देदीप्यमान यशाच्या ‘चंद्र’कला | पुढारी

देदीप्यमान यशाच्या ‘चंद्र’कला

डॉ. संजय वर्मा, सहायक प्राध्यापक, बेनेट युनिव्हर्सिटी

एकविसावे शतक सुरू होताच, जगात चंद्र-शर्यतीची नवी मालिका सुरू झाली. याचे एक श्रेय भारताला देता येईल कारण ऑक्टोबर 2008 मध्ये प्रथमच भारताचे ‘चांद्रयान-1’ प्रक्षेपित झाले आणि चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर या यानाने अशी अनेक निरीक्षणे दिली, ज्यामुळे चंद्राला पुन्हा गवसणी घालण्याच्या जगाच्या आकांक्षा जागृत झाल्या. गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी चंद्राला गवसणी घालण्यासाठीच्या मोहिमांची सुरुवात केली; पण भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेचे यश हे चिरंतन आहे. त्यामुळेच अत्यंत कमी खर्चात साध्य केलेल्या या दुर्मीळ यशाबाबत ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांसह या मोहिमेशी संबंधित अंतराळ संशोधक आणि अन्य सर्व घटकांचे जगभरात कौतुक होत आहे.

रुपेरी चंद्राला स्पर्श करण्याची इच्छा मानव समूहामध्ये शतकानुशतके आहे. अवकाशाच्या चार भिंती ओलांडून चंद्राला स्पर्श करता येतो, हे लक्षात आल्यावर विज्ञान आणि अवकाशाशी संबंधित माहितीने या आकांक्षांना नवे पंख दिले. त्याच्यापर्यंत वाहने पोहोचवता येतात, माणसांना त्याच्या भूमीवर उतरवता येते यांसारख्या भन्नाट आणि अशक्यप्राय वाटणार्‍या संकल्पना मानवी मेंदूतून बाहेर येऊ लागल्या. अवकाश संशोधकांनी, वैज्ञानिकांनी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड दिली आणि ही दोन्ही उद्दिष्टे सुमारे साडेपाच दशकांपूर्वीच साध्य झाली. 20 जुलै 1969 पासून अमेरिकन अंतराळ एजन्सी(नासा)च्या अंतराळवीरांनी चंद्रावर उतरण्याची जी मालिका सुरू केली होती, ती सहा यशस्वी अपोलो मोहिमांमध्ये एकूण 12 प्रवाशांना चंद्रावर उतरवून संपुष्टात आली होती.

या मोहिमांमुळे चंद्राविषयी आणखी काही जाणून घेण्याची इच्छा राहिलेली नव्हती. तसेच शास्त्रज्ञांना किंवा प्रवाशांना पुन्हा चंद्रावर जाऊन नव्याने संशोधन करण्याविषयीचे प्रयत्नही थंडावले होते. पण एकविसावे शतक सुरू होताच, जगात चंद्र-शर्यतीची नवी मालिका सुरू झाली. याचे एक श्रेय भारताला देता येईल कारण ऑक्टोबर 2008 मध्ये प्रथमच भारताचे ‘चांद्रयान-1’ प्रक्षेपित झाले आणि चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर या यानाने अशी अनेक निरीक्षणे दिली, ज्यामुळे चंद्राला पुन्हा गवसणी घालण्याच्या जगाच्या आकांक्षा जागृत झाल्या. आता दुसर्‍यांदा भारतीय अंतराळ संस्था(इस्रो)चे ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. हे एक ऐतिहासिक आणि देदीप्यमान यश आहे, यात शंकाच नाही.

गेल्या पाच दशकांत असे काय घडले की, ज्यामुळे चंद्राविषयीचे जगाचे आकर्षण वाढले? खरे तर जगातील वैज्ञानिकांचे डोळे आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लागले आहेत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधारात नेहमी दिसणार्‍या खड्ड्यात (क्रेटर्समध्ये) पाणी साठलेले असू शकते. हे पाणी भविष्यात रॉकेट इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. असे मानले जाते की, चंद्राच्या या भागात आढळणारे पाणी सौरयंत्रणेच्या विविध भागांमध्ये पाठवलेल्या मोहिमांच्या रॉकेटसाठी इंधन पुरवण्याचे साधन बनू शकते. नासाच्या आकलनानुसार, चंद्रावर 600 दशलक्ष टन पाणी गोठलेल्या बर्फाच्या रूपात आहे.

चंद्रावरील या पाण्याचे विघटन करून, त्यातून मिळणारा हायड्रोजन इतर ग्रहांवर जाणार्‍या रॉकेटसाठी इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यानुसार दूर अंतराळ प्रवासासाठी चंद्र हा थांबा म्हणून वापरला जाऊ शकतो आणि तेव्हा पाण्यापासून बनवलेले रॉकेट इंधन अधिक उपयुक्त ठरू शकते. पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेल्या रॉकेटची बहुतांश ऊर्जा या ग्रहाच्या वातावरणातून आणि गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी खर्च होते. अशा परिस्थितीत, जर चंद्रावरील इंधन भरणारी केंद्रे (रिफ्युलिंग स्टेशन) सूर्यमालेतील इतर ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी अवकाशयानाच्या रॉकेटला इंधन पुरवू शकली, तर हा करिश्मा अवकाश संशोधनाला आणि अवकाश मोहिमांना नवा आयाम देणारा ठरेल. शास्त्रज्ञांना भारताच्या चांद्रमोहिमेबरोबरच अन्य मोहिमांमधून चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रचंड साठे आहेत, असे दिसून आले आहे. त्यामुळेच नासाने याच दक्षिण ध्रुवावर आर्टेमिस-3 वाहन उतरवण्याची योजना आखली आहे.

याशिवाय चंद्राची इतरही अनेक आकर्षणे आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीच्या या एकमेव नैसर्गिक उपग्रहावर अशी अनेक दुर्मीळ खनिजे आहेत, ज्याचा वापर पृथ्वीवर झपाट्याने वाढला आहे. विशेषतः चंद्रावर हिलियमचा मोठा साठा आहे. पृथ्वीच्या ऊर्जेच्या गरजा लक्षात घेऊन याचा उपयोग केला जाऊ शकतो. भारताच्या चांद्रमोहिमांचा विचार करता, ‘इस्रो’ने 2008 मध्ये चांद्रयान मोहीम सुरू केली. तेव्हाच भारताच्या अंतराळातील वाढत्या सामर्थ्याची प्रचिती जगाला आली होती. विशेष म्हणजे त्या मिशनविषयीही पाश्चिमात्य जगतासह जगाने सुरुवातीला अनास्था दाखवली होती. पण सप्टेंबर 2009 मध्ये ‘चांद्रयान-1’ने चंद्रावर पाण्याचा पुरावा दिला, तेव्हा संपूर्ण जगात आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात खळबळ उडाली होती.

मंगळ आणि दूरच्या विश्वाचा शोध घेण्याच्या मोहिमेसाठी चंद्राकडे एक थांबा म्हणून पाहिले जात असले, तरी याखेरीजही अनेक द़ृष्टीने चांदोमामा उपयुक्त ठरणारा आहे. तथापि, या मोहिमा खूप महाग असू शकतात. त्यामुळे चांद्रमोहिमांच्या व्यवहार्यतेचे समर्थन करण्यासाठी चंद्रावरून खूप काही शोधण्यासाठीच्या शक्यता तपासल्या जात आहेत, जेणेकरून या मोहिमांची व्यवहार्यता वाढण्यास मदत होईल. प्लॅनेटरी सोसायटी या संस्थेच्या मते, 1969 ते 1972 दरम्यान ‘नासा’ने केलेल्या अपोलो मोहिमांचा एकूण खर्च आजच्या तारखेला 280 अब्ज आहे. हा खर्च जगातील सर्व राष्ट्रांच्या एकत्रित सकल विकास दराच्या (जीडीपी) 78 टक्के आहे. त्यामुळे नवीन चांद्रमोहीमही खर्चाबाबत टीकेच्या केंद्रस्थानी राहिली होती; परंतु ‘इस्रो’ने हे मिशन अत्यंत कमी खर्चात यशस्वी करून दाखवले. ‘चांद्रयान-3’साठीचा एकूण खर्च 615 कोटी म्हणजेच 75 दशलक्ष डॉलर इतका आहे.

रशियाच्या अपयशी ठरलेल्या लुना-25 चा विचार करता, या मोहिमेसाठी 1600 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे अपयशी ठरलेल्या भारताच्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेसाठी 960 कोटी खर्च आला होता. याचाच अर्थ, ‘चांद्रयान-3’ ही मोहीम पूर्वीच्या मोहिमेपेक्षाही कमी खर्चात आकाराला आली आणि यशस्वीही झाली. याबाबत भारतीय अंतराळ संशोधकांचे जगभरात कौतुक होत आहे. या देदीप्यमान विजयाने भारताची जागतिक कीर्ती कैकपटींनी वृद्धिंगत केली आहे.

Back to top button