बी टीम हा काय प्रकार? | पुढारी

बी टीम हा काय प्रकार?

मित्रा, मला एक सांग, राजकारणामध्ये ही काय नवीनच भानगड येऊन बसली आहे? सतत सर्वत्र एकमेकांवर आरोप केला जातो की, हा त्याची बी टीम आहे, तो याची बी टीम आहे. ही बी टीम नावाची काय भानगड मला समजले नाही. एखाद्या देशाच्या वतीने खेळताना त्या-त्या देशाची क्रिकेटची ए टीम असते. कारण, देशाच्या इज्जतीचा सवाल असतो. तर मग अन्य देशांबरोबर खेळण्यासाठी कुणाही देशाने बी टीम तयार केल्याचे ऐकिवात नाही. मग राजकारणामध्ये बी टीम नावाचा प्रकार काय आहे? जरा समजाऊन सांगशील का.

कोण कुणाची बी टीम आहे की नाही, हे तर मला माहीत नाही; पण बी टीम हा काय प्रकार आहे, ते मी तुला सोपं करून सांगतो. म्हणजे बघ, बरेचदा एखाद्या मतदारसंघात एक विशिष्ट जातीचा तगडा उमेदवार उभा असतो. मग त्या जातीची सगळीच्या सगळी मते त्याच्याकडे जाऊ नयेत, यासाठी दुसरा एखादा तगडा उमेदवार त्या जातीचे दोन-तीन अपक्ष उमेदवार उभे करतो. म्हणजे, उद्देश असा असतो की त्या उभ्या केलेल्या डमी उमेदवारांनी निवडून यायचे नसते, त्यांनी फक्त मुख्य उमेदवाराची मते खायची असतात. ती मते पाचशे असतील, हजार असतील, दहा हजार असतील. त्याची नेमणूक केवळ तेवढ्या करता झालेली असते. म्हणजे, याचा अर्थ असा की मुख्य उमेदवाराची काही मते खाल्ली की, त्याचे काम संपले. त्याच्या बदल्यामध्ये त्या डमी उमेदवाराला किंवा उभ्या केलेल्या उमेदवाराला भरपूर पैसे दिले जातात. त्याच पद्धतीने एखादा पक्ष असतो, तो आणखी एखाद्या पक्षाला भरपूर निधी देऊन किंवा थोडक्यात म्हणजे, जे पाहिजे ते देऊन त्या पक्षाचे उमेदवार जागोजागी उभे करतो. त्यांचा उद्देश निवडून येणे हा नसतो, तर प्रमुख विरोधी पक्षाला कमकुवत करणे हा असतो. म्हणून मग नवीन कोणता एखादा पक्ष आला किंवा एखादा पक्ष उमेदीने कामाला लागला, तर दुसर्‍या पक्षाच्या लोकांच्या लक्षात येते की, याच्या पाठीशी अमूक तमूक पक्ष आहे. त्यामुळे लगेच आरोप सुरू होतात की, तो पक्ष या पक्षाची बी टीम आहे. ए आणि बी टीम प्रत्यक्षात एकमेकांच्या विरोधात लढतात. परंतु, मुख्य लक्ष्य एका विशिष्ट पक्षाची मते खाणे आणि त्याला कमकुवत करणे आणि त्यांच्या जागा पाडणे एवढेच असते.

अच्छा म्हणजे, त्यांना निवडून येण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. फक्त एखाद्या विशिष्ट पक्षाची मते खाऊन त्या पक्षाला कमकुवत करून त्याचा पराजय करणे एव्हढ्या उद्देशाने जी टीम उभी राहते तिला बी टीम असे म्हणतात, बरोबर?

संबंधित बातम्या

अगदी बरोबर. मला वाटते तुला बी टीम हे काय प्रकरण आहे हे समजले असेल. आता पुढील काळामध्ये समजा एखादा पक्ष बी टीम असेल आणि त्यांनी आणखी एखादा छोटासा पक्ष त्याच कामासाठी वापरला असेल, तर त्याला सी टीम म्हटले जाईल. याचप्रमाणे डी, इ अशा टिमा निघू शकतील; पण बरेचदा ही बी टीम सर्व पक्षांसाठी काम करून ज्यांची त्यांनी नेमणूक केली आहे, त्या ए टीमला पण धोका देऊ शकते, याला राजकारण म्हणतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचे आहे? आपल्या डोक्या बाहेरचे खेळ आहेत हे सगळे.

म्हणजे, पुढील काळामध्ये काही पक्ष असे निघतील की ते स्वतःच जाहीर करतील की, आमचा पक्ष कुणासाठीही बी टीम म्हणून काम करायला तयार आहे. खर्च इतका करा आणि आमचा बी टीम म्हणून वापर करा… हो. हे सहज शक्य आहे. त्यामुळे बी, सी, डी, इ, पासून एक्स, वाय, झेडपर्यंत काम करणारे पक्ष निघू शकतील तेव्हा राजकारण आणखी गमतीचे झालेले असेल.

– झटका

Back to top button