सिक्कीम दुर्घटनेचा धडा | पुढारी

सिक्कीम दुर्घटनेचा धडा

सिक्कीममधील प्रलयानंतर वितळणारी हिमशिखरे आणि हिमनद्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दहा वर्षांपूर्वी केदारनाथ येथे झालेल्या विध्वंसाची आठवण सिक्कीममधील प्रलयाने करून दिली. केदारनाथ हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्यामुळे त्याकडे जगाचेच लक्ष वेधले गेले होते. सिक्कीम हे इशान्येकडील दुर्लक्षित राज्य असल्यामुळे त्या तुलनेत तेथील दुर्घटनेची दखल हवी तशी घेतली गेली नाही. सिक्कीमच्या उत्तरेकडे समुद्रसपाटीपासून 17 हजार फूट उंचीवर दक्षिण लोनक सरोवर असून ते फुटल्यामुळे सरोवरातील पाण्याचे अक्राळ विक्राळ लोंढे खालच्या बाजूला पसरले. अचानक आलेल्या पुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक बेपत्ता झाले.

सैन्यातील काही जवान बेपत्ता झाल्यामुळे घटनेचे गांभीर्य अनेक पटींनी वाढले. हिमनदी सरोवर फुटल्यामुळे तिस्ता नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन मंगन, गंगटोक, पाक्योंग व नामची या जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला. सिक्कीममध्ये आधीच मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यातच ढगफुटी झाल्याने दक्षिण लोनक सरोवर फुटल्याचे केंद्रीय जल आयोगाकडून प्रारंभी सांगण्यात आले होते. कोणत्याही दुर्घटनेसंदर्भात सरकारी यंत्रणेकडून काहीतरी कारण पुढे केले जाते, तसेच ढगफुटीचे कारण पुढे करण्यात आले होते. परंतु, पर्यावरणतज्ज्ञांनी ढगफुटीचे कारण खोटे असल्याचे वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे सांगितले.

दुर्घटना घडली ते ठिकाण ज्या उंचीवर आहे, अशा ठिकाणी ढगफुटीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जे दक्षिण लोनक सरोवर फुटल्यामुळे पूर आला, ते अत्यंत नाजूक आणि धोकादायक म्हणून ओळखले जात होते. चौदा संभाव्य धोकादायक सरोवरांमध्ये त्याचा समावेश होता. या ठिकाणी अशी दुर्घटना घडू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. हिमशिखरे वितळून अशी सरोवरे तयार होतात आणि दिवसेंदिवस त्यांचा आकार वाढत जातो. या सरोवराचे क्षेत्र पूर्वी 17 हेक्टर होते, ते वाढत जाऊन 168 हेक्टर विस्तारले, यावरून त्याच्या विक्राळतेची कल्पना येऊ शकेल. या सगळ्यामागे हवामान बदल हेच कारण असल्याबद्दल तज्ज्ञांचे एकमत आहे. केदारनाथ दुर्घटना देशवासीयांच्या स्मरणात आहेच; परंतु काही महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशातही अशा प्रकारची दुर्घटना घडली. हवामान बदलाबरोबरच हिमालयाच्या कुशीत विकासाच्या नावाखाली राबवल्या जाणार्‍या विविध योजनांमुळे हिमालयाचे अंतरंग पोखरले जात आहे आणि त्यामुळेही काही दुर्घटना घडत आहेत. उत्तराखंडमधील जोशी मठ येथे जमिनीला तडे गेल्यामुळे अनेकांना स्थलांतरित करावे लागल्याच्या घटनेलाही फार काळ लोटलेला नाही. एकीकडे हवामान बदलाचे संकट गंभीर होत असताना दुसरीकडे पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपही अनेक दुर्घटनांना निमंत्रण देत आहे. सिक्कीममधील दुर्घटनेच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी नव्याने समोर आल्या आहेत.

संबंधित बातम्या

हवामान बदलाचे धोके वारंवार समोर येत असून प्रदेशागणिक त्यांचे स्वरूप वेगळे आहे. दुष्काळ, अतिवृष्टी ही संकटे हवामान बदलामुळेच येतात, त्याचा शेतकर्‍यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्याच घटकांना फटका बसत असतो. त्यामुळे हवामान बदलाचा संबंध केवळ हिमालयातील बर्फ वितळण्यापुरता असतो, असे मानण्याचे कारण नाही. सिक्कीमधील ताजी दुर्घटना ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लडमुळे (ग्लोफ) घडली असून हा पूर अत्यंत विनाशकारी असतो. बर्फ वितळून तयार झालेली सरोवरे फुटल्यामुळे म्हणजेच ग्लोफमुळे प्रचंड विध्वंस होत असतो आणि मानवी प्रयत्न त्याला रोखण्यात पुरे पडत नाहीत. तापमान वाढल्यामुळे हिमशिखरे वितळतात आणि त्यातून ही सरोवरे तयार होतात. अशा प्रकारच्या दुर्घटना वाढत चालल्या असून हिमालयाच्या पायथ्याशी राहणार्‍या लोकांचे जगणे त्यामुळे वारंवार उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. केदारनाथच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने अशा प्रकारच्या सरोवरांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समितीने लोनक सरोवराच्या धोक्याची कल्पना 2015 मध्येच सरकारला दिली होती. वैशिष्ट्य म्हणजे देशातील सरोवरांपैकी सर्वाधिक अभ्यास या सरोवराचाच झाला. 1990 मध्ये सरोवरात पाणी साठण्यास सुरुवात झाली आणि तीन दशकांमध्ये त्याचा विस्तार प्रचंड वाढला. सरोवर फुटले तेव्हा त्यात साठ दशलक्ष क्युबिक मीटर पाणी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हिमनदी वितळल्यामुळे या सरोवराप्रमाणे अनेक छोटे-मोठे तलाव तयार होतात. अशा तलावात हिमनदीतून वाहून येणार्‍या बर्फाची, पाण्याची भर पडत असते. त्यामुळे हे तलाव मोठे होत जातात. असे तलाव बहुतेक वेळा अस्थिर बर्फ, सैल खडक आणि दगड-धोंड्यांसह गाळाने तयार झालेले असतात. भूस्खलन, भूकंप किंवा हिमकडा कोसळल्यामुळे अशा तलावातील बर्फ फुटतो किंवा पाण्याची पातळी अचानक वाढते. त्यामुळे सरोवराभोवतीची सीमा तोडून पाणी पर्वताच्या खालच्या बाजूला वाहू लागते. अशा दुर्घटनेमागे कोणतेही एक आणि एकच कारण असत नाही. भूकंप, मुसळधार पाऊस किंवा हिमस्खलन अशी अनेक कारणे त्यामागे असतात. लोनक सरोवर हे सिक्कीमधील एकमेव संकट नाही. तापमानवाढीमुळे अनेक हिमनद्या वितळू लागल्या आहेत. त्याशिवाय आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या सरोवरांचा आकार पर्यायाने त्यापासूनचा धोकाही वाढत आहे.

सिक्कीममध्ये असे तीनशेहून अधिक हिमनदी तलाव असून त्यापैकी दहा तलाव धोकादायक म्हणजे फुटण्याची शक्यता असलेले आहेत. लोनक सरोवरातील पाणी काढून धोका कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू होते; परंतु ते अपुरे ठरल्याचे ताज्या दुर्घटनेने सिद्ध केले. हवामान बदलामुळे येणार्‍या सगळ्या संकटांच्या मुळाशी असलेले प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणातील वाढता मानवी हस्तक्षेप, तसेच राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा विनाश. हिमालयीन पर्वतरांगांतून या बदलांचे घातक परिणाम आधी दिसून येऊ लागले असले, तरी त्याकडे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नसल्याने या नैसर्गिक संकटांची तीव—ता वाढू लागली आहे. केवळ मानवी अस्तित्वापुढीलच नव्हे, तर एकूण जीवसृष्टीपुढचे धोके ओळखून वेळीच सावध झालो नाही, तर भविष्यकाळ मोठा कठीण असेल. सिक्कीमच्या दुर्घटनेपासून हाच धडा घ्यायला हवा.

Back to top button