लवंगी मिरची : तुफानी संघर्षाची नांदी! | पुढारी

लवंगी मिरची : तुफानी संघर्षाची नांदी!

काय सांगू मित्रा, परवापासून बातम्या पाहून अक्षरशः हादरून गेलो आहे. इस्रायलसारखा देश आणि जगभरात नाव असलेली मोसाद नावाची गुप्तचर संस्था यांना गुंगारा देऊन हमासने नियोजित हल्ला केला आणि इस्रायलच नव्हे, तर सर्व शांतताप्रेमी नागरिकांचा जीव तळमळला. प्रखर राष्ट्रभक्तीची ज्वाला हृदयाशी बाळगून सावध राहणारे इस्रायली नागरिक मारले गेले. महिलांच्या मृतदेहांची विटंबना केली गेली. मला असे वाटते की, इथून पुढे आखातामध्ये शांतता परत येणे अशक्य गोष्ट आहे.

आखाती देशांचा नकाशा बदलण्याची ताकद इस्रायलमध्ये आहे, यात काही शंका नाही. या धुमसत असणार्‍या प्रश्नाला आज न उद्या, कुठे ना कुठेतरी तोंड फुटणार होते, ते परवा फुटले. प्रश्न काहीही असेल, तरी मानवी जीवनाचा मृत्यू होणे ही फार विदारक गोष्ट आहे. युद्धामध्ये शत्रुसैनिक पकडले जाणे ही काही फार नवीन बाब नाही; परंतु पकडलेल्या सैनिकांना सन्मानाची वागणूक देण्याचा आंतरराष्ट्रीय करार आहे. त्याचा अजिबात मान न ठेवता हमासने सैनिकांच्या देहांवर थयथयाट केला आहे. त्यामुळे हे युद्ध भडकणार, यात शंका नाही. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे आणि त्यासाठी तो देश वाटेल त्या स्तरावर जाऊन आपल्या सीमांचे रक्षण करू शकतो. अशा अमानवी पद्धतीने युद्धामध्ये शत्रू सैनिकांची विटंबना केली जात असेल, तर कोणताही देश हे सहन करणार नाही, असे मला वाटते. आपल्या देशाने यावेळी प्रथमच कणखर असा स्पष्ट पवित्रा घेतला आहे.

हे बघ मित्रा, मला समजते त्याप्रमाणे हमासच्या हल्ल्यामागे इराण आणि लेबेनॉन हे दोन देश आहेत. इथून पुढे या देशांच्या आणि हमासच्या पाठीशी कोणते देश उभे राहतील, याविषयी निश्चित काही सांगता येत नाही. इस्रायलच्या पाठीशी मात्र अमेरिका, सर्व युरोपीय देश आणि भारत समर्थपणे उभा राहणार आहे, हे नक्की! इस्रायलच्या तेजस्वी परंपरांपुढे आणि त्यांच्या सैनिकी शक्तीपुढे हमास टिकण्याची शक्यता नाही. एक घातक हल्ला केला आणि नंतर आपण स्वतः संपून गेलो अशी काहीशी परिस्थिती नक्कीच होणार आहे.

संबंधित बातम्या

तत्काळ प्रतिहल्ला करण्याची इस्रायलची क्षमता अद्भूत अशी आहे. हल्ला घडून गेल्यानंतर अवघ्या काही तासांत आखाताचा नकाशा बदलून ठेवू, असा सरळ सरळ इशारा देऊन त्यांनी इरादे जाहीर केले आहेत. हल्ला करणारे हमासचे अतिरेकी जगभरात विविध देशांमध्ये पळून गेले असतील, तरीही इस्रायल त्या प्रत्येकाला शोधून त्या त्या देशात जाऊन ठेचून मारणार, हे ठरलेले आहे. या पार्श्वभूमीवर बलाढ्य आणि स्पष्ट भूमिका घेणारा इस्रायलनंतरचा देश म्हणजे आपला देश आहे याचा मला अभिमान आहे.

कॅनडाच्या भूमीवरून भारताविरुद्ध द्रोह करणार्‍या अतिरेक्यांना आमच्याकडे सोपवा, अशी मागणी भारताने केली. त्यावर कॅनडाच्या पंतप्रधानांनी काही एक आगळीक केली. तेव्हा दिवसभराचा वेळ न गमवता भारताने कॅनडातील राजनैतिक अधिकार्‍यांना तत्काळ आपल्या देशाबाहेर हाकलून दिले. वरवर दिसणारा मित्र पण आतून असणारे शत्रुत्व हे आता आपल्या देशाला परवडणारे नाही, याचे कारण म्हणजे आपला शेजारी पाकिस्तान सातत्याने भारताविरुद्ध काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. अशाप्रसंगी आपण इतरांसोबत राहिले पाहिजे म्हणजे, उद्या कधी भारतावर अशी वेळ आली, तरी इस्रायलसारखा बलाढ्य मित्र आपल्या सोबत असणे आपल्या फायद्याचे असणार आहे.

Back to top button