लवंगी मिरची : लॉटरीचा धसका | पुढारी

लवंगी मिरची : लॉटरीचा धसका

मला एक सांग मित्रा, समजा तुला फोन आला की, बुवा तुम्हाला 44 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे, तर तुझी पहिली प्रतिक्रिया काय असेल?

सोपे आहे. तो फेक कॉल आहे, असे समजून मी तत्काळ तो फोन कट करेल आणि असा फोन पुन्हा येऊ नये म्हणून तो नंबर ब्लॉक करून टाकेल.

अगदी असेच घडले. मूळ बंगळूर निवासी असलेल्या वाटके नावाच्या व्यक्तीला अबुधाबी येथील बिग लॉटरी ड्रॉमध्ये 44 कोटींची लॉटरी लागली. संबंधित एजन्सीने वाटके यांना फोन करून सांगितले की, तुम्हाला 44 कोटींची लॉटरी लागली आहे. वाटके यांनी तो फोन तत्काळ कट केला आणि पुन्हा त्या नंबरवरून फोन येऊ नये म्हणून तो ब्लॉक केला. आता एजन्सीची पंचाईत होऊन बसली. त्यांनी दुसर्‍या नंबरवरून वाटकेंना संपर्क केला आणि खूप प्रयत्न करून समजावून सांगितले की, त्यांना लॉटरी लागली आहे आणि ती त्यांनी घेऊन जावी. त्यांचा विश्वासच बसेना. शेवटी चक्क 44 कोटींची लॉटरी त्यांना प्रदान करण्यात आली.

संबंधित बातम्या

दररोज इतके बोगस कॉल येतात, त्यामुळे त्यांना हा फेक कॉल वाटला असेल यात त्यांची काही चूक नाही. मार्केटिंगचे कॉल येतात, लोन पाहिजे का म्हणून कॉल येतात, तुमच्या अकाऊंटला पैसे जमा झाले आहेत म्हणून मेसेजेस येतात. आधीच या अशा कॉल्समुळे जीव नकोसा होऊन जातो. शिवाय असे काही आपले नशीब अचानक फळफळेल, असे तर कधीच कुणाला वाटत नाही ना?

साहजिकच आहे. आपले काही चांगले होऊ शकते, यावरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वासच उडालेला असतो. खरच असे जर काही झाले, तर हर्षवायू होण्याची शक्यता असते. 44 कोटी म्हणजे काय खायचे काम नाही. किमान पाच पिढ्यांची तरी ददात मिटण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती वास्तवात आली, तर हर्षवायू होणार नाही तर काय होईल?

म्हणजे आयुष्यात जी काय स्वप्ने आहेत म्हणजे तरुण मुले ज्याला बकेटलिस्ट म्हणतात ना ती सगळी दोन-तीन कोटींमध्ये आरामात पूर्ण होते. म्हणजे घर असावे, बंगला असावा, शेती असावी, चारचाकी गाड्या असाव्यात, देश-विदेशात फिरावे, मुलाबाळांचे शिक्षण, सगळ्यांची राहणी, कपडेलत्ते हे सर्व धरले तरी पाच कोटी खूप झाले. अशा व्यक्तीला चक्क सगळी स्वप्न पूर्ण करून जर 39 कोटी रुपये उरत असतील, तर हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू होण्याची पण शक्यता आहे.

तरी पण मला एक सांग की, तुला असा काही फोन आला आणि चक्क 44 कोटी रुपयांची लॉटरी लागली, तर तुझी काय परिस्थिती होईल?
वेगळे काय होणार आहे? नेकीने, कष्ट करून आम्ही दोघे कसाबसा संसार करत आहोत. काटकसर करून माझी बायको सगळे खर्च भागवत असते. महिनाअखेर तेल, तूप संपले तर आर्थिक प्रश्न उभे राहतात. तरीपण अशी काही छप्पर फाडके पैशाची बरसात झाली, तर मला धक्का बसणार नाही; पण माझ्या बायकोला हर्षवायू होईल, त्याची मला फार काळजी वाटते. त्यापेक्षा नको ते तिकीट काढणे आणि नको ती लॉटरी लागणे. जे चालले आहे, ते बरे चालले आहे.

– झटका

Back to top button