एका उत्सवाची सांगता | पुढारी

एका उत्सवाची सांगता

भारतात क्रिकेटला धर्म म्हटले जाते, याचे प्रत्यंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने आले आणि ते जगाने पाहिले. रविवारी पावसामुळे खेळ न होऊ शकल्याने सोमवारी झालेल्या सामन्यासाठीही त्याच संख्येने प्रेक्षकांनी खचाखच स्टेडियम भरून टाकले. पुन्हा पावसामुळे लांबलेल्या सामन्यात पहाटे पावणेदोन वाजेपर्यंत स्टेडियममधून एकही प्रेक्षक हलला नाही. आयपीएलच्या या सोळाव्या हंगामाच्या विजेतेपदावर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा नाव कोरले. दोन महिने देशभरातील विविध मैदानांवर रंगलेला हा थरार मंगळवारी पहाटे अखेरच्या चेंडूपर्यंत कायम होता, हेच या स्पर्धेकडे कोट्यवधी रसिकांना खेचून घेणारे एकमेव खरे कारण. आयपीएलची जाहिरात करताना ‘इंडिया का त्योहार’ अशा शब्दांत करण्यात आली होती आणि आयपीएलच्या हंगामात त्याची प्रचितीही येत असते. सगळीकडचे वातावरण क्रिकेटमय होऊन जाते. क्रिकेटच्या मैदानावरचा थरार टीव्हीच्या पडद्यावरून घराघरांत अनुभवला जात असतो. त्याचवेळी रेस्टॉरंटसह विविध ठिकाणी सामन्यांचे प्रक्षेपण होत असते. आयपीएलने क्रिकेटचा बाजार केला असल्याचे आणि सट्टेबाजाराला चालना दिली असल्याची टीका होत असते. ड्रीम इलेव्हनसारख्या वेगळ्या अर्थाने सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्‍या साधनांचा सुळसुळाट हे त्याचेच निदर्शक मानले जाते. खेळ कमी आणि मनोरंजनासह सट्टेबाजी वगैरे बाबींना अधिक महत्त्व दिले जात असल्याच्या टीकेच्या पार्श्वभूमीवरही आयपीएलचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. राज्याच्या, देशाच्या संघांकडून खेळणारा खेळाडू तो आपला मानण्याच्या काळात आयपीएलने खेळाडूंना आपले मानण्याची भौगोलिक बंधने तोडून टाकली. मराठमोळे ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, अजिंक्य रहाणे मद्रासी लोकांना आपले वाटतात. आणि गुजरातचाच रवींद्र जडेजा निर्णायक खेळी करून चेन्नईला विजेतेपद मिळवून देतो, तेव्हा तोही त्यांचाच होऊन जातो. क्रिकेटपटूंचे ग्लॅमर कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याहून कमी नसते आणि जाहिरातींच्या दुनियेत चित्रपट कलावंतांइतकीच कमाई क्रिकेटपटू करीत असतात. आयपीएलच्या निमित्ताने टी-20 क्रिकेटमध्ये एक नवे चैतन्य आले असून, क्रिकेटच्या अर्थकारणालाच नवे वळण मिळाले आहे. क्रिकेटची ही लोकप्रियता पुरुषांच्या क्रिकेटपुरती मर्यादित होती, ती अलीकडच्या काळात महिला क्रिकेटलाही मिळू लागली आहे. त्याचमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या धर्तीवर वूमन आयपीएलचा नवा डाव मांडला. आयपीएलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपर्‍यात दडलेल्या अनेक गुणी आणि होतकरू खेळाडूंचा शोध लागला. जे खेळाडू रणजी स्पर्धेपर्यंत पोहोचू शकले नसते, अशा अनेकांसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले केले. आयपीएल नसते, तर क्रिकेटच्या आसमंतात चमकणारे अनेक तारे कधीच शौकिनांच्या नजरेत आले नसते. त्याअर्थाने आयपीएलचे भारतीय क्रिकेटच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे, हे या स्पर्धेच्या टीकाकारांनाही मान्य करावे लागेल.

अहमदाबादमध्ये रंगलेला आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार म्हणजे या स्पर्धेचा परमोच्च बिंदू होता. यशापयशाचा झोका इकडून तिकडे जात असताना अखेरच्या चेंडूपर्यंत अनिश्चितता असावी, हेच या खेळाचे वैशिष्ट्य. अंतिम सामनाच नव्हे, तर स्पर्धेतील अनेक सामन्यांचे निकाल अखेरच्या चेंडूपर्यंत रंगले. भारतीय संघाचा सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याने अनेकदा व्यक्तिगत प्रदर्शन सर्वोत्तम करूनही त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला आजवर एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्याचवेळी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा विजेतेपद मिळवून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी बरोबरी साधली. काही खेळाडू काळावर आपला असा काही ठसा उमटवून जातात की, क्रिकेट शौकिन त्यांच्यासाठी प्राण अंथरायला तयार असतात. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांना ते भाग्य लाभते. सचिन मैदानावरून निवृत्त झाला आहे आणि धोनी आजही खेळतो आहे. त्याची व्यक्तिगत कामगिरी फारशी दखलपात्र नसली, तरी निर्णायक क्षणी तो महत्त्वाची भूमिका बजावतो, हे शुभमन गिलला त्याने यष्टिचित करून दाखवून दिले. संघाला समर्थ नेतृत्व देताना प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेणे आणि अपयशी खेळाडूंनाही पुरेपूर संधी देऊन आत्मविश्वास वाढवण्याचे काम धोनी करीत असतो. गेले काही महिने क्षमतेनुसार कामगिरी होत नसल्यामुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर फेकलेल्या अजिंक्य रहाणेला आयपीएलच्या संघात कुणी घेत नव्हते, त्याला अखेरच्या क्षणी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पन्नास लाखांना घेतले आणि तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्‍या अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये तडाखेबंद खेळी करीत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या कामगिरीमुळे जागतिक कसोटी विश्वविजेतेपदासाठी होणार्‍या भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. गुजरात टायटन्सने फलंदाजांना नेटमध्ये सरावासाठी गोलंदाजी करायला म्हणून घेतलेल्या मोहित शर्माला संघात संधी दिली आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत 27 बळी मिळवले, सर्वाधिक बळी घेणार्‍या मोहम्मद शमीपेक्षा ती संख्या फक्त एकने कमी आहे. अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंमध्ये त्याने विजय जवळपास रोखून धरला होता. शुभमन गिलने केलेल्या खेळी दीर्घकाळ स्मरणात राहतील. त्याचवेळी यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग असे अनेक खेळाडू क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनले. आयपीएल हा फक्त तरुणांचा खेळ आहे, हा समज महेंद्रसिंह धोनी, अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, पीयूष चावला यांनी खोटा ठरवला. त्याचवेळी भारतीय क्रिकेट कूस बदलत असल्याची चाहूलही यंदाच्या आयपीएलने दिली. सचिन तेंडुलकर कधीच निवृत्त झाला आहे. महेंद्रसिंह धोनीही बाहेरच आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याही निवृत्तीचा रस्ता हळूहळू तयार होऊ लागला आहे. हार्दिक पांड्या, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, रवी बिष्णोई यांच्या रूपाने भारतीय क्रिकेटचे भवितव्य आकार घेत आहे. त्यांना टी-20 च्या मर्यादित अवकाशातून बाहेर काढून कसोटीच्या अवकाशासाठी तयार करण्यासाठी लक्ष केंद्रित करायला हवे.

Back to top button