आता सूर्याकडे झेप | पुढारी

आता सूर्याकडे झेप

About the author

भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेचा सध्या जगभरात बोलबाला आहे. रशियाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखविले आहे. भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक होत असताना आता सूर्याकडे झेप घेण्याची तयारी केली जात आहे. याप्रमाणे शास्त्रज्ञ सूर्याच्या अभ्यासासाठी आखलेल्या ‘आदित्य-एल 1’ अभियानाला अंतिम रूप देण्याची तयारी करत आहेत. सर्वकाही मनासारखे घडले आणि अपेक्षित परिणाम हाती आले, तर 2 सप्टेंबर रोजी ‘इस्रो’ ‘आदित्य-एल 1’चे प्रक्षेपण करेल.

भारताची ही पहिलीच सूर्य मोहीम असणार आहे. या माध्यमातून ‘इस्रो’ सूर्याबाबतचा सखोल अभ्यास करून जगापुढे नवनवीन माहिती मांडेल. सतत प्रकाशमान असणार्‍या सूर्याबाबत सर्वांनाच नेहमीच कुतूहल राहिलेले आहे. ऊर्जेसाठी सूर्यावर सतत स्फोट होतात. अर्थात, हा नेहमीच गूढ विषय राहिलेला आहे. भारताची मोहीम सूर्याची गती आणि त्याच्यावर असणार्‍या हवामानाची माहितीची उकल करण्यास मोलाची ठरू शकते. एकुणातच या मोहिमेतून सूर्याबाबत मिळणारी माहिती सौरमंडळाच्या अभ्यासासाठी क्रांतिकारी पाऊल ठरू शकते.
सूर्याच्या तप्त ज्वालांचा विचार करता त्याच्याजवळ जाण्याचा कोणीही विचार करू शकणार नाही. परंतु, सूर्याकडे एक सुरक्षित कक्षा असून, तेथे जाऊन कोणतेही यान प्रदक्षिणा करत सूर्याच्या स्थितीचे आकलन, पाहणी करू शकेल. सूर्याजवळची सुरक्षित कक्षा ही पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. ‘आदित्य’ अंतरिक्ष यानात सात सुसज्ज उपकरणे बसवलेली आहेत. ही उपकरणे सूर्यावरचा थर, सौरमंडळ आणि ‘क्रोमोस्फियर’संदर्भात अंतर्गत आणि बाह्य थरांचा तपास करण्यास सुसज्ज असतील. सूर्याच्या कक्षेत आणि सूर्यावर घडणार्‍या सर्व घडामोडींचा अभ्यास करणे आणि डेटा गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

जेणेकरून सूर्याची क्रिया आणि प्रतिक्रिया समजण्यास हातभार लागेल. आपण प्रखर सूर्याकडे पाहू शकत नाही. परंतु, भारताचे ‘आदित्य’ यान हे सूर्याच्या प्रखर प्रकाशाचा सामना करण्यास सक्षम आहे. साहजिकच या अभियानाचे मूळ ध्येय हे सूर्याला जवळून पाहण्याचे आहे. आतापर्यंत अमेरिका, युरोपीय अंतराळ संस्था आणि जर्मनीने सूर्याच्या अभ्यासासाठी मोहीम आखली आहे. अशा रीतीने सुमारे वीसपेक्षा अधिक मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. यानुसार सूर्याजवळ पोहोचून ते यान पृथ्वीवर परत येणे गृहीत धरलेले होते. ते यान सूर्याजवळची हवा आणि कणांचे अंश घेऊन पृथ्वीवर परतत होते. मात्र, भूतलावर उतरण्याचा वेग पाहता या यानातून काही विशेष गोष्टी हाती लागल्या नाहीत. शेवटी आजही सूर्याचा अभ्यास करणे हे एक मोठे आव्हान आहे.

सूर्यावर असणारे कण पृथ्वीवर कसे आणावेत हा मोठा प्रश्न आहे. गेल्या काही काळात ‘इस्रो’च्या अंतराळ मोहिमांना मिळणारे यश पाहता आगामी काळातही ‘इस्रो’ अशाप्रकारची किमया करण्यात यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आजघडीला मंगळ आणि शुक्र ग्रहांवर जाण्यासाठी ‘इस्रो’ सक्षम असून, ही भारतीय विज्ञानाच्या द़ृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे. ‘आदित्य’ यानाच्या यशाने ‘इस्रो’च्या लौकिकात आणि मानाचा तुरा खोवला जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांना सूर्याविषयी ज्या प्रश्नांची उत्तरे सापडलेली नाहीत. सूर्याचा पृष्ठभाग फोटोस्फिअर नावाने ओळखला जातो.

या पृष्ठभागाचे तापमान सूर्याच्या वातावरणापेक्षा कमी असण्याचे कारण काय, हा पहिला प्रश्न होय. सूर्याच्या वातावरणाला कोरोना असे म्हणतात. सूर्याच्या पृष्ठभागाचे म्हणजेच फोटोस्फिअरचे तापमान अवघे 10 हजार फॅरनहाईट (5500 अंश सेल्सिअस) एवढे आहे. परंतु, त्याच्या वातावरणाचे म्हणजे, कोरोनाचे तापमान साडेतीन दशलक्ष फॅरनहाईट म्हणजे, तब्बल वीस लक्ष अंश सेल्सिअस एवढे प्रचंड आहे. उष्णतेच्या स्रोतापासून आपण जेवढे दूर जातो, तेवढे तापमान कमी होताना जाणवते. मात्र, सूर्याच्या बाबतीत पृष्ठभागापेक्षा तेथून दूर असलेल्या वातावरणाचे तापमान अधिक का आहे, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ शोधणार आहेत.

Back to top button