अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल | पुढारी

अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची वाटचाल करीत असताना भारताची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधून पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे. गेल्या नऊ वर्षांत भारताच्या ‘जीडीपी’ने मोठी झेप घेतली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत भारताच्या ‘जीडीपी’मध्ये 83 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. नऊ वर्षांच्या विकासदराच्या बाबतीत चीनच्या ‘जीडीपी’मध्ये 84 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे चीनच्या तुलनेमध्ये भारत केवळ एक टक्का मागे आहे. ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि ब्राझील या देशांना मागे टाकत भारताने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे आणि आपल्या तिसर्‍या कार्यकाळात म्हणजे, 2024 नंतरच्या कारकिर्दीत भारताची अर्थव्यवस्था पहिल्या तीन क्रमांकांमध्ये पोहोचेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा करीत असताना देशाच्या द़ृष्टीने अभिमानास्पद अशा या गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाणे प्रस्तुत ठरणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला जो नावलौकिक मिळाला, जी प्रतिष्ठा मिळाली ती प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची वाटचाल पूर्ण करून त्यापुढील म्हणजे, शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. स्वातंत्र्याचा लेखाजोखा मांडताना अनेक गोष्टींचा धांडोळा घ्यावा लागतो. कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘जमाखर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा’ या ओळी अनेक प्रसंगांमध्ये ओठावर येतात. स्वातंत्र्याचा जमाखर्च मागताना जमेच्या बाजूला फारसे काही नसावे, अशीच धारणा असते. परंतु, अलीकडच्या काळात परिस्थितीमध्ये अमूलाग्र बदल झाला असून, जागतिक पातळीवर तुलना करता देशाच्या जमेच्या बाजूला अनेक गौरवास्पद बाबी आहेत.

विकास ही एक प्रक्रिया असते आणि ती अखंडितपणे सुरू असते. त्यामुळे काही बाबींमध्ये त्रुटी दिसत असल्या, तरी त्यांची पूर्तता करण्याच्या द़ृष्टीने वाटचाल सुरू असल्याचा दिलासा महत्त्वाचा ठरतो. स्वातंत्र्य दिन हा तसा पाहिला, तर उत्सवाचा, साजरा करण्याचा, तिरंग्याला अभिवादन करण्याचा दिवस असतो. परंतु, केवळ उत्सवात रममान होऊन वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे इष्ट ठरू शकत नाही. मागे वळून पाहून भूतकाळाचा धांडोळा घेण्याबरोबरच वर्तमानाचे मूल्यमापन करून भविष्याची दिशा निश्चित करण्याचाही हाच दिवस असतो. त्याअर्थाने स्वातंत्र्य दिन हा मूल्यमापनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, याचे विस्मरण होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या शतक महोत्सवाकडे वाटचाल करण्यासाठी काही उद्दिष्ट्ये निश्चित केली आहेत. त्यांच्या पूर्ततेच्या द़ृष्टिकोनातून योग्य पावले पडत आहेत का, याचाही आढावा घेण्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वातंत्र्य दिनाकडे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या

देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा 77 वर्षांचा हा प्रवास पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी असा अनेक वळणांचा प्रवास आहे. रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव आणि त्यानंतर अमृत महोत्सव हे कोणत्याही वाटचालीमधील महत्त्वाचे टप्पे असतात. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेमुळे या उत्सवाला सणाचे महात्म्य प्राप्त झाले होते. आता त्याला ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या कल्पक उपक्रमाची जोड मिळाली आहे. 2047 सालाकडे म्हणजे, स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करताना आपली दिशा काय असायला हवी, हेही निश्चित करण्याचा हा टप्पा आहे. अभिमान वाटावे, डोक्यावर घेऊन मिरवावे, असे अनेक क्षण या प्रवासात आहेत.

अनेक कटू आठवणीही आहेत. ज्या संविधानाने देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवली आहे, त्या संविधानाबाबत काळजी वाटायला लावणारे प्रसंग आहेत. राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. घटनात्मक संस्थांवरील सामान्य माणसाचा भरवसा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेत अशा अनेक गोष्टी नजरेआड करून चालणार नाहीत. काळजी वाढवणार्‍या अनेक गोष्टी समोर असल्या, तरी त्यावर मात करता येईल, असा विश्वास देणार्‍या अनेक बाबी भूतकाळाच्या पोतडीत आहेत आणि त्याच इथल्या सामान्य माणसाचा आत्मविश्वास द्विगुणित करणार्‍या आहेत. देशाच्या उभारणीच्या काळात पंडित नेहरू यांच्या रूपाने भारताला दूरद़ृष्टीचे नेतृत्व लाभले. त्यामुळेच आधुनिक भारताची वैज्ञानिक पायावर उभारणी होऊ शकली. देशाची इमारत उभारताना नेहरू यांनी दाखवलेल्या दूरद़ृष्टीमुळेच आजवरचा प्रवास ठोस दिशेने होऊ शकला. ज्या देशात टाचणीही तयार होत नव्हती, तो देश स्वतःचा उपग्रह अवकाशात सोडू लागला.

भाक्रा-नांगल धरण राष्ट्राला अर्पण करताना, ‘हे उगवत्या भारताचे तीर्थक्षेत्र’ असल्याचे सांगून त्यांनी भारताच्या भविष्यातील वाटचालीचे सूचन केले होते. राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्म व्यक्तिगत जीवनापर्यंत मर्यादित ठेवण्यास सांगताना सरकारातील व्यक्तींनी कोणत्याही धार्मिक समारंभात भाग घेऊ नये, यावर ते ठाम राहिले. 77 वर्षांपूर्वीची नेहरूंची भूमिका आणि आजचे देशातील वास्तव बघितल्यानंतर आपण प्रत्यक्षात पुढे गेलोय की, मानसिकद़ृष्ट्या आपली पीछेहाट झाली आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. ‘पुष्कळ वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्णपणे किंवा काहीअंशी का होईना साकारण्याची वेळ आली आहे.

मध्यरात्रीच्या वेळी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे.’ असे उद्गार स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री काढले होते. भारताने त्यावेळी केलेला नियतीशी करार देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन आला आहे. लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग इत्यादी नेतृत्वांनी देशाच्या विकासाचा प्रवाह विविध क्षेत्रांमध्ये खळाळता ठेवला, तो एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना निश्चितच तो दिशादर्शक ठरेल.

Back to top button