चीन ला ‘बाय-बाय!’ | पुढारी

चीन ला ‘बाय-बाय!’

बाजारपेठांतील गर्दीने दिवाळीची चाहूल लागली आहे. सारा देश अनलॉक झाला आहे. बहुतांश राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. कोरोनाच्या तमातून दिवाळीच्या तेजाकडे वाटचाल होत असताना गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मांडली. येत्या दिवाळीत स्वदेशी वस्तू खरेदी करून स्वदेशी दिवाळी साजरी करा, असा त्यांचा संदेश होता. ‘मेक इन इंडिया’ अर्थात स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना मागणी वाढावी आणि आपले परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी व्हावे, ही सगळ्यांची अपेक्षा आणि सरकारचे उद्दिष्ट असले, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसते आणि आहेही. आपण मुक्त जागतिक बाजारपेठेत राहतो आणि मुक्त बाजारपेठेत ‘जो स्वस्त आणि दर्जेदार, त्याला मागणी जोरदार’ हा नियम असतो. अशा स्थितीत भारतीय बनावटीच्या वस्तूंना मागणी वाढायची असेल, तर एक तर बाजारपेठ बंदिस्त करावी लागेल म्हणजेच आयात थांबवावी लागेल किंवा आपल्या वस्तूंचा दर्जा वाढवून किमती कमी ठेवाव्या लागतील. चीन च्या उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण करताना हे दोन्ही साध्य केलेे. त्यामुळे फक्त भावनिक आवाहन करून दीर्घकाळ फरक पडणार नाही, हे गेल्या दोन वर्षांतील आयात-निर्यातीने दाखवून दिलेे. कारण, बाजारपेठ आली की ‘बात धन की’ येते आणि कुणी, किती, काहीही म्हटले, तरी खर्च करताना त्या बदल्यात काय मिळते आहे, हा विचार ग्राहक करतोच. त्यातही भारतीय ग्राहक अजून चिकित्सक. तो एक वेळ दर्जाबद्दल तडजोड करेल; पण स्वस्त आणि कामचलाऊ व महाग आणि दर्जेदार यातून एक निवडायचे झाले, तर स्वस्त आणि कामचलाऊ निवडेल. म्हणून तर भारत-चीन संघर्ष 2017 च्या डोकलाम चकमकीपासून चिघळला असतानाही चिनी वस्तूंची भारतातील आयात कमी झालेली नाही. उलट लॉकडाऊनचा परिणाम म्हणून त्यात वाढच झाली. दोन लॉकडाऊननंतर आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद राहिल्यामुळे भारताची एकूण आयात सुमारे 32 टक्क्यांनी घटली; पण याच काळात चीन मधून होणारी आयात मात्र केवळ 17 टक्क्यांनी घटली. वैयक्तिक वापराच्या वस्तू आणि किचनमधील वस्तूंच्या आयातीत चिनी वाटा तब्बल 90 टक्क्यांपर्यंत आहे. मोबाईल हँडसेटबाबत तर चित्र स्पष्टचआहे. भारत आणि चीनमधील व्यापार सुमारे 51 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे चार हजार अब्ज रुपयांच्या आसपास आहे. जगात सर्वाधिक व्यापार आपण कुणाशी करत असू, तर तो चीनशी. जगाच्या तुलनेत चिन मधील वस्तूंची स्वस्ताई हे कारण आहेच; पण सख्खा शेजारी हे आणखी एक कारण. चीन आपल्यापासून खूप दूर असता, तर आपसूकच वाहतूक खर्च वाढला असता अन् त्याबरोबर किमतीही; पण आपल्या सीमा जुळलेल्या आहेत. इतक्या की अरुणाचल प्रदेशवर चीन आजही दावा सांगतो, संधी मिळेल तिथे हा मुद्दा उपस्थित करतो.

पण, तरीही चीनमधून होणारी आयात आपण थांबवू शकलेलो नाही. आपण डब्लूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असल्याने ते शक्य नाही. शिवाय वर उल्लेखलेल्या सुमारे 4 हजार अब्ज रूपयांच्या व्यापारात आयात सुमारे 3 हजार अब्ज रूपयांची आणि निर्यात एक हजार अब्ज रूपयांची आहे. हे एक हजार अब्ज रुपयांचे चलन डॉलरच्या रूपात आपल्याला चीनकडून मिळते. त्यामुळे चिनी वस्तूंची आयात आपण बंद करू शकत नाही आणि केलीच, तर ‘जशास तसे’ म्हणून चीनही भारतीय वस्तूंची आयात बंद करेल. त्यातून फक्त चलनरूपी नुकसान पाहिले, तर चीनचे नुकसान जास्त होईल; पण त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत ते नुकसान नगण्य असेल. आपले तसे नाही. आता स्वदेशी दिवाळीच का हे पाहू? भारताची अर्थव्यवस्था वाढत असताना नुकसान सहन करणे हा वाढीला लागलेला ब्रेक असेल. म्हणूनच लोकांनीच चिनी वस्तू टाळून भारतीय वस्तू खरेदी करणे, हा नुकसान टाळण्यासाठीचा तोडगा असेल. पंतप्रधान त्याच अनुषंगाने स्वदेशी दिवाळीवर बोलले. गेल्या जुलैमध्ये चिनी लष्करामुळे 20 भारतीय सैनिकांना जीवाचे बलिदान द्यावे लागल्यानंतर उत्तर भारतातील अनेक व्यापार्‍यांनी

स्वतःहून चिनी वस्तू न मागवण्याचा संकल्प केला; पण तो टिकवायचा असल्यास भारतीय ग्राहकालाच आपल्या खिशाला थोडी चाट लावून भारतीय वस्तू खरेदी कराव्या लागतील. त्या वस्तूंवर केलेला खर्च माझ्याच देशात राहणार आहे, माझ्याच देशबांधवांच्या गरजा पूर्ण करणार आहे, असा विचार करावा लागेल. तसा विचार करताना हेही ध्यानात ठेवावे लागेल की, दिवाळी केवळ प्रतीकात्मक साजरी करायची नसते, तर त्यामागे भावनाही लागतात. दिवाळीत तेलाचा दिवा लावावा अशीच परंपरा; पण तेलाच्या दिव्याऐवजी चिनी बनावटीचे विजेवर चालणारे दिवे आले. त्यामुळे कुंभारांची दिवाळी अंधारी होत आहे. आता तर झेंडूची फुलेही कृत्रिम आली. त्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळीही अंधारी होत आहे. हे कुठपर्यंत चालायचे? दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा. मग, फक्त काहीच लोकांना त्याने प्रकाशाकडे घेऊन जावे आणि इतरांना माघारी सोडावे, असे झाले, तर दिवाळी खरोखर आनंदमयी होईल का? स्वदेशी वस्तू नाकारताना किंवा खरेदी करताना संकोच बाळगून चालणार नाही. त्या जाणीवपूर्वकच खरेदी कराव्या लागतील. 5 हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न आपण पाहत असताना देशातील सगळेच घटक त्या स्वप्नाचा भाग बनायला हवेत. येत्या दिवाळीला हा संकल्प पुरेसा ठरावा. चीन ला ‘बाय-बाय’ म्हणण्याची वेळ आली आहे.

Back to top button