धक्कादायक! सेक्सटॉर्शनमुळे तरुणाने स्व:तचे जीवन संपवले

धक्कादायक! सेक्सटॉर्शनमुळे तरुणाने स्व:तचे जीवन संपवले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अनोळखी तरुणी व्हिडीओ कॉलवर पुरुषांना विवस्त्र होण्यास भाग पाडतात. त्यानंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. नुकतेच दिघी येथील एका तरुणाने बदनामीच्या भीतीने स्व:तचे जीवन संपवल्याची बातमीसमोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बहुतांश पीडित तक्रार देण्यास समोर येत नाहीत. त्यामुळे सेक्सटॉर्शनच्या या वाढत्या प्रकाराबाबत पोलिस यंत्रणा अजूनही अनभिज्ञच असल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी तरुणाच्या भावाने 21 मे रोजी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरजकुमार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यासह सहा मोबाईलधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या भावाला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्यांचा फोटो अश्लील पद्धतीने 'मॉर्फ' केला. दरम्यान, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे 51 लाख रुपयांची मागणी केली.

बदनामी होऊ नये, यासाठी फिर्यादी यांच्या भावाने आरोपींना दहा हजार रुपये ऑनलाईन पाठवले; मात्र त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. वारंवार होणार्‍या या त्रासाला कंटाळून तसेच बदनामीच्या भीतीने फिर्यादी यांच्या भावाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने स्व:तचे जीवन संपवले, असं फिर्यादीत नमूद आहे. तपास दिघी पोलिस करत आहेत.

…अशी आहे सेक्सटॉर्शनची 'मोडस'

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉल करणे सोयीचे झाले आहे. या गुन्ह्यात नग्न व्हिडीओ / फोटो शेअर केले जातात. त्याचा वापर गुन्हेगार समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी करतात. फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि मित्र व नातेवाइकांना शेअर करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली जाते. या गुन्ह्याच्या प्रकाराला सेक्सटॉर्शन म्हणून ओळखले जाते.

घाबरू नका…!

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित व्यक्ती चिंताग्रस्त होते. सायबर गुन्हेगार मॉर्फ केलेल्या प्रतिमा आणि व्हिडिओचा पैसे उकळण्यासाठी वापर करण्यास सुरुवात करतात.अशा वेळी घाबरून न जाता खालील कृती करा

  • सायबर गुन्हेगारांना प्रतिसाद देऊ नका.
  • सोशल मीडियावर रिपोर्ट आणि ब्लॉक हा पर्याय वापरा.
  • एफबी, इंस्टाग्राम किंवा तत्सम माध्यमांच्या बाबतीत, तुमच्या सर्व सोशल मीडिया मित्रांना देखील असे करण्यास सांगा.
  • तुमच्या सोशल मीडियावरील सर्व मित्रांना सायबर गुन्ह्याबद्दल माहिती द्या. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यांना फोन करून काही सांगत नाही किंवा
  • कुठली मागणी करत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही कॉल/मेसेजला प्रतिसाद देऊ नका असे त्यांना सांगा.
  • कॉल/चॅट हिस्ट्री, पेमेंट हिस्ट्री इत्यादी सारखे सर्व पुरावे गोळा करा.
  • अ‍ॅप, शेअर केलेल्या लिंक्स, फसवणूक करणार्‍याचा तपशील यासारखे कोणतेही पुरावे मिटवू नका.
  • यामुळे पोलिसांना तपास करण्यात आणि कारवाई करण्यास मदत होते.
  • जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा किंवा स्थानिक पोलिस स्टेशनची मदत घ्या.
  • पोलिसांपासून काहीही लपवू नका.
  • तक्रार करण्यासाठी तुम्ही हेल्पलाइन 1930 (गृह मंत्रालय, भारत सरकारद्वारे) वर कॉल करू शकता.
  • राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https:// cybercrime.gov.in/ वर तक्रार नोंदवू शकता.

फसवणूक कशी रोखायची?

  • हाय रिझोल्यूशनचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर कधीही शेअर
    करू नका.
  • सोशल मीडियावर तुमच्या एकाकी / सिंगल स्टेटसची माहिती देऊ नका.
  • टिंडर सारख्या अ‍ॅप्सवर तुमचे खरे नाव आणि इतर तपशील कधीही वापरू नका.
  • अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडिओ कॉलला प्रतिसाद देऊ नका.
  • तुमचे वैयक्तिक फोटो / व्हिडीओ इतरांच्या फोनमध्ये काढू देऊ नका.
  • जर तुम्ही अनोळखी नंबरवरून आलेला व्हिडिओ कॉल उचलणे आवश्यक असेल तर प्रथम कॅमेरा कव्हर करूनच मग तो फोन उचला.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे 51 लाख मागणी करण्यात आली होती. तरुणाने सायबर गुन्हेगारांना दहा हजार रुपये दिले. मात्र, सायबर गुन्हेगारांनी त्याच्याकडे आणखी पैशाचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन स्वतचे जीवन संपवले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– विजय ढमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दिघी पोलिस ठाणे

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news