Chandrayaan-3 : अतुलनीय क्षमतेची चुणूक | पुढारी

Chandrayaan-3 : अतुलनीय क्षमतेची चुणूक

प्रा. विजया पंडित

भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) ने ‘चांद्रयान-3’च्या प्रणोदन (गती देणारी शक्ती) मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे आणण्यात यश मिळवले आणि एक प्रकारे आपल्या अतुलनीय क्षमतेची जगाला ओळख करून दिली आहे. एकंदरीतच अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताची कामगिरी कौतुकास्पद आणि वाखण्याजोगी ठरत आहे.

प्रणोदल मॉड्यूल परत येणे हा भारताच्या चांद्रमोहिमेतील महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी अतिशय काळजीपूर्वक वाटचाल करत या मोहिमेला पुढे नेले आहे. प्रणोदन मॉड्यूल हे पृथ्वीच्या कक्षेत परत आले असून, त्याच्यावर ‘चांद्रयान-3’ लँडरला चंद्रावर नेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, भारत आता कोणतीही वस्तू चंद्रावर पाठविण्यात आणि ती पुन्हा आणण्यात सक्षम झाला आहे. ‘चांद्रयान-4’ या मोहिमेमध्ये चंद्रावरची माती आणण्याचे नियोजन आहे आणि त्यासाठी चंद्रावर यान उतरणे आणि तेथील नमुने गोळा करणे तसेच पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता विकसित करणेही महत्त्वाचे आहे.

चांद्रयान मोहीम-4 ही वाटते तेवढी सोपी नाही, असेही शास्त्रज्ञ मानतात. चंद्रावरून माघारी येण्यासाठी तेथून यशस्वीपणे उड्डाण करणे, हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. चंद्रावर उतरणारे यान हे सामान्य विमानाप्रमाणे उतरत नाही किंवा झेपही घेत नाही. शेवटी तेथे उतरणे आणि पुन्हा उड्डाण करण्याची क्षमता विकसित करणे गुंतागुंतीचे काम आहे. चंद्रावरून उड्डाण केल्यानंतर चंद्राच्या कक्षेत यान दाखल होते आणि त्यानंतर तेथून पुन्हा लाँच होते आणि शेवटी पृथ्वीच्या कक्षेत दाखल होते.

पृथ्वीच्या कक्षेतूनही यान लाँच होईल आणि ते पृथ्वीवर परत येईल. ही प्रक्रिया पार पाडताना यानातून दुसरे यान वेगळे होणे आणि पुन्हा जुळणे, अशा प्रकारची कसरत करावी लागणार आहे. यासाठी सध्या शास्त्रज्ञ अहोरात्र काम करत आहेत. ‘चांद्रयान-4’ला विशेष यान म्हणूनही ओळखले जाणार असून ते नव्या वर्षाच्या अखेरीस तयार होईल, असा अंदाज आहे.

चंद्रावर मानव पाठविण्याच्या अभियानाला अजूनही वेळ लागणार आहे. स्वत:च्या जोरावर भारताला 2040 पर्यंत चंद्रावर मनुष्य पाठवता येणे शक्य होणार आहे. एवढेच नाही, तर भारत चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी जपानच्या सहकार्याने आणखी एका मोहिमेत सहभागी होणार आहे. तूर्त भारत अंतराळ मोहिमांबाबत संथगतीने वाटचाल करत आहे, असे म्हणावे लागेल. आपण स्वत:चे अंतराळ स्थानक 2035 पर्यंत तयार करू शकू; परंतु ‘नासा’ने 6 डिसेंबर रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला 25 वर्ष पूर्ण केली. अनेक शास्त्रज्ञ ‘नासा’च्या केंद्रात राहत आहेत आणि पुढील वर्षाच्या अखेरीस भारताचे एक पाऊलदेखील तेथे पडू शकते.

‘इस्रो’ला अंतराळ केंद्रात पाठविण्यासाठी एका भारतीय अंतराळवीराची निवड करायची असून, यावर ‘नासा’ने सहमती दर्शविली आहे. भारताचे पहिले आणि एकमेव अंतराळीवर राकेश शर्मा यांनी 1984 रोजी सोव्हिएत संघाच्या यानातून अंतराळात झेप घेतली होती, तेव्हा ‘नासा’चे अंतराळ स्थानक तयार झालेले नव्हते. त्यानंतर चार वर्षांनी ‘नासा’चे केंद्र स्थापन झाले. एकुणातच अंतराळ विज्ञानात भारताला वेगाने पावले टाकावी लागणार आहेत. ‘इस्रो’ला अधिकाधिक तज्ज्ञांना आकर्षित करावे लागणार आहे. जेणेकरून आपले शास्त्रज्ञ हे ‘नासा’ऐवजी ‘इस्रो’त राहून भारताची सेवा करू शकतील. यादरम्यान ‘नासा’ येथे कार्यरत डॉ. अक्षता कृष्णमूर्ती या मंगळ ग्रहावर रोवर मिशनची धुरा सांभाळणार्‍या पहिल्या भारतीय नागरिक ठरल्या आहेत आणि ही भूषणावह बाब आहे. ‘इस्रो’ला अशाच कुशल शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे आणि भारतीयांचे भवितव्य उज्ज्वल आहे.

Back to top button