अक्षरे चुरगाळिता मी अमृताचा कुंभ झालो! | पुढारी

अक्षरे चुरगाळिता मी अमृताचा कुंभ झालो!

आश्लेषा महाजन

चिंब पावसानं रान आबादानी झालं असताना, रानोमाळ सर्व्या हिर्व्या पाखरांची गाणी घुमत असताना, जाईजुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला लगडलेला असताना ऐन श्रावणात, या पुण्यनगरीत रानकवी ना. धों. महानोर सकवार मातीच्या दरवळामध्ये एकरूप झाले. त्यांचेच शब्द घुमत आहेत मनात..!

अक्षरे चुरगाळिता मी अमृताचा कुंभ झालो,
अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो…

हा कवी जीवनाच्या सांगतेला अमृताचा कुंभ घेऊन आलेला आहे, हे कटू वास्तव स्वीकारताना ‘मायमराठीचं सांत्वन करायला ओलं आभाळच आलं भेटीला’ अशी अवस्था झाली आहे. या काव्य वेल्हाळ, गोष्टी वेल्हाळ रानकवीला अखेरची सलामी द्यायला घन ओथंबून आलेलं आभाळच सामोरं येत आहे. ते जणू म्हणतंय, ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ!’ महानोरांचे वर्णन करायला आज महानोरांच्याच शेतीमातीतल्या अघड-सुघड पंक्ती सद्गदित होत येत आहेत. कारण, निसर्ग आणि मानवी मन या दोन्ही घटकांना अत्यंतिक सूक्ष्मपणे नि तितक्याच काव्यात्मक वृत्तीनं त्यांनी शब्दांकित केलं आहे. सहजसुंदर प्रतिमा आणि त्यांतून प्रतीत होणारं हळुवार उत्कट लावण्य इतकं मनमोहक आहे की रसिकही म्हणतो,
गुंतलेले प्राण ह्या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुनी बेहोष झालो शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे
कवी ना. धों. महानोर त्यांच्या कवितेत मातीचा गंध मिसळला आहे. पळसखेडमधला टवटवीत निसर्ग, वाघूर नदीच्या आसपासचे हिरवे वैभव, अजंठाच्या पंचक्रोशीतील लोकजीवन, आदिवासी जीवन, शेतीमातीत रमलेला कष्टकरी समाज या सार्‍यांच्या सजग दर्शनातून अलगद तरंगत ओळी याव्यात अशी त्यांची कविता.

पोटर्‍यातुनी गव्हाच्या हसू ओंब्यात दाटते
आणि केळीचे उगाच अंग शहारून येते…

या रानावनातल्या कवितेने कधी लोकसंस्कृतीच्या काठपदरावरील नक्षीदार नि सुकुमार जानपदांना, लोकगीतांना अंगभर मिरवलं आहे. कधी मात्र सोसलेलं दु:ख बोलघेवडं होतं. मग, ते संयमाची झूल उतरवतं आणि ‘मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली’ असं थेटपणे म्हणायला त्यांची लेखणी सरसावते. जितकी तरल नि सकवार त्यांची कविता, तितकीच ठसकेबाज नि फक्कड लावण्या त्यांनी लिहिल्या. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना’ किंवा ‘राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा..’ अशा लावण्यांमधले मधुर-मदिर लावण्य शृंगाररसाने ओतप्रोत भरलेले आहे. महानोरांच्या कवितेतील स्त्री हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या कवितेतून मुली, तरुणी, प्रेयसी, माल्हन (कष्टकरी स्त्री), गरती स्त्री, पत्नी, घरंदाज स्त्री आपल्याला भेटतात. त्यांचे निसर्ग-प्रतिमांचे दर्शन समांतरपणे घडत राहते. स्त्रीचे जीवन कष्टमय, दुखाने भरलेले असले, तरी तिची जगण्याची रीत आनंद पेरणारी आणि निर्भर आहे. ती कधी नितळ भुर्‍या मांड्यांवरले काळे डाग दाखवते, तर कधी ‘पाऊल पाऊल उचलता काच बिंदोली सांदते’, ‘दळण दळताना ती, ओवी अडली जात्यात’ असं म्हणते, तर जगण्यातून आलेल्या ‘शहाणीवेला स्मरून, अंबाड्यावर जुईची फुले माळते.’ डॉ. विजया राजाध्यक्ष म्हणतात, महानोरांची स्त्रीविषयक कविता जशी केवळ भावनिक होत नाही, तशी केवळ शृंगारिकही होत नाही. ती या दोहोंच्या मध्यावर कुठेतरी झुलत राहते. ती एकाच वेळी सूचकही आहे नि थेटही आहे. जसे,

केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले

महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’, ‘पावसाळी कविता’, ‘अजिंठा’, ‘पानझड’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘वही’, ‘पळसखेडची गाणी’ या सर्व संग्रहांतील गाणी ग्रामीण संस्कृतीतील वैशिष्ट्यांनी सजलेली आपली स्वतंत्र मुद्रा उमटवतात. ही केवळ निसर्गकविता नाही, तर मानव-निसर्ग यांचा मनोज्ञ अनुबंध त्यात नजाकतीने गोवलेला आहे. गावगाड्याचे चित्रण त्यात आहे. त्यांच्या कवितेत स्त्री-पुरुष नात्याचे, प्रेमाचे कधी सूचक, घरंदाज दर्शन घडते, तर कधी त्यातील उघड नि धीट उद्गार रसिकांना थक्क करतो. कवितेतील जानपदांमधली अस्सल लय, ताल, ठेका रसिकांना मोहित करतो. त्यांच्या तोंडून त्या खास लयीत त्यांची कविता ऐकणं हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असतो. अशी प्रादेशिक जानपदे सर्वतोमुखी करण्याचे, त्यांचे जतन करण्याचे काम त्यांच्या कवितेने केले आहे. महानोर-कविता हा या अर्थाने एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. ‘जैत रं जैत’, ‘सर्जा’, ‘दोघी’ या चित्रपटांतली बहुतेक सर्व गाणी पळसखेडच्या मातीतून उगवून आलेली आहेत आणि जनलयीतून प्रवाहित झालेल्या संगीताने सजली आहेत.

त्यांच्या कवितेत, अन्य सामाजिक, संशोधनपर लेखनात, कथांमध्ये, व्यक्तिचित्रणपर लेखनात शेतकर्‍यांचे दु:ख, कष्ट, अज्ञान, दुष्काळ, नदी, पाणी प्रश्न, पर्यावरण इत्यादी विषयांना त्यांनी कवेत घेतले आहे. याशिवाय वेगळ्या लेखनवाटाही त्यांनी धुंडाळल्या आहेत. कादंबरी लेखन, लोककथांचे, लोकगीतांचे संपादन, समकालीन कवितांचे प्रातिनिधिक संपादन, मराठी चित्रपट गीत लेखन, पाणी प्रश्नावर लेखन, प्रसंगोपात्त इतर गद्यलेखनही त्यांनी वेळोवेळी केले आहे. राजकारणातही ते काही काळ होते. काही प्रतिभावंतांच्या विधान परिषदेवर नियुक्त्या केल्या जातात. त्यात या रानकवीला दोनदा नियुक्त केले गेले होते. तिथेही त्यांनी आपले सामाजिक भान जोरकसपणे प्रदर्शित केले.

हा संवेदनशील आणि अभ्यासू शेतकरी-कवी असल्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी ते समाजात जागर करत राहिले. मातीत हात घालून मोती पिकवणार्‍या माणसालाच सामान्य माणसाची झळ समजू शकते. खरा पुरस्कार म्हणजे त्यांचे रसिकांच्या मनात असलेले अढळ स्थान. कविता, त्यातील पंक्ती जनमानसात एकरूप झालेल्या पाहण्याचं भाग्य या कवीला लाभलं. ‘नभ उतरू आलं’, ‘झाडे झाली हिरवीशी शीळ घुमते रानात’, ‘बोलघेवडी साळुंकी कसा शब्दही बोलेना’, ‘वाटा गेल्या दूरदेशी’, ‘मन चिंब पावसाळी’, ‘घन ओथंबुन येती’, ‘पक्ष्यांचे लक्ष थवे’, ‘जोंधळ्याला चांदणे लखडूनी यावे’, या आणि अशा शेकडो पंक्ती रसिकांच्या, गायकांच्या ओठी सुभाषितांप्रमाणे असतात. हे याा कवीचं वैभव आहे.

Back to top button