भारत आणि इटली मैत्रीपूर्ण संबंधांचे नवे सुवर्णयुग! | पुढारी

भारत आणि इटली मैत्रीपूर्ण संबंधांचे नवे सुवर्णयुग!

भारत आणि इटली यांच्यातील संबंधांना यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हे अमृतपर्व साजरे करण्यासाठी रायसीना डायलॉग आठवा, या बैठकीसाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकतीच भारताला भेट दिली. त्यांची दोन दिवसांची ही भेट खरोखरच दोन्ही देशांच्या संबंधांना नवे वळण देणारी घटना म्हटली पाहिजे. या भेटीने एक नवे सुवर्णयुग या संबंधांत आणले आहे आणि भविष्य काळात सहकार्याची अनेक दालने त्यामुळे खुली झाली आहेत.

भारत आणि इटली या दोन देशांमधील मैत्रीपूर्ण आणि स्नेहमय संबंधांची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा विविध कालखंडांत उभय राष्ट्रांत सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांची वीण भक्कम आहे. प्राचीन काळात महाराष्ट्रातील सातवाहन घराणे दक्षिण भारतात राज्य करत असताना भारत आणि इटली दरम्यान व्यापारी संबंध भक्कम होते. विशेषत: भारतातील पैठणी महावस्त्र हे इटलीमध्ये कमालीचे लोकप्रिय होते. तसेच भारताला भेट देणार्‍या अनेक इटालियन प्रवाशांनी प्राचीन काळात तसेच मध्ययुगात भारतातील समृद्धीचे वस्तुनिष्ठ आणि प्रभावी चित्रण केलेे आहे. तसेच ब्रिटिश अमदानीतसुद्धा भारत आणि इटली दरम्यान संबंध इतके द़ृढ होते की, इटलीच्या काही विद्यापीठांतून संस्कृत भाषा शिकविण्यात येत असे. मार्को पोलो, मिखोलाय मनोची तसेच अन्य काही प्रवाशांनी लिहिलेले वृत्तांत मनोहर, स्फूर्तीदायक आणि प्राचीन भारताच्या वैभवावर प्रकाश टाकणारे आहेत.

अशा या स्नेहसंबंधांना यावर्षी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे अमृतपर्व साजरे करण्यासाठी म्हणून रायसीना डायलॉग आठवा, या बैठकीसाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकतीच भारताला भेट दिली. त्यांची दोन दिवसांची ही भेट खरोखरच दोन्ही देशांच्या संबंधांना नवे वळण देणारी घटना म्हटली पाहिजे. या भेटीने एक नवे सुवर्णयुग या संबंधांत आणले आहे आणि भविष्यकाळात सहकार्याची अनेक दालने त्यामुळे खुली झाली आहेत. उभय राष्ट्रांतील आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रांतील आदानप्रदानाला एक भक्कम अशी वेगळी दिशा या भेटीमुळे लाभणार आहे.

इटलीच्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान आणि एक अष्टपैलू नेत्या म्हणून जॉर्जिया मेलोनी यांनी जगाच्या राजकारणावर ठसा उमटविला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी इटलीला जगाच्या पटलावरील एक महत्त्वाचा देश म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी नवनवीन उपक्रम प्रारंभिले आहेत. कार्यकाळातील पहिल्या भेटीसाठी त्यांनी भारताची निवड केली. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी नवे दालन खुले करणे. दुसरे म्हणजे भारत-इटली यांच्यातील आर्थिक, व्यापारी आणि लष्करी सहकार्य याबाबतीतील अनेक महत्त्वाचे संकल्प करणे. या दोन्ही उद्देशांच्या पूर्ततेसाठी त्यांनी केलेला हा दौरा निश्चितपणे फलदायी ठरला आहे.

मेलोनी यांनी भारत दौर्‍यात रशिया आणि युक्रेन युद्धाच्या मुद्द्यालाही स्पर्श केला. हा युद्धसंघर्ष उफाळून आल्यानंतर त्यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघांतील बैठकीमध्ये भारताने तटस्थ भूमिका घेत रशियास अनुकूल अशी पाऊले टाकली. यावरून अनेक पश्चिम युरोपियन देशांनी टीकेचा सूर आळवला होता; पण मेलोनी यांनी भारताने आता हे युद्ध आणि तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी भूमिका मांडली आहे. मेलोनी आपल्या भाषणात म्हणाल्या, जी- 20 राष्ट्रांचा अध्यक्ष या नात्याने भारताने युद्धविराम आणि न्याय्य शांततेसाठी वाटाघाटी सुरू करण्यासाठी मध्यवर्ती भूमिका घ्यावी. भारत अशी भूमिका समर्थपणे बजावू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे, कर्तृत्वाचे विलक्षण आणि समर्पक शब्दात वर्णन केले. जगातील सर्वात प्रिय नेतृत्व आणि जगातील सर्वात समर्थ नेतृत्व, असे त्या म्हणाल्या. मेलोनी यांनी घेतलेली ठाम आणि यथायोग्य भूमिका महत्त्वाची आहे.

युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीच्या काळापासून भारताने हे स्पष्ट केले आहे की, हा वाद केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवला जावू शकतो. भारताने नेहमीच शांततापूर्ण तोडगा विकसित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. भारत नव्या राजकारणात एक विश्वगुरू म्हणून उदयास आला आहे. भारताचे हे विश्वगुरूचे स्थान युरोपातील इटलीसारख्या प्रमुख राष्ट्राने मान्य केले आहे, ही या भेटीतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. रायसीना संवादामध्ये मेलोनी यांनी केलेले भाषणसुद्धा भारताच्या या मौलिक भूमिकेचे स्वागत करणारे होते. त्यांनी भारतातील नव्या विकास पर्वाचे आणि अमृतपर्वाचे विशेष कौतुक केले आहे.

मेलोनी यांच्या समवेत इटलीचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधानही सहभागी होते. शिवाय त्यांच्याबरोबर उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळसुद्धा होते. या शिष्टमंडळासमवेत भारतातीत प्रशासकीय अधिकारी व मंत्रिगण यांनी उपयुक्त चर्चा केली. या चर्चेतून परस्पर सहकार्याची नवनवी क्षेत्रे उदयास आली. प्रामुख्याने भारत व इटली स्टार्टअप विकासाच्या द़ृष्टीने एक नवा सेतू स्थापन करण्यात येणार आहे. उभय राष्ट्रांनी प्रादेशिक व जागतिक सहकार्याच्या बाबतीत समग्र द़ृष्टिकोन स्वीकारला आहे. दहशतवादाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी खांद्यास खांदा लावून लढायचे ठरवले आहे. शिवाय संरक्षण, उत्पादनाच्या क्षेत्रातील सहकार्य, उभय राष्ट्रांतील लष्कराचा सराव तसेच विज्ञान, तंत्रज्ञान व शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील परस्पर योगदान, परस्पर सहकार्य तसेच वाणिज्य व व्यापार क्षेत्रांतील सहकार्य व व्यापार दुप्पट करण्याचा संकल्प तसेच अंतर्गत अंतराळ संशोधन, अन्नधान्य सुरक्षा इत्यादी अनेक क्षेत्रांत उभय राष्ट्रांनी महत्त्वाची भूमिका घेण्याचे ठरविले आहे. नजीकच्या पाच वर्षांच्या काळात भारत-इटली दरम्यानही सर्व सहकार्याची नवी क्षितिजे जसजशी विकसित होत जातील, त्याबरोबरच अनेक नव्या क्षेत्रांचासुद्धा विकास होईल.

विशेषतः लोक आणि देशपातळीवरील संपर्काला उत्तेजन देण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना इटलीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी मोठी संधी प्राप्त होईल. वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार इटलीमधील अनेक उद्योग भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असून, ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील तेव्हा भारतात मोठ्या रोजगारसंधी उपलब्ध होतील. उभय राष्ट्रांमधील परस्पर आर्थिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक सहकार्याची नवी क्षितिजे समोर आल्यामुळे हे सहकार्य आता केवळ राजकीय पातळीवर न राहता व्यापक बनले आहे. जी- 20 राष्ट्रांचा अध्यक्ष या नात्याने भारताने विविध क्षेत्रांत विकसनशील राष्ट्रांना मदत करण्यासाठी जी थोरल्या भावासारखी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेस इटलीने सक्रिय सहकार्य करण्याचे ठरवले आहे, हीदेखील या भेटीची एक प्रमुख उपलब्धी म्हणावी लागेल.

– प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Back to top button