारी पक्षांना बेबंदपणे खर्च करण्याचा मोह होऊ शकतो. त्यास आळा घातला पाहिजे.

या वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एकेकाळी अविकसित समजले जाणारे उत्तर प्रदेशसारखे राज्य हे यंदा कर्नाटकास मागे टाकून, देशातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, अशी चिन्हे आहेत. 2023 मध्ये भारतातील शेअर बाजाराचे मूल्य 26 टक्क्यांनी वाढून, 4.2 ट्रिलियन डॉलर्सवर जाऊन पोहोचले. आपण हाँगकाँगलाही मागे टाकले. 2024 मध्ये पाच ट्रिलियन डॉलर्सची सीमा आपण खात्रीने पार करू, असे दिसते. याच वर्षात देशातील अन्नधान्य आणि फळे व भाज्यांचे उत्पादन 70 कोटी टनांपेक्षा जास्त होईल, अशी अटकळ कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 2024-25 मध्ये जागतिक व्यापार वाढणार आहे. कारण प्रगत देशांमधील मंदी आता संपत आली आहे.

भारताच्या जीडीपीच्या 40 टक्के इतक्या प्रमाणात आपला परदेश व्यापार आहे. यंदा दोन ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आयात-निर्यात व्यापार व्हावा, असे आपले लक्ष्य आहे. जागतिक बँकेच्या निकषांनुसार, दहा टक्के किंवा 14 कोटी भारतीय गरीब आहेत. नीती आयोगाने 12 इंडिकेटर्स किंवा निदेशक निश्चित केले असून, त्यानुसार 15 टक्के भारतीय (21 कोटी) दारिद्य्ररेषेखालील जीवन जगत आहेत. या लोकांना दारिद्य्ररेषेबाहेर आणण्यासाठी नेटाने प्रयत्न झाले पाहिजेत. नवी उमेद जागवतानाच, चहूबाजूला सगळे काही छान छान चालले आहे, असा भाबडा दृष्टिकोन असता कामा नये. आजूबाजूला जे दीन, दुःखी लोक आहेत, त्यांनाही आयुष्याची मजा कशी चाखता येईल, हे बघायला पाहिजे. केवळ एकमेकांवर चिखलफेक न करता, राजकीय नेत्यांनी मागे राहिलेल्यांना पुढे आणण्याचा विचार केला, तरी पुष्कळ आहे. ‘पुढारी’च्या सर्व वाचकांना व हितचिंतकांना नववर्षाच्या शुभेच्छा!

Back to top button