मैत्रीपूर्ण लढत! | पुढारी

मैत्रीपूर्ण लढत!

बाबा, मला एक सांगा, मैत्रीपूर्ण लढती म्हणजे काय? म्हणजे लढाई पण करायची आणि मैत्री पण करायची, हे कसे काय शक्य आहे? म्हणजे झाले असे की, मी काल पेपर वाचत होतो. त्यात असे लिहिले होते की, येणार्‍या वर्षभरात बर्‍याच निवडणुका होणार आहेत म्हणे. त्यासाठी काही पक्ष युती, तर काही आघाडी करत आहेत आणि त्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. निवडणूक ही जर लढाईच असेल एक प्रकारची तर, ज्याच्याबरोबर आपण लढत आहोत त्याच्यासोबत आपली मैत्री कशी काय असेल? असा प्रश्न मला पडलाय.

अरे, तू फक्त अभ्यास कर. अशा काही बातम्या वाचत जाऊ नकोस. आपण आपला अभ्यास करावा. निवडणुका होत राहतात, येत राहतात, जात राहतात, आपल्याला काही फरक पडत नाही. तुझी इंजिनिअरिंगची अ‍ॅडमिशन बारावीच्या मार्कांवर होणार आहे एवढे फक्त लक्षात ठेव. तरीपण तू शंका विचारलीस म्हणून त्याचे उत्तर देणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणजे, काय होतं की उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एक आघाडी आहे. ही आघाडी मिळून निवडणुका लढवणार आहे. तर आघाडीमध्ये जे काय पक्ष असतात ते प्रत्येक जागेवर हक्क दाखवत असतात. म्हणजे, त्यांचे म्हणणे असते की, त्या मतदारसंघामध्ये आमची खूप ताकद आहे. जागावाटप आधीच ठरलेले असते. जागावाटप म्हणजे कोणी किती जागा लढवायच्या हा पहिला प्रश्न आणि कोणत्या लढवायच्या हा दुसरा प्रश्न. विशिष्ट जागांवरून रस्सीखेच होते आणि जर सहमती झाली नाही, तर आघाडीचा एक उमेदवार उभा राहतो आणि त्याच्याच विरोधामध्ये आघाडीतील एका पक्षाचा उमेदवार उभा राहतो. थोडे क्लिष्ट आहे, पण समजून घे. त्या मतदारसंघात ते एकमेकांच्या विरुद्ध उभे असले, तरी पक्ष आघाडीमध्ये एकत्र असतात. म्हणूनच याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. म्हणजे मैत्री पण आहे आणि लढाई पण आहे. हा चमत्कार महाराष्ट्रामध्ये नेहमी होतो. आणखी थोडे सोपे करून सांगतो. उदाहरणार्थ, पुण्याची लोकसभेची पोटनिवडणूक घे. इथे ही जागा पूर्वी एका पक्षाकडे होती. आता आघाडीमधील दुसराच आणखी एक पक्ष या जागेवर दावा सांगत आहे. दावा सांगणार्‍या पक्षाचे असे म्हणणे आहे की, या मतदारसंघात आमची ताकद फार मोठी आहे, त्यामुळे आघाडीच्या समीकरणांमध्ये हा मतदारसंघ आम्हाला सोडावा. मुळात जो पक्ष आधी ही जागा बाळगून होता त्यांचे म्हणणे आहे की, इथे आमची खूप ताकद आहे आणि त्यात तुमचा सपोर्ट मिळाला, तर आपला म्हणजे आघाडीचा उमेदवार सहज निवडून येईल. आता समजा दोन्ही पक्ष आपल्या दाव्यावर ठाम राहिले, तर आघाडीमधील या दोन पक्षांचे उमेदवार उभे असतील आणि शिवाय इथे ज्यांचा खासदार होता त्या सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पण असेल. मग आघाडीमधील दोन पक्ष इथे लढत असतील, तर ती मैत्रीपूर्ण लढत होणार नाही का?

पण बाबा, माझे म्हणणे काय आहे की, एक काहीतरी ठरवले पाहिजे. पक्ष तर पक्ष नाहीतर मग आघाडी तर आघाडी. पक्ष, आघाडी, आघाडी पक्ष हा सगळा गोंधळ सहन करणे जनतेलाही अवघड होईल ना?

संबंधित बातम्या

अजिबात नाही. सर्व पक्षांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आपणच खूप हुशार आहोत, असे वाटत असते; पण माझ्या अनुभवावरून तुला सांगतो, सगळ्यात हुशार जनता असते. ती अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असते. निवडणुका आल्या की, बरोबर लोक मतदान करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करतात.

– झटका

Back to top button