लष्कराची मारक आणि टेहळणी क्षमता वाढणार | पुढारी

लष्कराची मारक आणि टेहळणी क्षमता वाढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौर्‍यात झालेल्या एका महत्त्वाच्या सामरिक कराराची सध्या चर्चा आहे. त्यानुसार एमक्यू 9 प्रीडेटर ड्रोन्स भारतीय हवाई ताफ्यात दाखल होणार आहेत. हे ड्रोन्स म्हणजे विनाचालक हवाई वाहनाचा अतिप्रगत प्रकार आहे. अमेरिकन वायुदल आणि संरक्षण विभागाच्या भात्यातील ब—ह्मास्त्र म्हणून या ड्रोन्सची ओळख आहे. चीन आणि पाकिस्तानची टू फ्रंट थ—ेट डोक्यावर तलवारीसारखी टांगती असताना ही ड्रोन्स भारतीय सुरक्षा प्रणाली आणि सामरिक सज्जतेत महत्त्वाची भूमिका बजावतील. ड्रोन्सच्या सौद्याने भारतीय लष्कराची मारक आणि टेहळणी क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे.

एमक्यू 9 प्रिडेटर ड्रोन्स हा विनाचालक हवाई वाहनाचा अतिप्रगत प्रकार आहे. या लष्करी ड्रोन्सची निर्मिती जनरल अ‍ॅटॉमिक एरोनॉटिकल सिस्टीम या अमेरिकन कंपनीकडून केली जाते. 240 नॉटस् वेगाने 50 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करणार्‍या या ड्रोन्सचे एकूण वजन सुमारे 1740 किलो असते. यामध्ये ड्रोनचे वजन 314 किलो आणि 1361 किलो बाह्य सामग्री, क्षेपणास्त्रे, बॉम्ब यांचे वजन असते. हे ड्रोन सलग 27 ते 35 तास हवेत राहू शकतात. अशा प्रकारचे शक्तिशाली आणि अद्ययावत ड्रोन्स आपल्या ताफ्यात असले पाहिजेत, अशी मागणी भारतीय लष्कर अनेक वर्षांपासून करत आले आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत प्रीडेटर ड्रोन्स देशातच तयार करावे, हा सांप्रत शासनाचा आग्रह असल्यामुळे ही मागणी थंड्या बस्त्यात टाकण्यात आली. सरकार लवकरच ही लष्करी मागणी मान्य करेल, अशा वावड्या अधूनमधून उठत असत आणि लष्कराच्या आशा परत एकदा पल्लवित होत असत; पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकन संरक्षण सल्लागार जेक सलिव्हन यांच्यात नुकत्याच झालेल्या दिल्लीतील बैठकीनंतर याची पुन्हा चर्चा सुरू झाली. 19 जून रोजी संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिलने 29 हजार कोटी रुपयांच्या 31 प्रीडेटर ड्रोनच्या सौद्याला हिरवा कंदील दाखवला. यावर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मंजुरी मिळाली नाही; पण येत्या काही दिवसांत ती नक्की मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकन दौर्‍यात या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर हे ड्रोन्स लवकरच लष्करात दाखल होणार आहेत.

यापैकी काही ड्रोन्स भारतात बनतील आणि या सर्वांना भारतीय मिसाईल व बॉम्बशी एकजीव केले जाईल. भारत फोर्ज लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्या या निर्मितीत अग्रेसर असतील. भारत फोर्ज आणि जनरल अ‍ॅटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम यांनी जानेवारी 2023 मध्ये या ड्रोन्ससाठीचे सुटे भाग बनवण्यासंबंधी करारावर स्वाक्षरी केली आहे. त्याचप्रमाणे, एचएएल आणि जनरल टॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम यांनी या ड्रोन्ससाठी मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हर ऑल फॅसिलिटी (एमआरओ) यांना चालना देणारे टीपीई 331-5 आरकेआर बनवण्यासंबंधी करारावर एरो इंडिया शो-2023 दरम्यान स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या 31 ड्रोन्सपैकी 10 ड्रोन्स हत्याराविना लगेच भारतात येतील. उर्वरित 21 वर लेसर गायडेड बॉम्ब आणि मिसाईल असतील. भारतीय नौसेनेने मे 2020 च्या गलवान घुसखोरीनंतर दोन प्रीडेटर ड्रोन्स लिझवर घेतले होते. ते आजही भारतीय नौदल वापरते आहे. मागील 20 महिन्यांत या ड्रोन्सनी प्रत्येकी 10 हजार तासांचे उड्डाण पूर्ण केले आहे. गलवान घटनेनंतर भारतीय स्थलसेनेने त्यांचा वापर लडाखमधील चिनी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केला होता.

संबंधित बातम्या

प्रीडेटर ड्रोन्स हे अमेरिकन वायुदल आणि संरक्षण विभागाच्या भात्यातील ब—ह्मास्त्र आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. ही प्रीडेटर ड्रोन्सची अतिसुधारित आवृत्ती आहे. याची संशोधननिर्मिती 1990 मध्ये सुरू झाली. हे शस्त्र त्याच्या लाँग एंड्युरन्स, हाय अल्टिट्युड सर्व्हेलन्स आणि स्ट्राईक कॅपेबिलिटीसाठी विख्यात आहे. गुप्त माहिती संकलन, टेहळणी आणि सैनिक परीक्षण ही याची प्राथमिक ध्येये आहेत. विविध प्रकारचे असंख्य सेन्सर्स आणि कॅमेरे असल्यामुळे हा ड्रोन त्याच्या लक्ष्याची रियल टाईम इमेजरी घेऊन त्वरित पृथ्थकरणासाठी त्याच्या ग्राऊंड कंट्रोल स्टेशनकडे पाठवतो. या पृथ्थकरण क्षमतेमुळे लष्करी कारवाया, सीमेवरील टेहळणी आणि काऊंटर टेरर स्ट्राईक्समध्ये अतिशय मोलाची व कालानुरूप मदत मिळते.

प्रीडेटर ड्रोन्स सहा इंचाच्या अचूकतेने लक्ष्यभेद (प्रिसिजन स्ट्राईक) करतात. यावर एजीएम 114 हेल फायर मिसाईल्स ते जीबीयू 12 पेव्ह वे टू लेसर गायडेड बॉम्बसारखी विध्वंसक शस्त्रे बसवलेली असतात. अमेरिकेने कुवेत, अफगाणिस्तान, इराक आणि सिरियात प्रीडेटर ड्रोन्सचा अतिशय अचूक वापर केला होता. त्याचा किल रेट 99.5 टक्के होता. आता हेच ड्रोन्स युक्रेनलाही देण्यात येणार आहेत. माहिती गोळा करण्याची क्षमता, सतत टेहळणी, शत्रूवर अत्याचूक मारा, मोठी उड्डाण क्षमता आणि विविध हत्यारे नेण्याची क्षमता यामुळे प्रीडेटर ड्रोन्स शत्रूचा कर्दनकाळ ठरतात. शत्रूंच्या कारवाया शोधून त्या उद्ध्वस्त करत असतानाच हे ड्रोन्स ग्राऊंड फोर्सेसनाही क्लोज एयर सपोर्ट देतात. यासाठी जवळपास सलग 27 तास हवेत राहण्याची क्षमता या ड्रोन्समध्ये आहे. चीनकडे सईहाँग 4, विंग लूंग 2 आणि इतर शस्त्रे नेणारी ड्रोन्स आहेत. ती मुबलक प्रमाणात चीनने पाकिस्तानलाही दिली आहेत. परिणामी, या क्षेत्रात भारतासाठी असंतुलित सामरिक परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला काट म्हणून भारताला प्रीडेटर ड्रोन्सची नितांत आवश्यकता होती. प्रीडेटर ड्रोन्स लष्करात दाखल झाल्यानंतर भारताला अनेक सामरिक फायदे मिळतील. चीन व पाकिस्तानची टू फ्रंट थ—ेट डोक्यावर तलवारीसारखी टांगती असताना प्रीडेटर ड्रोन्स भारतीय सुरक्षा प्रणाली आणि सामरिक सज्जतेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील, यात शंकाच नाही. हा आपल्या ताफ्यातील खरा गेमचेंजर सिद्ध होईल. प्रीडेटर ड्रोन्सपैकी 15 भारतीय नौसेना आणि प्रत्येकी आठ स्थल सेना व वायुसेनेत जातील. यामुळे आपली पश्चिम व उत्तर सीमा आणि हिंद महासागरातील लक्ष्यांसाठी आवश्यक मारक क्षमता आणि लांब पल्ल्याच्या टेहळणी क्षमतेला बळ मिळेल. 2019 च्या लडाखमधील चिनी घुसखोरीनंतर बॉर्डर सर्व्हिलन्ससाठी आणि हिंद महासागरातील चिनी युद्धपोतांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी यांची नितांत आवश्यकता होती.

– कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)  

Back to top button