ड्रेसकोड | पुढारी

ड्रेसकोड

मित्रा, आजकाल बर्‍याच ठिकाणी असे कपडे घालू नका, तसे कपडे घालू नका किंवा अमूकच कपडे घाला असा प्रकार फार वाढत चालला आहे. आता हेच बघ ना, बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयात जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालायला मनाई केली आहे. म्हणजे कार्यालयात येताना तुम्ही विशिष्ट गणवेशच घातला पाहिजे. काय कारण असेल याच्या मागे?

हे बघ, जगभरात जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट हे सर्वत्र वापरले जातात. अगदी जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेटस् हेसुद्धा अशाच प्रकारचे ड्रेस घालतात; पण आपल्या देशाचा प्रॉब्लेम काही वेगळाच आहे. आपल्याकडे जीन्स पॅन्ट, टी शर्ट हे कॅज्युअल म्हणजे सहज घालायचे कपडे समजले जातात. आधीच कॅज्युअल असणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांनी कॅज्युअल कपडे घातले, तर तो आणखीच कॅज्युअल होईल, असे एखाद्या सरकारला वाटले आणि त्याप्रमाणे त्यांनी नियम केले, तर कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही, तरीही मला असे वाटते की, गणवेशापेक्षा प्रवृत्ती आणि मनोवृत्ती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे,
मला नाही समजले?

गणवेशाचे महत्त्व आहेच. अगदी साधा, किरकोळ शरीरयष्टीचा पोलीस असेल आणि तो चौकामधील रहदारी नियंत्रित करत असेल, तर ती रहदारी केवळ त्याच्या खाकी गणवेशामुळे नियंत्रणात राहते.असा विचार कर की, एखादा ट्रॅफिक पोलीस साधा शर्ट, पॅन्ट घालून किंवा नेहरू शर्ट, पायजमा घालून चौकात उभा राहिला, तर त्याचा कुणाला तरी धाक वाटेल का? अर्थात नाही. धाक शरीरयष्टीचा नसतो, तर तो खाकी वर्दीचा असतो. म्हणजे सिस्टीम चालायची असेल, तर गणवेश आवश्यक आहे, हे मान्य केले पाहिजे.

संबंधित बातम्या

तू म्हणतोस ते बरोबर आहे; पण मग विशिष्ट गणवेश निश्चित केला, तर शासनाने तो तयार करून द्यावा लागेल. त्याच्यासाठी पुन्हा अतिरिक्त खर्च होईल तो कुठून करायचा, हे प्रश्न उभे राहतील.

चुकते आहे तुझे. इथे फक्त विशिष्ट गणवेश सांगितलेला नाही, तर पिकनिकला जाताना घालायचे कपडे घालून शाळेत येऊ नका किंवा शिक्षण विभागात काम करू नका, असे सांगितले आहे.

म्हणजे काही ना काहीतरी ड्रेस कोड असला पाहिजे. परवाच मुंबईत अशी घटना घडली की, घरी चोरी झाल्याची तक्रार घेऊन एक तरुण मुलगा पोलीस ठाण्यामध्ये गेला. तो आपला नेहमीचा ढीला ढाला टी शर्ट आणि बरमुडा घालून गेला होता. तेथील पोलीस निरीक्षक साहेबांनी त्याला ‘असे कपडे घालून पोलीस ठाण्याला येतोस काय?’ असे म्हणून झापले. यावर त्या तरुणाने दिलेले उत्तर फार मनोरंजक होते. तो म्हणाला, साहेब, मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि गेली चार वर्षे झाले घरून काम करत आहे. त्यामुळे माझ्याकडे दुसरे कोणते कपडेच राहिलेले नाहीत. फक्त टी शर्ट आणि बरमुडा यावर मी चोवीस तास असतो.

हो, पण शासनाच्या बर्‍याच विभागांमध्ये गणवेश सक्तीचे असतात. जसे की विद्युत मंडळ, होमगार्ड, पोलीस त्याचबरोबर ऑटो चालकांनाही गणवेश सक्तीचा असतो. कोणी वापरतात कोणी वापरत नाहीत; पण काहीही म्हण, गणवेशधारी व्यक्ती ही नेहमी जबाबदार अशी वाटते. त्यामुळे काम घेऊन जाणार्‍या माणसाला आपले काम होईल, याचा विश्वास वाटतो. गणवेशामध्ये ती शक्ती आहे. बिहारच्या एका जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय कर्मचार्‍यांना ड्रेस कोड दिला आहे.

– झटका

Back to top button