डीमॅट खात्याची वाढतेय विश्वासार्हता | पुढारी

डीमॅट खात्याची वाढतेय विश्वासार्हता

शैलेश धारकर, अर्थतज्ज्ञ

शेअर बाजारात नशीब आजमावणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत असून अलीकडच्या काही महिन्यांतील बाजार तेजीने लक्षणीय प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. परिणामी, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस देशातील डिमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने प्रथमच 13 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालाने स्पष्ट केले आहे.
सप्टेंबर महिन्यात 31 लाख नवीन डिमॅट खात्यांची भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत मासिक आधारावर सरासरी 21 लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली आहेत. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवरच्या विश्वासाचे आकलन करायचे असेल, तर यासाठी सर्वसामान्यांची होणारी गुंतवणूक पाहावी लागते. त्याद़ृष्टीने विचार करता सध्याचे डीमॅट खात्यांसंदर्भातील हे चित्र भारतीय अर्थव्यवस्थेवरील लोकांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे.  चालू वर्षी जानेवारीपासून ते आतापर्यंत सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक डीमॅट खाती सुरू झाली आहेत.  गेल्या काही महिन्यांत 12 ते 14 आयपीओ बाजारात आले आणि त्यात गुंतवणूकदारांनी भरभक्कम पैसा गुंतवला. चौदा आयपीओंच्या माध्यमातून कंपन्यांनी 11 हजार 868 कोटी रुपये उभारले. डिसेंबर 2010 नंतर सर्वाधिक आयपीओ यावर्षी बाजारात आले आहेत. एकंदरीत चित्र पाहिले, तर जानेवारीपासून ते सप्टेंबरपर्यंत 34 आयपीओ बाजारात आले आणि या माध्यमातून कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून 26 हजार 913 कोटी रुपये जमा केले. सर्व आयपीओ ओव्हरसबस्क्राईब होत आहेत. आजघडीला जगातील असंख्य देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना आपल्याकडे मात्र गुंतवणूकदारांचा उत्साह पाहावयास मिळत आहे. यावरून शेअर बाजारात नव्याने सुरू होणारी खाती आणि आयपीओला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत लोकांच्या मनात कोणताही नकारात्मक विचार नसल्याचे दिसून येते. एवढेच नाही, तर लोकांचा देशाची अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थितीवरचा विश्वास दिवसेंदिवस अधिक ठळकपणे होताना दिसून येत आहे.
वास्तविक कोरोनानंतर जगाची झालेली स्थिती पाहता आर्थिक व्यवहार व्यापक प्रमाणात मंदावले होते आणि परिणामी लोकांच्या मनात अर्थव्यवस्थेवरून शंका निर्माण झाल्या होत्या. जगातील बहुतांश देशांनी आर्थिक संकटाचा मुकाबला केला आणि आजही काही देश त्याखाली भरडले जात आहेत. कोरोनातून बाहेर पडण्याची स्थिती निर्माण झालेली असतानाच रशिया-युक्रेन युद्धाने परिस्थिती आणखी बिघडली. आता इस्रायल आणि हमासच्या संघर्षाने नवीन संकट समोर आले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांची स्थिती चांगली राहिलेली नाही. विशेष म्हणजे, चीनच्या विचित्र धोरणामुळे जगातील देश अगोदरच त्रस्त आहेत, शिवाय दहशतवादी घटना, हवामान बदलामुळे निर्माण होणारे नैसर्गिक संकट, चक्रीवादळ, जमीन खचणे आदी घटनांमुळे सर्व देशांसमोर चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे. दुष्काळ अतिवृष्टी, ढगफुटी, लहरी हवामान आदी कारणांमुळेदेखील अनेक देशांची स्थिती चांगली नाही. महापुरामुळे पाकिस्तानातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशाचा एक तृतियांश भाग पाण्याखाली गेला होता. या घटनेला वर्ष झालेले असताना आता राजकीय अस्थिरतेने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा घाला घातला गेला आहे. श्रीलंकेची स्थितीही फारशी वेगळी नव्हती.
मात्र, आता हा देश पूर्वपदावर येत आहे. सभोवताली आणि जगात घडणार्‍या गोष्टींचा विचार करताना भारतीयांचा अर्थव्यवस्थेबाबत वाढलेला विश्वास समजून घेतला पाहिजे. बचतीच्या तुलनेत आर्थिक संस्थांकडून कर्ज घेणार्‍यांची संख्या सतत वाढत चालली आहे. दुसरीकडे शेअर बाजार हा नेहमीच अस्थिर समजला गेला आणि तो राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही  जोखमीचा बाजार म्हणून समजला जातो; पण आज देशातील मध्यमवर्ग विशेेषत: तरुण पिढी ही जोखीमयुक्त असलेल्या शेअरबाजारात बिनधास्तपणे गुंतवणूक करत आहे. अर्थात, यामागे शेअर बाजारातून मिळणार्‍या आकर्षक परताव्याचेही कारण आहे.

Back to top button