भारतीय वायुदल : पराक्रमाची उज्ज्वल परंपरा | पुढारी

भारतीय वायुदल : पराक्रमाची उज्ज्वल परंपरा

मुरलीधर देसाई, माजी वायुसैनिक

दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय वायुदल 89 वर्षे पूर्ण करीत आहे. आनंदात भर म्हणजे भारतीय वायुसेनेच्या प्रमुखपदी महाराष्ट्रातील हेस्तरा गावचे भूमिपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चौधरी आहेत. पराक्रमाची आणि उज्ज्वल कामगिरीची परंपरा जपलेल्या भारतीय वायुसेनेने आजही आपली ओळख कायम ठेवली आहे.

ज्या देशाची वायुदल सक्षम तो देश मजबूत, असे आंतरराष्ट्रीय पातळीवर समीकरण आहे. हवाईदलाचे महत्त्वच त्यातून स्पष्ट होते. भारतीय हवाई दलाची स्थापना 1932 मध्ये आजच्याच दिवशी झाली होती. दि. 8 ऑक्टोबर 1932 मध्ये ब्रिटिश ऑक्झिलरी एअर फोर्स म्हणून वायुसेनेची स्थापना झाली. दुसर्‍या महायुद्धात सुरुवातीला 1942 मध्ये इंग्लंड आणि जर्मनीने विमानांचा वापर करून सार्‍या जगाला तोंडात बोटे घालायला लावली. त्यावेळी लोकांना विमानाचे महत्त्व समजले. त्यानंतर जगभरातील देशांनी आपापले वायुदल अधिक सक्षम करण्यास सुरुवात केली. प्रारंभी चार वेस्ट, लँड ट्रेनी ऑफिसर, 19 हवाई शिपाई, त्यांचे कमांडर फ्लाईट लेप्टनंट, सेसील बाऊचर यांच्या समावेशाने भारतीय वायुसेनेची सुरुवात झाली.

दुसर्‍या महायुद्ध काळात 1945 मध्ये रॉयल एअरफोर्सची ओळख निर्माण झाली. त्यानंतर 1954 मध्ये एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी पहिले भारतीय एअर फोर्स चिफ (मुख्य) झाले. स्वातंत्र्यानंतर वायुसेनेने पाकिस्तान (1965-1571) विरुद्ध झालेल्या युद्धात उत्तम कामगिरी केली. त्यानंतर कारगिल संघर्षात भारतीय वायुसेनेने अतुलनीय कामगिरी केली. याशिवाय ऑपरेशन विजय, मेघदूत, केकटस् यामध्ये मोलाची कामगिरी केली. एअर मार्शल अर्जुनसिंग यांना एअर चिफ मार्शल म्हणून बढती देण्यात आली. फाईव्ह स्टार सांभाळणारे भारतीय सेनेतील ते पहिले अधिकारी ठरले. हवाईदलाने अगदी अलीकडच्या काळातील बालाकोट येथील सर्जिकल स्टाईक करून आपला दबदबा कायम राखला आहे. चीनशी 1962 मध्ये झालेल्या युद्धात भारतीय राजकारण्यांनी वायुदलाचा म्हणावा तेवढा वापर केला नाही. अरुणाचल डोंगराळ भागात शत्रू सैन्याला खिंडीत गाठून त्यांना जेरीस आणता आले असते. वायुदलाशी चर्चाही केली नाही. 1971 मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय वायुसेनेतील अधिकार्‍यांशी विचार विनिमय करून युद्धनीती आखली. त्यामुळे सरकारचे पाठबळ व नियोजनामुळे भारताने यश मिळवले. बांगला देश स्वतंत्र करण्यास भारतीय वायुदलाची महत्त्वाची भूमिका होती. कारगिल युद्धातील कामगिरीमुळे वायुसेनेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर देशातील विविध भागांत आपत्तींवेळीही हवाईदलाने मोठी मदत केली आहे. 2014 च्या सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये महापुरात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अशा अस्मानी संकटात वायुसेना व सैन्य दलाने केलेली मदत कौतुकास्पद होती. गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये वायुदलाने व सैनिकांनी सर्व भागांत मदत केली. परदेशातील संकटामध्ये भारतीय नागरिकांना परत आणण्यात हवाईदलाचा वाटा मोठा आहे. वायुदलात राफेल विमानांचे झालेले आगमन ही जमेची बाजू आहे. वायुदलात महिलांचा समावेशही केला गेला आहे.

भारतीय वायुदल कडे असलेली विमाने

सी-130 ही बारा विमाने 2013 मध्ये विमान दलात सामील करण्यात आली. सी-17 ही विमाने 40 ते 70 टन लोड एकाच वेळी 4 ते 9000किलोमीटरपर्यंत नेऊ शकतात. आयएल-76 चार इंजिन विमाने तासी 850 किलोमीटर वेगाने उड्डाण करतात. एएन-32 सहा ते सात टन लोड घेऊन 550 किलोमीटर वेगाने उडू शकतात. एम्ब्रोएअर- या विमानाचा वापर व्हीआयपी उड्डानासाठी वापर केला जातो. एव्हरो-50 या विमानातून 6 टन लोड घेऊन जाता येते. स्पेनची नवीन सी-295 विमाने ही जागा घेणार आहे. डॉर्नीअर- 20 प्रवासी किंवा 2100 किलोग्रॅम वजन घेऊन तासी 435 किलोमीटर वेगाने जाऊ शकते. बोईंग-737 हे 60 प्रवासी क्षमता असलेले विमान व्हीआयपी प्रवाशांसाठी वापरले जाते.

सी 295 ही विमाने स्पेनमधून येणार आहेत. 16 विमानांची खरेदी आणि उर्वरित चाळीस विमाने भारतात तयार केली जातील. त्यामुळे भारतात विमानाचे पार्ट तयार करणार्‍या कंपन्यांनाही फायदा होईल. भारत खरेदी करीत असलेल्या स्पेन सी-295 विमाने ही शॉर्ट टेकऑफ व लँडिंगसाठी उपयुक्‍त आहेत. या विमानांना टेकऑफ 320 मीटर तर लँडिंग 670 मीटरमध्ये उतरू शकतात. सर्व प्रकारच्या सुखसोयी विमानात आहेत. शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारे देशाचे वायुदल अधिकाधिक सक्षम होऊन जगभरात नावलौकिक वाढत राहो.

Back to top button