Monsoon : मान्सून परतला; पण..! | पुढारी

Monsoon : मान्सून परतला; पण..!

विधिषा देशपांडे, कृषी अभ्यासक

लक्षणीय वैज्ञानिक प्रगती आणि सिंचन साधनांचा विकास असूनही आज भारतीय उपखंडात मान्सून हाच कृषी व्यवस्थेचा कणा आहे. शतकानुशतके देशातील शेतकरी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. मान्सूनच्या पावसानेच शेतीत समृद्धी येते, हे सत्य आहे. कारण, मेघांमधून वर्षाव करणार्‍या पावसासाठी शेतकर्‍यांना पैसा द्यावा लागत नाही. परिणामी, एकीकडे विजेची बचत होत असताना दुसरीकडे शेतकर्‍यांचा शेतीवरील खर्चही कमी होतो.

दक्षिण-पश्चिम मान्सून आता परतत असल्याची अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याने जारी केली आहे. राजस्थानचा काही भाग सोडून मान्सून परतीच्या प्रवासाला निघूनही गेला आहे. साधारण 17 सप्टेंबर ही त्याची परतीची तारीख असते; पण यंदा तो आठ दिवस उशिरा परतला. पावसाचा पॅटर्न पाहून यंदा जोरदार पाऊस झाला आहे, असे वाटू शकते; पण प्रत्यक्षात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनकाळात देशात 780.3 मि.मी. पाऊस झाला आहे. शास्त्रीय परिभाषेत 832.4 मि.मी. हा सामान्य पाऊस मानला जातो. याचाच अर्थ यंदा 52 मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. नैऋत्य मोसमी मान्सूनने यावेळी हिमाचल, उत्तराखंड इत्यादी डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार वृष्टी केली. विशेषत: हिमाचलमध्ये पाऊस खूप तीव्र होता. परिणामी, या राज्यात भूस्खलन आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. यंदा तेराव्यांदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा उशिराने परतत आहे. वास्तविक, दीर्घकाळ मान्सूनचा मुक्काम हा शेतीसाठी फायदेशीर आहे.

दरवर्षी सामान्यतः नैऋत्य मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत पोहोचतो. त्यानंतर साधारणपणे 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पावसास सुरुवात होते. त्याचबरोबर 17 सप्टेंबरच्या आसपास उत्तर-पश्चिम भारतातून मान्सून मागे हटण्यास सुरुवात करतो आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून जवळजवळ पूर्णपणे नाहीसा होतो. देशात एकीकडे काही भागातून मान्सून परतत असतानाच काही राज्यांत पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात मान्सूनच्या प्रस्थानादरम्यान काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत असल्याचे वृत्त आहे. लडाखमध्येही बर्फवृष्टीचे वृत्त आहे. हिमाचल प्रदेशात मान्सूनने निरोप घेतला असून येत्या काही दिवसांत तेथे भरपूर सूर्यप्रकाश पडेल, असा अंदाज आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत वर्षभरात वेगवेगळे ऋतू जाणवू शकतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा अशा तिन्ही ऋतूंचा भरपूर आनंद घेण्याचे सौभाग्य भारताला लाभले आहे; पण जागतिक तापमानवाढीमुळे हे ऋतुचक्र बदलत चालले आहे. पावसाची पद्धतही बदलली आहे, हेही वास्तव आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन आणि विध्वंसाच्या घटना कमी कालावधीत भरपूर पाऊस पडत असल्याचे दर्शवणार्‍या आहेत. अर्थात, अलीकडील काळात देशभरातच ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे पावसाची सरासरी बिघडली आहे. यंदा सरासरीपेक्षा सहा टक्के पाऊस कमी झाल्याचे हवामान खाते सांगत आहे; पण हिमाचल आणि उत्तराखंडसारख्या अतिवृष्टी झालेल्या भागातील लोक यावर कसे विश्वास ठेवतील?

पाऊस स्थानिक प्रशासनाच्या स्वच्छतेची आणि नद्या-नाल्यांच्या देखभालीची कसोटी लावत असतानाच सार्वजनिक बांधकामांतील ढिसाळपणाही उघड होतो. सामान्य नागरिकांसाठी पावसाचा संदेश म्हणजे गटारी सुरळीत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मातीची धूप रोखण्यासाठी वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे, हे पावसाचे बदलते चक्र सांगून जाते. जैवविविधतेने नटलेल्या डोंगरराजीत चौपदरीकरणाचा फॉर्म्युला चालणार नाही, हा धोरणकर्त्यांना धडाही पाऊस देऊन जात आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे. त्यासाठी धोरणकर्त्यांना आणि लोकांनाही तयार राहावे लागणार आहे.

Back to top button