एक झुंज वादळाशी | पुढारी

एक झुंज वादळाशी

अरबी समुद्रातून उठलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गेले आठवडाभर भारतासह पाकिस्तानातही प्रचंड दहशत निर्माण केली होती. गुजरातला या वादळाचा मोठा धोका असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. गुरुवारी गुजरातमधील 940 गावांना कमी-जास्त तडाखे देत हे वादळ राजस्थानकडे सरकले. वादळाने मोठी हानी केली असली, तरी प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे नुकसानीची तीव—ता कमी करण्याबरोबरच जीवितहानीही टाळण्यात यश आले. त्या अर्थाने भारताने या वादळाशी समर्थपणे मुकाबला केला असेच म्हणावे लागेल. आपत्ती व्यवस्थापन नीट झाले, तर संकटाची तीव—ता कमी करता येते, हेच या घटनेने दाखवून दिले. गुजरातला बिपरजॉय वादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज 6 जूनला वर्तवण्यात आला होता. म्हणजे, तयारीसाठी सरकारकडे एक आठवड्याचा कालावधी होता. या काळात लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. सुमारे पाऊण लाख लोकांना तात्पुरत्या निवार्‍यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ज्या परिसराला वादळाचा फटका बसण्याची शक्यता होती त्या परिसरात मोठी खबरदारी घेण्यात आली होती. आकाश आणि जलमार्ग अशा सर्व पातळ्यांवर तयारी होती, तरीही या वादळाने गुजरातच्या अनेक भागांत हाहाकार उडवला. वादळामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले; मात्र प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टाळण्यात यश आले. वादळामुळे गुजरातच्या भूजमध्ये विजेचे दोनशे खांब कोसळळे आहेत. या परिसरातील अनेक वीज उपकेंद्रे ठप्प झाली. रस्त्यांवर शेकडो वृक्ष उन्मळून पडले. एवढे सर्व होऊनही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करणार्‍या प्रशासनाने कमीत कमी नुकसान होईल याची आम्ही खबरदारी घेत असल्याचे म्हटले आहे. भूजबरोबरच द्वारका, कच्छ आणि जामनगरमध्येही अशीच परिस्थिती राहिली. हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार बिपरजॉय वादळ हा 1999 च्या चक्रीवादळाचा अ‍ॅक्शन रिप्ले आहे. चोवीस वर्षांपूर्वीचे हे वादळ ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने आणि तशाच वेगाने बिपरजॉय वादळ गेल्याचे दिसते. 1999 चे वादळ इतिहासातील एक दुःस्वप्न मानले जाते. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार त्यामध्ये 189 लोकांचा मृत्यू झाला होता. 150 लोक बेपत्ता झाले होते, तर 1 लाख 38 हजार लोकांना त्याचा तडाखा बसला होता. 2 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती त्या वादळाने उद्ध्वस्त केली होती आणि बाधितांना दीर्घकाळ निवारा शिबिरांत राहावे लागत होते. एकूण वादळांमुळे विध्वंस कोणत्या पातळीवर जातो, हे लक्षात येते. त्या तुलनेत यावेळच्या वादळाशी आपली झुंज यशस्वी झाली. दरवेळी एखादे वादळ सुरू होते, त्याला विशिष्ट नाव दिले जाते. ही नावेही वेगळी आणि आकर्षक असतात. बिपरजॉय हे वादळाचे नाव बांगला देशने सुचवलेले असून त्याचा अर्थ बंगालमध्ये संकट असा आहे. अशी नावे निश्चित करण्याची एक परंपरा आहे. 1953 पासून संयुक्त राष्ट्राची एक शाखा असलेल्या जागतिक हवामान संघटनेकडून (डब्ल्यूएमओ) वादळाचे नामकरण केले जायचे; मात्र उत्तर हिंद महासागरातून निर्माण झालेल्या चक्रीवादळांना नावे दिली जात नव्हती. कारण, वाद निर्माण होण्याची भीती असायची. जातीय आणि धार्मिक वैविध्य असलेल्या या क्षेत्रात नावे निश्चित करताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असायची. निष्पक्षता राखणे गरजेचे असायचे.

लोकांच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याची आवश्यकता असायची; मात्र 2004 नंतर परिस्थितीत बदल झाला. डब्लूएमओची समिती बरखास्त करण्यात आली आणि संबंधित देशांना आपल्या क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे ठेवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानंतर भारत, पाकिस्तान, बांगला देश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड या देशांनी 64 नावांची यादी सर्वसंमतीने तयार केली. प्रत्येक देशाने आठ नावे सुचवली. तज्ज्ञांची ही समिती दरवर्षी बैठक घेऊन नावांची यादी अद्ययावत करते. वादळांच्या मुळाशी जाऊन विचार करताना हवामान बदल लक्षात घ्यावा लागतो. परंतु, हवामान बदलाचा विषय ही कुठली तरी वेगळ्या ग्रहावरची किंवा वेगळ्या वर्गाची समस्या असल्यासारखे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अर्थात, हा विषय शास्त्रीय असल्यामुळे ज्या प्रमाणात विज्ञान विषयाकडे दुर्लक्ष केले जाते, तसेच याही समस्येसंदर्भात होताना दिसते. अशा स्थितीत हवामान बदल ही सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित बाब असल्याचे पटवून देण्याची आवश्यकता आहे. हवामान बदल म्हणजे केवळ हिमालयातील हिमशिखरांवरील बर्फ वितळते असा काहीसा गैरसमज दिसून येतो. प्रत्यक्षात हवामान बदलामुळे माणसांची जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचे रेताड जमिनीत रूपांतर होते. पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पिके उगवणे शक्य होत नाही, हे समजून सांगण्याची आवश्यकता आहे. मागे तौक्ते या चक्रीवादळाचा फटका गुजरातला बसला. काढणीला आलेल्या केशर आंब्यांच्या बागा, तसेच अन्य पिके त्यामुळे नष्ट झाली. या वादळामुळे नुसत्या कृषी क्षेत्राचे 1200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे गुजरात सरकारने अधिकृतपणे जाहीर केले होते. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील शेती आणि अन्य पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान वेगळे. फक्त ओडिशा राज्यामध्ये सहाशे कोटी रुपयांचे शेतीचे नुकसान झाले होते. 2021 मध्ये देशात विविध भागांमध्ये झालेली अतिवृष्टी, पूर यामुळे 360 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. जागतिक तापमान केवळ 1 अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे हा उत्पात झाला होता. तापमान 1.5 अंश सेल्सिअस किंवा 2 अंश सेल्सिअसने वाढले, तर काय अनर्थ ओढवू शकेल, याचा विचार केलेला बरा. जागतिक तापमानवाढीच्या संकटाला सामोरे जाताना दोन पर्यायांपैकी पहिला पर्याय म्हणजे धोका कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे बदलत्या हवामानाशी जुळवून घेता येईल, अशी मानवी जीवनाची उभारणी करणे. त्या द़ृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

Back to top button