Putin & Kim Jong Un : दोन हुकूमशहांची युती | पुढारी

Putin & Kim Jong Un : दोन हुकूमशहांची युती

मोरोक्कोमधील विनाशकारी भूकंप, लिबियामधील हाहाकार माजवणारा महापूर अशा अनेक घटनांनी जग हादरून गेले असतानाच जागतिक रंगमंचावरील आणखी एक घटना लक्षवेधी ठरली आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांचा रशिया दौरा आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Putin & Kim Jong Un) यांच्याशी त्यांची भेट ही जगाच्या द़ृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे. स्वतःच्या अहंकारापोटी कोणत्याही थराला जाणारे हे दोन हुकूमशहा सध्या जगाच्या द़ृष्टीने खलनायक ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही संघटनेचे नियम, निर्बंध यांना न जुमानणार्‍या या दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी स्वतःवर निर्बंध ओढवून घेतले आहेत आणि त्यामुळे अनेक पातळ्यांवर त्यांची कोंडी झाली आहे. हे दोघे एकत्र येऊन जागतिक शांततेसाठी किंवा मानवी हक्कांच्या संरक्षणासंदर्भात चर्चा करणार नाहीत, हे तर स्पष्टच आहे. परस्परांची विध्वंसक ताकद वाढवण्याचीच खलबते त्यांच्यात होऊ शकतात आणि त्या द़ृष्टीने उपद्रवमूल्य वाढवण्यासाठीचे सहकार्य ते परस्परांना करू शकतात. त्याचमुळे त्यांची भेट ही जगाच्या द़ृष्टीने चिंताजनक ठरली आहे.

कोणत्याही देशाचे प्रमुख दुसर्‍या देशात जाताना विमानाचा वापर करतात; परंतु किम जोंग उन यांनी रशियाचा दौरा (Putin & Kim Jong Un) विशेष रेल्वेद्वारे करून आपले वेगळेपण अधोरेखित केले. त्यांना रशियाकडून नेमके काय हवे आहे म्हणून त्यांनी चार वर्षांनंतर पहिल्यांदाच देशाच्या बाहेर पाऊल टाकले आहे? कोरोना काळात त्यांनी देशाच्या सीमा बंद केल्यामुळे बाहेरून कुणी उत्तर कोरियात जाऊ शकत नाही आणि उत्तर कोरियातील कुणी नागरिक देशाबाहेर जाऊ शकत नाही, हे या देशाचे आजचे वास्तव. त्याआधी दरवर्षी सुमारे एक हजार लोक उत्तर कोरियातून दक्षिण कोरियामध्ये पलायन करीत होते; परंतु आता सीमेजवळ जाणार्‍या नागरिकांना थेट गोळी घालण्याचेच आदेश असल्यामुळे उत्तर कोरियातील नागरिक देशातच बंदिवानाचे जिणे जगत आहेत. या देशापुढे अन्नधान्य टंचाईचे मोठे संकट आहे आणि त्यासंदर्भातील मदत मिळवण्याचा किम जोंग यांचा या भेटीमागचा एक उद्देश असू शकतो. रशियाकडून न्यूक्लिअर पानबुड्यांची मागणीही उत्तर कोरियाकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दुसरीकडे युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाची स्थितीही फारशी चांगली नाही. युद्धाला देशांतर्गत वाढता विरोध आता लपून राहिलेला नाही.

युद्ध आणखी किती काळ चालणार हे स्पष्ट नाही; मात्र ते दीर्घकाळ चालवण्यासाठी रशियाला दारुगोळ्याची गरज असून त्यांची ती गरज उत्तर कोरिया भागवू शकतो आणि त्या द़ृष्टीने व्यवहार होण्याची शक्यता सांगितली जाते. पाश्चिमात्य देशांनी प्रतिबंध लागू केल्यामुळे पुतीन यांची कोंडी झाली असली, तरी त्यांनी कच खाल्लेली नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. सध्या उपलब्ध दारुगोळ्याच्या सहाय्याने ते युद्ध पुढे नेऊ शकतात, शिवाय चीन आणि अफ्रिकन देशांकडून त्यांना आवश्यक तो दारुगोळा उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत पुतीन यांना उत्तर कोरियासोबत करार करण्याचे बंधन नाही; परंतु आजच्या घडीला बरेचसे जग विरोधात गेले असताना नवा सवंगडी सोबत येत असेल, तर तो आवश्यकच आहे.

(Putin & Kim Jong Un) पुतीन आणि किम जोंग हे दोन्ही नेते विध्वंसक वृत्तीचे असल्याकारणाने किम जोंग यांच्या रशिया दौर्‍यामुळे अमेरिका आणि सहयोगी देश सावध झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण होऊ शकते आणि त्याची कारणेही स्पष्ट आहेत. अन्य देशांसाठी वाढते उपद्रवमूल्य ही रशिया आणि उत्तर कोरिया यांची समान वृत्ती. दोन्ही देशांविरोधात कठोर आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू आहेत आणि दोन्ही देशांचे प्रमुख अमेरिकेचे वर्चस्व जुमानणारे नाहीत. स्वाभाविकपणे शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने पुतीन आणि किम जोंग एकत्र आले आहेत. असे असले तरी दोघांनी परस्परांची स्तुती करणे टाळले असल्याकडे अभ्यासक लक्ष वेधतात. व्यावहारिक पातळीवर संबंध ठेवले, तर त्यातून दोघांचाही फायदा आहे, हे संबंधितांनी समजून घेतले असावे आणि त्यातूनच हा समझोता पुढे जाऊ शकतो; मात्र रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील शस्त्रास्त्र व्यवहाराची चर्चा फार पुढे गेली असल्याचा अमेरिकेला संशय आहे. यावर्षी जुलै महिन्यात कोरियन कराराच्या सत्तराव्या वर्धानपनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला. सोविएत संघाच्या विघटनानंतर रशियन संरक्षणमंत्र्यांचा हा पहिला उत्तर कोरिया दौरा. (Putin & Kim Jong Un)

शोइगू यांनी त्यावेळी एका शस्त्रास्त्र प्रदर्शनाला भेट दिली होती आणि त्यावेळी किम जोंग त्यांना प्रदर्शनाची माहिती देत होते. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या रशियाचे माजी परराष्ट्रमंत्री आंद्रे कोझिरेव्ह यांनी कोरियाकडून मदतीची अपेक्षा बाळगणार्‍या रशियाची खिल्ली उडवली आहे. उत्तर कोरियासारख्या अविकसित आणि एकट्या पडलेल्या देशाकडून शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रयत्न रशियासाठी नामुष्कीजनक असून त्यामुळे रशियाच्या ताकदीच्या फुग्याला टाचणी लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व घडामोडींमधील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांच्यावर जे प्रतिबंध लादले आहेत, त्यावर रशियानेही सही केली आहे. या प्रतिबंधांमुळे उत्तर कोरियाशी कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीवर बंदी आहे. परंतु, जागतिक पातळीवरील अनेक देशांना आव्हान देणार्‍या रशियासाठी या कराराचा भंग करणे ही किरकोळ बाब असल्याचे मानण्यात येते. ब्लादिमीर पुतीन यांनी जगाशी पंगा घेतला असून त्यासाठी अनेक देशांकडून निर्बंध ओढवून घेतल्यामुळे त्यांना कशाची भीती उरलेली नाही. अमेरिकेचे वर्चस्व झुगारून आपल्या सोयीची जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतील, हे मात्र नक्की!(Putin & Kim Jong Un)

हे ही वाचा :

Back to top button