लोकसभेच्या जोडण्यांना वेग | पुढारी

लोकसभेच्या जोडण्यांना वेग

  •   चंद्रशेखर माताडे,  कोल्हापूर वार्तापत्र

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांतील राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या जोडण्या सुरू झाल्या आहेत. एकूणच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, कोण कोणाचा पत्ता कापणार, यापेक्षा नको असलेली लोकसभेची माळ आपल्या गळ्यातून दुसर्‍याच्या गळ्यात विशेषत: पक्षातील विरोधकाच्या गळ्यात कशी पडेल, यासाठी नेते प्रयत्न करत आहेत; तर काही इच्छुकांनी मार्चेबांधणी सुरू केली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी आपला दावा सांगितला आहे. 2009 साली अपक्ष निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस या मतदारसंघावर दावा सांगत आहे. 2014 च्या निवडणुकीत धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी दावा सांगत आहे, तर 2019 साली संजय मंडलिक शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. नंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनाही हा आमचा मतदारसंघ असल्याचे म्हणत आहे. खरी चुरस मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. शिंदे गटात प्रवेश करतानाचा उमेदवारीचा तिढा सोडविल्याचे शिंदे गटातील सर्वच खासदार सांगतात. त्यामुळे मंडलिक यांनी वेगळी भूमिका जाहीर केली अली, तरी त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित आहे. भाजपला हा मतदारसंघ मनातून हवा असला, तरी त्यांच्याकडे चंद्रकांत पाटील यांच्या शिवाय दुसरा तगडा उमेदवार आजतरी नाही. चंद्रकांत पाटील लोकसभा लढविणार की नाही, याविषयी कोणीच काही बोलत नाही . त्यामुळे सध्या तरी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून मंडलिक यांच्याकडे पाहिले जाते.

संबंधित बातम्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उत्तर, दक्षिण व करवीर हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. कागल व चंदगड राष्ट्रवादीकडे, तर राधानगरी-भुदरगड हा एकमेव मतदारसंघ शिंदे गटाकडे आहे. राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी चुरस आहे. तर काँग्रेसमध्ये उमेदवारी टाळण्याची स्पर्धा आहे. संस्थात्मक पातळीवर निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे.

हातकणंगले मतदारसंघात यापूर्वी सलग दोनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव झाला. एकदा स्वतंत्र, तर दुसर्‍यांदा भाजपच्या साथीने शेट्टी यांनी शिवार ते संसद असा प्रवास केला. मात्र, 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे तण काढून टाकणार, अशी शेट्टी यांनी भाषा केली आणि ज्यांच्या विरुद्ध त्यांनी ऊस दराचा संघर्ष केला, त्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साथीने 2019 ची निवडणूक लढविली. यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले. आताही तेथे याच दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये टक्कर होणार आहे. मात्र, शेट्टी यांना पाठिंबा कोणाचा, याची चर्चा आहे.

हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व इचलकरंजीचे आमदार भाजप समर्थक आहेत. हातकणंगले काँग्रेस, शिरोळ शिवसेना शिंदे गट याशिवाय सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे या पक्षीय ताकदीवर कोण उमेदवार? याची चर्चा आहे. कारण, शेट्टी यांनी भाजप व काँग्रेस, राष्ट्रवादीला समान अंतरावर ठेवण्याचा निर्णय घेता. त्यामुळे राष्ट्रवादी या मतदारसंघात नवा चेहरा पुढे आणू शकते.

दोन खासदार आणि 5 आमदार अशी ताकद आता दोन आमदारांपर्यंत घसरली आहे. तर शून्य आमदारावरून काँग्रेस सहा आमदारांपर्यंत प्रबळ झाली आहे. अलीकडेच झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नेत्यांनी चार आमदार असतील तरच मंत्रिपदाचा दावा करता येईल, असे जाहीरपणे सांगितल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पाच आमदारांना निवडून आणण्याची भाषा सुरू केली आहे. लोकसभेची उमेदवारी टाळायची, हा नेत्यांचा पहिला प्रयत्न असेल. त्याचबरोबर आपल्या पक्षांतर्गत विरोधकाला लोकसभेची उमेदवारी कशी मिळेल, यासाठी नेत्यांचे प्राधान्य असेल.

Back to top button