मणिपूर, राजकारण अन् संसदेतला गदारोळ | पुढारी

मणिपूर, राजकारण अन् संसदेतला गदारोळ

– श्रीराम जोशी

मागील अडीच महिन्यांपासून धुमसत असलेले मणिपूर आता राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरले आहे. कुकी समाजाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. विशेष म्हणजे, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही तासांआधी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संसदेतही या विषयावरून गदारोळ उडाला आहे.

मणिपूरमध्ये हिंदू मैतेई आणि ख्रिश्चन नागा-कुकी समुदायांदरम्यान संघर्ष सुरू आहे. ज्या कारणांसाठी हा संघर्ष सुरू आहे, त्याचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तिढा सोडविण्यासाठी सर्व स्तरांवर तातडीने पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. मणिपूर प्रामुख्याने दोन भागांत विभागलेला आहे. एक राजधानी इम्फाळचा परिसर, तर उर्वरित 90 टक्के डोंगराळ आणि अतिदुर्गम भाग. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 10 टक्के असलेल्या इम्फाळ परिसरात मैतेई समाज एकवटलेला आहे. उर्वरित 90 टक्के भागात नागा-कुकींचे प्राबल्य आहे. नागा-कुकींना आदिवासींचा दर्जा प्राप्त असल्याने या 90 टक्के भागात मैतेईंसह अन्य कोणा लोकांना जागेची खरेदी करता येत नाही. दुसरीकडे 10 टक्के इम्फाळ भागात नागा-कुकींसह सर्व जाती-धर्मांचे लोक जागा खरेदी करू शकतात. मणिपूर उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी मैतेई समाजाला अनुसूचित जमातींचा दर्जा दिला जावा, असे एका खटल्याच्या निकालात म्हटले होते. त्याला नागा-कुकींनी तीव्र  विरोध चालविलेला आहे. मैतेईंना हा दर्जा देण्यात आला, तर शिक्षण-नोकर्‍यांतील तसेच विविध क्षेत्रांतील त्यांचे आरक्षण वाढेल, शिवाय 90 टक्के क्षेत्रफळात त्यांचा शिरकाव होईल, असा नागा-कुकींचा आक्षेप आहे. हे संघर्षाचे मूळ ढोबळ कारण आहे.

मणिपूर उच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध करीत 3 मे रोजी नागा-कुकींनी मोर्चा काढला होता. मोर्चावेळी मोठा हिंसाचार झाला होता आणि तेथून संघर्षाची पहिली ठिणगी पडली होती. यानंतर गेल्या अडीच महिन्यांत झालेल्या हिंसक घटनांमध्ये सुमारे दीडशे लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. 50 हजार लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागलेला आहे. अडीच महिन्यांत जाळपोळीच्या चार हजारांवर घटना घडल्या असून 275 गावांतील साडेतीन हजार घरे नष्ट झाली आहेत. पोलिस व लष्कराची हजारो शस्त्रे लुटली गेली आहेत. एकूणच सर्वत्र स्फोटक स्थिती आहे.

दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची घटना खरेतर दोन महिन्यांपूर्वीची आहे; मात्र संसदेचे अधिवेशन तोंडावर असतानाच हा व्हिडीओ कसा काय व्हायरल झाला, असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा शर्मा यांच्यासह भाजपच्या इतर काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. तिकडे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी महिलांवर अत्याचार झाल्याची अशी अनेक प्रकरणे आहेत, असे सांगत मैतेई महिलांवरही अत्याचार झाल्याचे सूचक वक्तव्य केले. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि तमाम विरोधी पक्ष आमनेसामने आले आहेत. वास्तविक, या विषयात राजकारणाचा शिरकाव धोकादायक ठरू शकतो; मात्र दुर्दैवाने हा विषय राजकीय दंगलीचा विषय ठरू लागला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यांत अशाच प्रकारच्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यावर विरोधकांनी सोयीस्कर मौन का पाळले आहे, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे.

स्त्री देहाची विटंबना करण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, यात काही शंका नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर आपले हृदय आज वेदनांनी भरलेले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तिकडे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सरकारने कारवाई करावी, अन्यथा आम्ही स्वतः कारवाई करू, असा दम भरला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागा-कुकी समुदायात आक्रोश पसरला आहे. मणिपूर जळत असताना पंतप्रधान मूग गिळून गप्प बसले असल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी चालविलेला आहे. एरव्ही अन्य विषयांवर तासन् तास बोलणारे पंतप्रधान मोदी मणिपूरच्या विषयावर का थंड आहेत, असा घणाघात काँग्रेसने केला आहे. संसदेत सर्व कामकाज बाजूला ठेवून या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी व पंतप्रधानांनी त्यावर उत्तर द्यावे, असा विरोधकांचा आग्रह आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांचे कामकाज याच विषयावरून झालेल्या गदारोळावरून वाहून गेले.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोनदा राज्याचे दौरे केले, तरीही तेथे शांतता परतलेली नाही. मध्यंतरी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राजीनामा देऊ केला होता; पण त्यांच्या समर्थकांनी त्यांना त्यापासून रोखले होते. परिस्थिती आणखी खराब झाली, तर सिंग यांना त्यांची खुर्ची टिकविता येणे अवघड ठरेल. महिलांची विटंबना करणार्‍या काही आरोपींना पकडण्यात आले आहे, तर एका आरोपीचे घर जाळून टाकण्यात आले आहे. हिंसाचार पसरवित असलेले लोक मैतेई असोत अथवा नागा-कुकी असोत. त्यांना जरब बसविणे अत्यंत आवश्यक ठरले आहे. मणिपूर हे दुर्गम आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर वसलेले राज्य आहे. येथून म्यानमारची सीमा जवळ आहे.

म्यानमारच्या माध्यमातून चिनी लष्करशहा मणिपूर आणि अन्य शेजारी राज्यांत अस्थिरता पसरवू शकतात, ही बाब नाकारता येत नाही. त्यामुळे समस्येच्या मुळाशी जाऊन मणिपूरचा उद्रेक लवकरात लवकर थंड केला पाहिजे. मणिपूरच्या विषयावर संसदेत चर्चा घडवून आणण्यास सरकार तयार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. चालू आठवड्यात या विषयावर चर्चा होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. तथापि, सध्याच्या परिस्थितीत मैतेई आणि नागा-कुकीमधल्या वादाच्या मुळाशी जाऊन चर्चेच्या आणि सामंजस्याच्या माध्यमातून तोडगा काढणे देशहिताच्या द़ृष्टीने जास्त आवश्यक आहे. महिलांची काढण्यात आलेली धिंड ही लाच्छंनास्पद आहे. यावरून सध्या महिलांकडे कोणत्या भावनेने पाहिले जाते, हे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. महिला ही केवळ वापराची वस्तू आहे, तिच्या भावनांशी कधीही खेळले जाऊ शकते, हे मणिपूरमधील घटनेने समोर आले आहे. आज अनेक क्षेत्रांत महिला कर्तबगारी दाखवत असताना दुसरीकडे महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात, हे विकासाकडे दमदार वाटचाल करत असलेल्या देशातील भयावह चित्र धोकादायक आहे. याला लवकरच आवर घालणे आवश्यक असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि नराधमांवर कडक कारवाई करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलण्याची गरज आहे.

 

Back to top button