ट्रम्प यांची अटक | पुढारी

ट्रम्प यांची अटक

जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर अटक झाली आणि त्यांच्यावरील खटल्याची कार्यवाही सुरू झाली. एखाद्या प्रकरणात अटक झालेले आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांना सामोरे जावे लागलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले. अमेरिकेबरोबर संपूर्ण जगाचे राजकारण आगामी काळात या घटनेने ढवळून निघेल. राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीवरही या घटनेचे परिणाम दिसून येणार असून, आपल्यावर झालेल्या कारवाईचा लाभ उठवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून केला जाईल. ट्रम्प यांना अटक होताच न्यायालयासमोर जमलेले त्यांचे शेकडो समर्थक, त्यांच्याकडून करण्यात आलेला निर्दोषत्वाचा दावा आणि ट्रम्प यांच्या पुत्राच्या पुढाकाराने सोशल मीडियावर ट्रम्प यांना सोडून देण्यासाठी चालवलेली मोहीम या सगळ्या गोष्टी पाहता गंभीर स्वरूपाचे आरोप होऊनही ट्रम्प अजिबात विचलित झालेले नाहीत.

उलट ही कारवाई म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीची चालून आलेली संधी असल्याचे त्यांचे मानणे आहे. यापूर्वीच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय झाल्यानंतर ट्रम्प समर्थकांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये घातलेल्या गोंधळानंतर रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांच्यापासून अंतर ठेवले. दरम्यानच्या काळात ट्रम्प यांच्यासाठी पक्षांतर्गत स्पर्धकही तयार झाले. याच काळात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची लोकप्रियता वेगाने घसरत असताना ट्रम्प यांची मात्र वाढत चालल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय राहील, याबाबतही उत्सुकता जशी वाढली, तेथील राजकारणातील गुंतागुंतही वाढली.

एखाद्या नेत्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर ते संबंधिताच्या राजकीय कारकीर्दीसाठी मारक ठरण्याऐवजी लाभदायक ठरत असल्याचे भारतासारख्या देशात अनेकदा दिसून आले आहे. पोलिसांनी किंवा सरकारी यंत्रणेची कारवाई अन्याय असल्याचे असे चित्र निर्माण करण्यात संबंधितांची प्रचारयंत्रणा यशस्वी होते. त्याद्वारे मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अमेरिकेतील लोक अधिक शिकलेले, पुढारलेले आणि प्रगल्भ म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांची मानसिकता भारतीय मतदारांपेक्षा जराही वेगळी नसल्याचेच एकूण परिस्थितीवरून दिसून येते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा एका अर्थाने जगाचा नेता असतो. त्याच्या भूमिकेवरून जागतिक राजकारणाची दिशा ठरत असते. जॉर्ज बुश यांच्यानंतर बराक ओबामा यांचे येणे किंवा ट्रम्प यांच्यानंतर बायडेन यांचे राष्ट्राध्यक्ष होणे याचे जागतिक राजकारणावर झालेले परिणाम जगासमोर आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प यांची त्यादिशेने पुन्हा वाटचाल होणार असेल, तर त्याबाबत जगभरात आश्चर्यमिश्रित कुतूहल असणे स्वाभाविकच आहे.

ट्रम्प यांची ओळख सोज्ज्वळ आणि नीतिमान अशी कधीच नव्हती. सार्वजनिक जीवनातील नैतिकता त्यांनी कधीच सोडली आहे. मोठे उद्योजक म्हणून त्यांची ख्याती. फटकळ आणि बिनधास्त बोलण्यामुळे अनेकदा त्यांनी वादही ओढवून घेतले. परंतु, त्यांनी पदावर येण्याआधी आणि आल्यानंतरही त्याची कधी पर्वा केली नाही. एखाद्या उद्योजकाचा, बांधकाम व्यावसायिकाचा वर्तनव्यवहार कसाही असला तरी त्याचा इतरांना त्रास होत नसेल, तर ती त्याची व्यक्तिगत बाब म्हणून दुर्लक्ष करता येऊ शकते. परंतु, अमेरिकेसारख्या महासत्तेचे प्रमुख बनल्यानंतरही ट्रम्प यांच्या वर्तनात अजिबात फरक पडला नाही. जगभरातील विविध देशांमध्ये मनमानी कारभार करणार्‍या राज्यकर्त्यांची चलती असण्याच्या काळात ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले. परंतु, त्यांना दुसर्‍यांदा सत्तेवर येता आले नाही तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बघायला मिळाला.

आतासुद्धा माजी राष्ट्राध्यक्षाला अटक होण्याची ही पहिलीच घटना. प्रकरण जुने असले तरी ते नाजूक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे ट्रम्प यांना आगामी निवडणुकीसाठी मोठे समर्थन मिळण्याचे दावे केले जात असले तरी अमेरिकन समाज त्याला कितपत मान्यता देईल, याबाबत शंका आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारकाळात 2016 मध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न स्टारशी संबंधित आहे. ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेम प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला 1 लाख 30 हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करीत असताना तिला ही रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी हे पैसे संबंधित पॉर्न स्टारला दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी मायकल कोहेन यांना या पैशांची भरपाई करून दिली.

परंतु, कोहेन यांना दिलेल्या रकमेची नोंद ही कायदेशीर शुल्काच्या स्वरूपात करण्यात आल्याचे दाखवले गेले. डोनाल्ड ट्रम्प आणि स्टॉर्मी डॅनियल यांचे हे प्रकरण सतरा वर्षे जुने म्हणजे 2006 पासूनचे असून, अमेरिकेतील पद्धतीनुसार तेव्हापासून स्टॉर्मी आपले हे प्रकरण विकण्याच्या प्रयत्नात होती. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना प्रकरण चव्हाट्यावर आले असते, तर त्याचा फटका ट्रम्प यांना बसला असता म्हणून ट्रम्प यांच्या वकिलांनी तिला पैसे देऊन गप्प केल्याचा आरोप आहे.

न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिल्यामुळे त्यांना अटक होणार हे निश्चित होते. न्यायालयीन कार्यवाहीसाठी ते शरण आले. त्यांनी आपल्यावरील फसवणुकीचे सर्व 34 आरोप फेटाळून लावले आहेत. न्यायालयात येतानाचा ट्रम्प यांचा अविर्भाव पाहिल्यानंतर एखादा नेता आपल्याविरोधातील आरोपांना किती बिनधास्तपणे सामोरा जातो, हे दिसून आले. खरे तर ट्रम्प यांचा हाच दबंगपणा अमेरिकन जनतेला आवडत असावा आणि ट्रम्प यांनाही त्याची कल्पना असावी त्याचमुळे ते निर्धास्त दिसून येतात. आपल्यावरील आरोपांनाच ढाल करीत आगामी निवडणुकांवर स्वार होण्याचा त्यांचा डाव यशस्वी होतो की, त्यांच्यावर उलटतो हे पाहावे लागेल.

Back to top button