‘कात्रज’मधील अंतर्गत वादाला पूर्णविराम कधी ? | पुढारी

‘कात्रज’मधील अंतर्गत वादाला पूर्णविराम कधी ?

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गुरुवारी (दि.27) दुपारी एक वाजता होणार्‍या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्ष कार्यालयात संचालकांचीही एक बैठक बोलविली आहे. संघाच्या पदाधिकारी बदलासाठी एक गट सक्रिय झाला असून, अंतर्गत वादाला पूर्णविराम देण्यात जिल्हाध्यक्ष यशस्वी होणार का, त्यावरच संचालकांची बैठकीतील उपस्थित अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे.

कात्रज दूध संघावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. संघाच्या गेल्या महिन्यात 28 मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस 16 पैकी 7 संचालक बैठकीस उपस्थित राहिले आणि उर्वरित संचालकांपैकी काहींनी अर्ज आणि काही अनुपस्थित राहिल्याची गंभीर दखल पक्षाने घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कात्रज दूध संघाच्या बोलविलेल्या संचालकांच्या बैठकीत संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, कोणताच निर्णय दिलेला नाही.

कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये हे काही कारणास्तव रजेवर असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे राज्य सरकारने संघाच्या कारभाराची चौकशी लावलेली असून, संचालकांमधील धुसफूस सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकीय संचालकांच्या रजेमुळे दैनंदिन कामकाजात मरगळ आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेही गुरुवारी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय होणार याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button