ऑपरेशन कावेरी | पुढारी

ऑपरेशन कावेरी

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन गंगा’च्या आठवणी ताज्या असतानाच भारताला पुन्हा तशाच प्रकारची मोहीम हाती घ्यावी लागली आहे. सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे सोमवारपासून ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले. सुदानच्या हवाई क्षेत्रात प्रतिबंध असल्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर काढणे केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगातील सगळ्याच देशांसाठी अडचणीचे ठरते आहे. सुदानचे लष्करप्रमुख आणि निमलष्करी दलाचे प्रमुख या दोघांमध्ये सत्तेसाठी संघर्ष तीव— बनल्याने ही युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे.

जगातील अनेक महत्त्वाच्या देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केल्यानंतरही तो थांबण्याचे नाव घेत नाही. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत असून, अशा लढाईचे जे परिणाम होतात, ते तीव—तेने जाणवू लागले आहेत. तेथील लोकांची उपासमार होऊ लागली, त्यामुळे विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना सुदानबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली. प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे तीन हजार भारतीय तेथे अडकलेत. त्यांची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बैठक घेऊन आदेश दिल्यानंतर ‘ऑपरेशन कावेरी’ हाती घेण्यात आले.

मोहिमेसाठी सौदी अरेबियाची मदत घेण्यात येत असून, तेथील जेद्दाह विमानतळावर भारतीय हवाईदलाची दोन ‘सी-130 जे’ विमाने तैनात करण्यात आली. तसेच नौदलाचे ‘आयएनएस सुमेधा’ हे जहाज पोर्ट सुदानमध्ये पाठविण्यात आले. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या निगराणीखाली मोहीम राबविण्यात येत आहे. सुदानमधील लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील हा संघर्ष थांबायचे नाव घेत नसून, दोन्हीकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. एका भारतीय आणि एका अमेरिकन नागरिकाचा त्यात मृत्यू झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. लोकांची सुटका करीत असताना बाहेर काढण्यात येत असलेल्या लोकांच्या गटावर हल्ला केला जाऊ नये, यासाठी दोन्ही गटांशी बोलणी करून मार्ग काढण्यात येत आहे.

खरे तर विदेशात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात भारताचे कौशल्य वादातीत आहे. इराकमधून एक लाख लोकांना आपण परत आणले. लीबियामधून लोकांना सुरक्षित बाहेर काढले. गद्दाफीच्या हाती सत्ता होती तेव्हा तेथील बाहेर जाणार्‍या सर्व रस्त्यांवर लष्कराचे नियंत्रण होते. गद्दाफीच्या हत्येनंतर अराजकसद़ृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि कुणाचा कुणाला ताळमेळ उरला नाही. त्यावेळच्या परिस्थितीशी आताच्या सुदानमधील परिस्थितीचे साधर्म्य आहे. युक्रेनमधून वीस हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, कारण तेथे दोन देशांमधील युद्ध होते.

युद्ध युक्रेनमध्ये सुरू होते आणि बाहेर निघण्याच्या वाटांवर वर्चस्व रशियाचे होते. तिथे दोन्ही देशांशी चर्चा करून भारताने मार्ग काढला होता. युक्रेनबरोबर रशियानेही सहकार्याचा हात पुढे करत ही सुटका करण्यात आली. त्यामुळे युद्धाच्या खाईतून हे भारतीय मायदेशी परतू शकले. त्यात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. शिवाय, रोमानिया, पोलंड, हंगेरी या शेजारी राष्ट्रांची सरकारे मजबूत होती आणि त्यांनीही मोहिमेला चांगले सहकार्य केले होते.

भारतीयांनी जगभरात सगळीकडेच हात-पाय पसरले आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यात कधी ज्याचे नावही ऐकले नाही, अशा देशातही काही समस्या निर्माण झाली, तर तेथील भारतीयांचा मुद्दा ऐरणीवर येतो. पोटापाण्याच्या प्राथमिक गरजांसाठी लोक हजारो मैलांवर जातात. अगदी आफ्रिकेतील गरिबातील गरीब देशातही ते मोठ्या संख्येने आढळतात. एकेकाळच्या सर्वात मोठ्या सुदानमध्ये भारतीयांची संख्या दखलपात्र म्हणावी अशी आहे. गाव, देश सोडून एवढ्या लांब ही माणसे कशासाठी जातात, असा प्रश्नही अनेकदा निर्माण होत असतो.

पोटासाठी, पैशासाठी हे त्याचे सरळ उत्तर. सुदानमध्ये जे भारतीय आहेत, त्यांच्यामध्ये गुजराती लोकांची संख्या मोठी असून, तेथील एकूण भारतीयांपैकी 70 टक्के गुजराती लोक असल्याचे सांगण्यात येते. तेथे बहुतांश भारतीय व्यवसाय धंद्यामध्ये आहेत. तेथे दुकाने थाटून बसलेले भारतीय भारतातून तसेच चीनमधून कपड्यांसह विविध वस्तू मागवून त्यांचा व्यापार करीत असतात. दक्षिण सुदानमध्ये भारताच्या विविध भागांतून गेलेले लोक आहेत. भारतातील आयुर्वेद उपचार पद्धतीचे सुदानच्या नागरिकांना मोठे आकर्षण आहे.

भारतीय वैद्यकशास्त्रावर तेथील लोकांचा मोठा विश्वास असून, सुदानच्या कानाकोपर्‍यातून शेकडो लोक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येत असतात. सुदानमध्ये आयुर्वेदाचे आकर्षण असल्यामुळे भारतातून गेलेले अनेक लोक तेथे आयुर्वेदिक औषधे विक्रीचा व्यवसाय करतात. तेथे अडकलेल्यांत कर्नाटकातील हक्की-पिक्की जमातीच्या दोनेकशे लोकांचाही समावेश आहे. पश्चिम तसेच दक्षिण भारतात विशेषतः जंगलांमध्ये या जमातीचे वास्तव्य असते. शिकारीबरोबरच पक्षी पकडण्याचे काम हे लोक करीत. पक्षी पकडण्यावर कायद्याने बंदी आल्यामुळे ते आता झाडपाल्याची औषधे विकू लागले.

विविध आजारांवर गुणकारी ठरणारी औषधे जंगलातील वनस्पतींच्या आधारे बनवण्याचे काम ते करतात. आजघडीला हा प्रश्न सुदानपुरता आणि तेथे अडकलेल्या अन्य देशांच्या नागरिकांपुरता मर्यादित असला, तरी ही लढाई थांबली नाही तर नजीकच्या काळात त्याचे व्यापक परिणाम पाहावयास मिळतील. सुदानची भौगोलिक परिस्थिती त्यास कारणीभूत ठरणार आहे. कारण, इथोपिया, लीबिया, चाड, मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक, इरिट्रिया आणि दक्षिण सुदान अशा सात देशांशी सुदानची सीमा जोडली आहे. या सर्व देशांवर सुदानमधील लढाईचे वाईट परिणाम होऊ शकतील. त्यामुळे विविध देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे महत्त्वाचे आहेच. परंतु, त्याचबरोबर ही गृहलढाई थांबविण्यासाठीही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही देशातला अंतर्गत संघर्ष त्या देशातील लोकांच्या जगण्याच्या मुळावर उठत असतो, देशाच्या स्थैर्यालाही तो धक्के देत असतो, अन्य देशांना त्याची झळ पोहोचण्याआधी तो थांबवण्याची गरज आहे.

हे ही वाचा :

‘कात्रज’मधील अंतर्गत वादाला पूर्णविराम कधी ?

Sweden’s research rocket : स्वीडनचे संशोधन रॉकेट कोसळले नॉर्वेच्या हद्दीत

Back to top button