दाऊदचा चौथा मृत्यू! | पुढारी

दाऊदचा चौथा मृत्यू!

बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या 6 डिसेंबर 1992च्या घटनेनंतर डिसेंबर 1992 आणि जानेवारी 1993 मधील भीषण दंगलींच्या दाहातून मुंबई कशीबशी सावरली असताना लगेचच 12 मार्च 1993 रोजी मुंबईत विविध ठिकाणी 13 शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यात अडीचशेच्या वर नागरिक मारले गेले. 1400 जखमी झाले. मुंबईतील दंगलींत जसा अंडरवर्ल्डचा सहभाग होता, तसाच बॉम्बस्फोटाच्या कटात दाऊद, याकूब मेमन, टायगर मेमन, अनीस इब्राहीम  प्रभूतींचा हात होता. 1980च्या दशकापासून दाऊद गँगने मुंबईत खंडणीसत्र आरंभले आणि खूनबाजीही सुरू केली. दाऊदचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांशी लागेबांधे असल्याचे तेव्हापासून मानले जात होते. दाऊद इथून दुबईला पळून गेला आणि शारजाह येथे क्रिकेट सामन्याला हजेरी लावू लागला. बॉलीवूडमधील अनेक निर्मात्यांना तसेच कलाकारांना धमकावून पैसे उकळण्याचा राजरोस धंदा त्याने सुरू केला. अनेक वर्षांपूर्वी डी गँगच्या पार्टीत मुंबईतील बडे बडे कलाकार सहभागी झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. डी गँगचा फोन आला की, मुंबईतील बिल्डर्सचा भीतीने थरकाप उडत असे. काही वर्षांपूर्वी दाऊदला हृदयविकाराचा झटका आला आहे, त्याला गँगरीन झाले आहे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दाऊदच्या मृत्यूच्याही बातम्या छापून आल्या होत्या आणि आता तर त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची अफवा होती आणि लगोलग त्याचा इन्कारही करण्यात आला. त्याचा हा न झालेला चौथा मृत्यू! दाऊद सध्या कराचीत अब्दुल्ला गाझीबाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला असलेल्या संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहत आहे. इस्लामाबादेतही त्याचे दुसरे निवासस्थान असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानचे लष्कर, आयएसआय तसेच तेथील दहशतवादी संघटनांनी पुरवलेल्या कडोकोट बंदोबस्तात तो लपल्याचे सांगण्यात येते. हा जगातील मोस्ट वाँटेड दहशतवादी असून, त्याला भारतात फरफटत आणू, अशी गर्जना महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. परंतु, त्यांना व त्यानंतर कोणत्याही सरकारला अद्याप हे शक्य झालेले नाही. दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी तमाम देशवासीयांची इच्छा आहे. गेल्या तीस वर्षांत ते शक्य झालेले नाही; मात्र दाऊदवरून केवळ राजकारणच होत आले. एकेकाळी 27 एप्रिल ते 19 जून 1992 दरम्यान मंत्रालयाच्या कार्यालयातून दुबईतील वेगवेगळ्या फोन नंबरवर संपर्क साधण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली आणि गृह खात्याकडून त्याची चौकशीही करण्यात आली. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हाच्या काँग्रेस सरकारवर तुफानी हल्ला चढवला. संपर्क करणार्‍या व्यक्ती या शरद पवार यांच्या जवळच्या असून, पवारांचा थेट दाऊदशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही मुंडे यांनी केला. निवडणुकीत जिंकून सरकार स्थापन झाल्यास आम्ही चौकशी करून हे संबंध उघड करू, असेही त्यांनी म्हटले होते. युतीचे सरकार आल्यानंतर याप्रकरणी काही नेत्यांची नावे घेण्यात आली. संबंधित टेलिफोन क्रमांक उघड करा, असे आव्हान देण्यात आल्यानंतर तपास व गुप्ततेचे कारण देत त्याची माहिती देण्यात आली नाही. परंतु, दाऊद हा विषय चर्चेत आल्याचा फायदा युतीला सत्ता मिळवण्यासाठी झाला.

‘तुमचा दाऊद, तर आमचा अरुण गवळी’ अशी गर्जना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. 1993 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गो. रा. खैरनार यांनी पवारांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा तसेच ते गुन्हेगारांची पाठराखण करत असल्याचा आरोप केला. माझ्याकडे या संदर्भात ट्रकभर पुरावे आहेत, असाही दावा त्यांनी केला होता. पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर आणि जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर या कथित गुंडांना, आधी संरक्षणमंत्री आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांचे संरक्षण आहे, असा आरोप ज्येष्ठ पोलिस अधिकारी उल्हास जोशी यांनी केला होता. पोलिस कोठडीत असलेल्या कलानीला नरमाईची वागणूक द्यावी, यासाठी पवारांनी आपल्याला फोन केल्याचा गौप्यस्फोट करून सुधाकर नाईक यांनी सनसनाटी निर्माण केली होती. राजकारणाचा चेहरा आणि राज्यकर्तेही बदलले; पण दाऊद तिथेच आहे.

दाऊदच्या नावाने राजकारण खूप झाले. दाऊदचा ठावठिकाणा लागूनही तो पाकिस्तानात लपल्याचे सिद्ध करता आलेले नाही आणि पाकिस्तानने ते आजही मान्य केलेले नाही. देशाबाहेर लपलेल्या देशद्रोह्यांना, घोटाळेबहाद्दरांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते, त्यात यश आलेले नाही. दाऊदवर विषप्रयोग वा त्याला विषबाधा झाल्याची अफवा जोमात असताना दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यावरून विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात डागल्या जाणार्‍या आरोपांच्या फैरी हा आणखी एक योगायोग!

एका मंत्र्याचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप झाल्यामुळे सोमवारी विधान परिषदेत गोंधळ उडाला. आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा गृहमंत्र्यांना करावा लागला. त्यापूर्वी सलीम कुत्ता याच्यासोबत राजकीय पक्षाच्या एका पदाधिकार्‍याचे संबंध असल्याचा गंभीर आरोपही झाला. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुत्ता पॅरोलवर असताना अशा प्रकारची घटना देशाच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने गंभीर आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी या घटनेची तत्परतेने एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले, हे योग्यच झाले. मुळात दाऊद असो अथवा अन्य गुंड, त्यांच्याशी वेगवेगळ्या पक्षांतील राजकारण्यांचे संबंध आले होते, हे वास्तव आहे. हे कुख्यात गुंड राजकीय आश्रयानेच पोसले गेल्याचे लपूृन राहिलेले नाही. मुंबईसारख्या महानगरातील रिअल इस्टेटला सोन्यासारखे भाव असल्यामुळे बिल्डर, राजकारणी, प्रशासक आणि गुंड यांची एक साखळी तयार झाली. दाऊद मिळो न मिळो वा मरो न मरो, राजकारण्यांचे गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे संपलेले नाहीत. उलट नव्या रूपाने ते समोर येत आहेत. या संबंधांवर विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळाली नाहीत. दाऊदच्या कथित ‘चौथ्या मृत्यू’च्या निमित्ताने ते पुन्हा विचारले जात आहेत आणि विचारले जातील.

Back to top button